कोरोना व्हायरसवर लस कधी येणार?

    • Author, जेम्स गॅलाघर, बीबीसी न्यूज
    • Role, आणि टीम बीबीसी मराठी

भारतात कोरोना लसीकरणाला जानेवारी महिन्यात सुरुवात होऊ शकते, असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे.

ANI वृत्तसंस्थेला 21 डिसेंबरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं, "जानेवारी महिन्यात कोणत्याही क्षणी, कोणत्याही आठवड्यात आपण कोरोनाचा पहिला डोस नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या स्थितीत असू शकतो, असं मला वैयक्तिक पातळीवर वाटतं."

कोरोना लशीबाबत तिची सुरक्षितता आणि परिणामकारकता हीच प्राथमिकता असेल. या दोन गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष केलं जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढच्या सहा महिन्यात देशभरातल्या 30 कोटी जनतेला कोरोनाची लस देण्यात येईल, अशी आशाही हर्षवर्धन यांनी व्यक्त केलीय.

त्यांनी म्हटलं, "कोरोनाच्या लशीसाठी देशातील तत्ज्ञ मेहनत घेत आहे. पुढच्या 6 ते 7 महिन्यांत देशातील 30 कोटी जनतेचं लशीकरण करण्याची तयारी सध्या सुरू आहे.

" ज्या 30 कोटी लोकांना आधी लस दिली जाणार आहे, त्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी, 2 कोटी फ्रंटलाईन वर्कर्स, 50हून अधिक वयाचे 26 कोटी नागरिक आणि 50हून कमी वयाचे पण काहीएक आजार असणारे जवळपास 1 कोटी लोक असतील."

यापूर्वी कोव्हिड 19साठीची लसीकरण मोहीम जानेवारी 2021पासून सुरू होण्याची शक्यता असून या लसीकरण मोहीमेमुळे ऑक्टोबर 2021पर्यंत परिस्थिती काहीशी पूर्वपदावर येण्याची शक्यता असल्याचं मत सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांनी व्यक्त केलं.

इंडियन एक्सप्रेसने मध्ये याविषयीची बातमी छापण्यात आलीय.

साधारणपणे 20 टक्के भारतीयांना लस मिळाल्यानंतर ऑक्टोबर 2021पर्यंत स्थिती सामान्य पातळीवर येण्याची आशा निर्माण होईल असं ते यामध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान नव्याने झालेल्या चाचणीत रशियच्या स्पुटनिक 5 लशीची अचूकता 91.4 टक्के असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबर पासून रशियात 1 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. या चाचणीत लस देण्यात आलेल्या 22,714 जणांचा समावेश होता.

तर भारतामध्ये लशीच्या ट्रायल्स घेणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी नियामकांकडे आपत्कालीन परिस्थितीतल्या तातडीच्या वापरासाठीच्या परवानगीसाठी अर्ज केलाय.

फायझर - बायोएनटेक लस

फायझर आणि बायोएनटेक कंपन्यांनी मिळून तयार केलेल्या लशीला अमेरिका आणि युकेमध्ये परवानगी देण्यात आली आहे.

औषध उत्पादक कंपन्या फायझर आणि बायोएनटेकने तयार केलेल्या कोव्हिड 19वरच्या लशीच्या मदतीने युकेमध्ये लसीकरण मोहीम सुरू झालीय.

मार्गारेट कीनन या 90 वर्षांच्या आजींना फायझर - बायोएनटेकच्या लशीचा युकेमधला पहिला डोस देण्यात आला.

लशीच्या मोठ्या प्रमाणावरील वापराला परवानगी देणारा युके हा पहिला देश ठरला आहे.

फायजरची लस 95 टक्क्यांपर्यंत संरक्षण देते त्यामुळे ही लस व्यापक वापरासाठी योग्य असल्याचं ब्रिटिश नियामक MHRA ने म्हटलं आहे.

तर फायझर - बायोएनटेकच्या याच लशीच्या मदतीने अमेरिकेतली लसीकरण मोहीमही सुरू झालेली आहे.

न्यूयॉर्कमधल्या नर्स सँड्रा लिंडसे यांना या लशीचा अमेरिकेतला पहिला डोस देण्यात आला. एप्रिलपर्यंत 10 कोटी लोकांना लस देण्याचं उद्दिष्टं अमेरिकेत ठेवण्यात आलंय.

कॅनडामध्येही या लशीचे डोसेस देत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

फायझर - बायोएनटेकच्या लशीचे 4 कोटी डोसेस युकेने यापूर्वीच ऑर्डर केलेले आहेत. या डोसेसच्या मदतीने 2 कोटी लोकांना ही लस देता येईल.

यापैकी 1 कोटी डोस येत्या काही दिवसांत युकेमध्ये उपलब्ध होणार आहेत.

10 महिन्यांच्या कालावधीत ही लस विकसित करण्यात आलीय.

औषध उत्पादक कंपनी मॉडर्नानेही कोरोना व्हायरसच्या लशीच्या व्यापक वापरासाठी अमेरिका आणि युरोपच्या नियामकांकडे मंजुरी मागितली आहे.

आपल्या लशीमुळे 90 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळत असल्याचा दावा फायझर - बायोएनटेकने काही दिवसांपूर्वी केला. फायझर कंपनीने अमेरिकेमध्ये मंजुरी मिळविण्यासाठी अर्ज केला होता.

  • चाचणी करण्यात आलेल्या लोकांपैकी 90% लोकांमध्ये कोव्हिडची लक्षणं निर्माण झाली नाहीत.
  • या लशीचे दोन डोस तीन आठवड्याच्या अंतराने द्यावे लागतील.
  • आतपर्यंत 43,000 लोकांवर या लशीची चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये लशीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टी आढळून आल्या नाहीत.

ही लस -70 अंश सेल्शियस तापामानात साठवून ठेवावी लागेल. शिवाय ती एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना शुष्क बर्फात (Dry Ice) गुंडाळून एका विशिष्ट बॉक्समधून न्यावी लागेल. या बॉक्सवर जीपीएस ट्रॅकर लावलेला असेल.

ही RNA प्रकारची लस आहे. यामध्ये व्हायरसच्या जेनेटिक कोडमधला एक विशिष्ट लहानसा भाग लस तयार करण्यासाठी वापरला जातो. ही लस टोचल्यानंतर शरीरातली रोग प्रतिकारशक्ती जागृत होते आणि या आणि यासारख्या पेशींवर हल्ला करते.

यापूर्वी इतर कोणत्याही RNA प्रकारच्या लशींना माणसांसाठीच्या वापराची परवानगी मिळालेली नाही. पण इतर रोगांवर विकसित करण्यात आलेल्या RNA लशी काही ट्रायल्सदरम्यान लोकांना देण्यात आल्या होत्या.

फायझर आणि बायोNटेक या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीची अमेरिका, जर्मनी, ब्राझील, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या 6 देशांतल्या 43,500 लोकांवर चाचणी घेण्यात येतेय.

या लोकांना 3 आठवड्यांच्या अंतराने या लशीचे 2 डोस देण्यात आले. दुसरा डोस घेतल्यानंतर सात दिवसांमध्ये 90% संरक्षण मिळाल्याचं यामध्ये आढळलं. शिवाय यापैकी कोणामध्येही लशीच्या सुरक्षिततेविषयीची कोणतीही काळजीची बाब आढळली नाही.

या लशीविषयी अधिक वाचण्यासाठी क्लिक करा : कोव्हिडपासून 90 टक्के संरक्षण देणारी 'ही' नवीन लस कोणती?

ऑक्सफर्ड विद्यापीठ - अॅस्ट्राझेनका लस

या लशीमुळे ज्येष्ठ व्यक्तींच्या शरीरातही चांगली प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचंही आढळलं आहे.

  • या ट्रायल्समधल्या आकडेवारीवरून असं सूचित होतंय की लशीच्या डोसाचं प्रमाण बदलल्यास या लशीमुळे कोरोनापासून 90 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळण्याची शक्यता आहे.
  • युकेने या लशीच्या 10 कोटी डोसेसची ऑर्डर दिलेली आहे.
  • या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील.
  • 20,000 पेक्षा जास्त स्वयंसेवकांसोबतच्या चाचण्या अजूनही करण्यात येत आहेत.

सगळ्या लशींपैकी कदाचित ही लस वितरीत करणं सगळ्यात सोपं असेल कारण ही लस अतिशय थंड तापमानामध्ये साठवून ठेवावी लागणार नाही.

चिंपांझींमध्ये आढळणाऱ्या सर्दीच्या विषाणूंपैकी कमकुवत झालेले विषाणू घेत त्यामध्ये मानवामध्ये या विषाणूंची वाढ होऊ नये असे बदल करण्यात आले आहेत आणि त्यापासून ही लस तयार करण्यात आलीय.

या लशीच्या ट्रायल्सचे निकाल ख्रिसमसपूर्वीच येतील असं ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपच्या प्रा. अँड्र्यू पोलार्ड यांनी म्हटलं होतं.

भारतामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या घेत आहे आणि या लशीचं उत्पादनही करत आहे.

सिरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड (COVISHIELD) या कोरोनावरील लशीच्या तातडीच्या वापरासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. तसा परवानगीचा अर्ज केल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पुनावाला यांनी ट्विटरवरून दिली.

अदर पूनावाला यांनी ट्विटरवरून सांगितलं, "तुम्हा सगळ्यांना शब्द दिल्याप्रमाणे, 2020 साल संपण्याच्या आधीच सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड या मेड-इन-इंडिया लशीच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगीचा अर्ज केला आहे."

अदर पूनावाला यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही आभार व्यक्त केले आहेत.

ऑक्सफर्डची लस भारतामध्ये कोव्हिशील्ड या नावाने ही लस उपलब्ध असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच सिरम इन्स्टिट्यूटला पुण्यात भेट देत लशीच्या कामाची पहाणी केली होती.

सिरम इन्स्टिट्यूट कोव्हिड-19 च्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी देशभरात सुरू आहे. सोबतच सिरम इन्स्टिट्यूट अधिकचे 10 कोटी डोसेस तयार करणार आहे.

सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी भारतभरातल्या 17 शहरांमध्ये केली जात आहे.

सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायलचे निकाल याच वर्षी नोव्हेंबर अखेर वा डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत येण्याची अपेक्षा आहे.

या लशीचे 10 कोटी अधिक डोसेस तयार करून ते 2021 मध्ये भारतासोबतच लघु आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये देण्यात येणार असल्याचं सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केलंय.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था कोव्हिड-19 आजारावरील लशीचे 10 कोटी डोस 2021 सालच्या सुरुवातीपर्यंत बनवणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली होती.

या लशीच्या प्रत्येक डोसची किंमत 3 अमेरिकन डॉलर म्हणजे 225 रुपये असणार आहे. आणि याचे दोन डोस लोकांना घ्यावे लागतील.

सिरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेल्या एकूण डोसेसपैकी 90% उत्पादन भारत सरकारला 3 अमेरिकन डॉलर प्रति डोस दराने देण्यात येणार असून उर्वरित 10% डोसेसची खासगी विक्री करण्यात येणार असून ती जास्त दराने (सुमारे हजार रुपयांना) उपलब्ध होणार असल्याचं सायरस पूनावाला यांनी एच. टी. समिटमध्ये बोलताना सांगितलं होतं.

मॉडर्ना लस

अमेरिकेतल्या औषध नियामकांनी मॉडर्ना कंपनीची लस सुरक्षित असल्याचं म्हणत तिच्या वापराला मान्यता दिली आहे. अमेरिकेमध्ये मान्यता मिळणारी ही दुसरी लस आहे.

ही लस सुरक्षित असून 94% संरक्षण देत असल्याचं अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA)ने म्हटलंय.

मॉडर्ना कंपनीची लसही फायझरच्याच पद्धतीची आहे.

मॉडर्नानं कोरोना व्हायरसच्या लशीच्या व्यापक युरोपच्या नियामकांकडे मंजुरी मागितली आहे.

नियामक या एमआरएनए लशीच्या ट्रायलशी संबंधित आकडेवारी पाहून ही लस वापरणं सुरक्षित आहे की नाही याचा निर्णय घेतील.

ही लस 94.5% लोकांचं संरक्षण करत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या लशीचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने द्यावे लागतील.

एकूण 30,000 स्वयंसेवकांचा या मॉडर्ना लशीच्या ट्रायल्समध्ये सहभाग आहे. यापैकी अर्ध्यांना लस टोचण्यात आलेली आहे तर निम्म्या जणांना डमी इंजेक्शन्स देण्यात आली आहेत.

फायझरच्या लशीच्या तुलनेत ही लस साठवून ठेवणं सोपं असेल. ही लस -20 सेल्शियल तापमानाला 6 महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येईल.

लशीची गरज कशासाठी?

लोकसंख्येतल्या अनेक लोकांना अजूनही कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. सध्या विविध देशांमध्ये घातलेल्या किंवा यापूर्वी घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळेच आतापर्यंत अनेकांना याची लागण झाली नाही आणि मृत्यूंचा आकडा अजून वाढला नाही.

लस उपलब्ध झाल्यास ती मानवी शरीरातल्या रोग प्रतिकारक शक्तीला कोरोना विषाणूशी कसं लढायचं हे शिकवेल. यामुळे मुळातच कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही किंवा संसर्ग झालाच तर त्याचे गंभीर परिणाम होणार नाहीत.

लस आणि योग्य उपचार पद्धती या दोन्ही गोष्टी एकत्रित केल्या तरच कोरोना व्हायरसची ही जागतिक साथ आटोक्यात येऊ शकेल.

जगभरात सुरू असलेल्या कोरोना लशींच्या चाचण्या

जगभरात सध्या विविध कंपन्या लस तयार करण्यासाठीच्या प्रयत्नांत आहेत या लशींच्या चाचण्या विविध टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. यामध्ये 155 लशी सध्या क्लिनिकल ट्रायलच्या आधीच्या टप्प्यात आहेत. 22 लशींवर पहिल्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेत. म्हणजे मुळात ही लस सुरक्षित आहे का, हे तपासलं जातंय. तर 15 लशींवर दुसऱ्या टप्प्यातल्या सुरक्षा चाचण्या करण्यात येतायत.

10 लशी तिसऱ्या टप्प्यात आहेत. या लशींच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू आहेत आणि त्यांची परिणामकारकता तपासली जातेय. हे सगळे टप्पे पार पडल्यानंतरच एखाद्या लशीला मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला जातो.

रशियाची स्पुटनिक - 5 लस

रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक -5 लशीपासून 92% संरक्षण मिळत असल्याचा दावा तिथल्या संशोधकांनी केलाय. स्पुटनिक-5 ही लस डॉ. रेड्डी लॅबला देणार असल्याचं रशियाने म्हटलं आहे. स्पुटनिक-5 या लसीचे 10 कोटी डोस डॉ. रेड्डी लॅबला देणार असल्याचं रशियाने स्पष्ट केलं आहे.

या लशीचा पुरवठा 2020 वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. लशीसंदर्भातील चाचण्या आणि नियम यांच्या पूर्ततेनंतरच अधिक तपशील स्पष्ट होईल. फेज-3 ट्रायल पूर्ण होण्यापूर्वीच रशियाने लशीला परवानगी दिली. जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांमध्ये यामुळे साशंकतेचं वातावरण होतं.

लसीकरण मोहीमेसाठी भारताची तयारी सुरू

कोरोना लस भारतात कोणत्या पद्धतीने सर्वांना दिली जाईल, याबाबत केंद्र सरकारने एक नियमावली सोमवारी (14 डिसेंबर) जाहीर केली.

PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "दररोज प्रत्येक सत्रात 100 ते 200 लोकांचं लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर अर्धा तास त्या नागरिकांचं निरीक्षण करण्यात येईल. त्यांच्यावर लसीचा दुष्परिणाम तर होत नाही ना, यासाठी हे निरीक्षण करण्यात येणार आहे."

तसंच एका वेळी एकाच व्यक्तीला लसीकरण केंद्रात जाण्यासाठी परवानगी असेल.

2021च्या सुरुवातीच्या दोन तीन महिन्यात कोरोनावरची लस उपलब्ध झालेली असेल असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं. ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत 30 कोटी जनतेला लस देण्याची तयारी असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

ऑक्सफर्डच्या लशीचं उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे. या लशीसोबतच भारत सरकारने निर्माण केलेला टास्क फोर्स हा इतर औषध उत्पादक कंपन्यांसोबतही चर्चा करत असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले होते.

पण संपूर्ण देशाचं लसीकरण करू असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही. मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, असं वक्तव्य आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 1 डिसेंबर रोजी केलं.

कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर स्थितीत असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करू शकलो तर त्याद्वारे संसर्गाची साखळी तोडता येईल. त्यानंतर सगळ्या लोकसंख्येचं लसीकरण करण्याची आवश्यकता नाही, असं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं.

तर लस उपलब्ध झाल्यानंतर राबवण्यात येणाऱ्या मोहीमेसाठी महाराष्ट्रामध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलीय.

"लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लशीची उपलब्धता, लशीची संख्या, लशीचे दुष्परिणाम, लशीचा परिणाम, लशीवरील येणारा खर्च आणि त्याचे वितरण याबाबतीत महाराष्ट्रात एक टास्क फोर्स स्थापन केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

भारतीय लशींच्या चाचण्यांचं काय?

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च - ICMR आणि भारत बायोटेक मिळून तयार करत असलेलं 'कोव्हॅक्सिन' आणि झायडस कॅडिलाची 'ZyCovD' अशा दोन लसी भारतात विकसित करण्यात येत आहेत. सिरमच्या लशीसोबतच या लशींच्या कामाचीही पंतप्रधान मोदींनी पाहणी केली.

भारत बायोटेकनेही नियामकांकडे तातडीच्या वापरासाठीची परवानगी मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे.

यापैकी कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी सुरू झालेली आहे. भारतातल्या 22 शहरांमध्ये 26,000 स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी घेण्यात येत आहे.

तर झायडस कॅडिलाच्या 'ZyCoVD' लशीची दुसऱ्या टप्प्यातली चाचणी पूर्ण झालेली आहे.

लस कशी बनते?

मानवी शरीरातील पांढऱ्या पेशींचा रोग प्रतिकारकशक्तीमध्ये सहभाग असतो. शरीरात अत्यंत कमी प्रमाणात व्हायरस किंवा बॅक्टेरिया सोडण्यात येतो. शरीरातील संरक्षण यंत्रणा या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला ओळखते, तेव्हा त्याच्याशी कसं लढायचं हे शरीराला कळतं.

पुढच्या वेळी शरीरात पुन्हा अशा प्रकारचा व्हायरस आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराची तयारी असते.

गेल्या अनेक दशकांपासून एखाद्या विषाणूवर तयार करण्यात आलेल्या लसीकरणात त्याच विषाणूचा वापर होत आलेला आहे.

गोवर, देवी, कावीळ अशा रोगांसाठी अशाच प्रकारच्या लसींचा वापर केला जातो. तसंच फ्लूवरच्या लसीकरणातही याचा वापर होतो.

पण कोरोना व्हायरसवर लस बनवण्यासाठी नव्या पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. याचे जेनेटीक कोड उपलब्ध असून याचं परीक्षण होणं बाकी आहे. जेनेटीक कोडचा काही भाग घेऊन लस बनवण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञ आहेत.

किती लोकांना कोरोनावरच्या लशीची गरज आहे?

या वर्षांतला आणि कदाचित या शतकातला हा खूप गंभीर प्रश्न आहे. सध्याची जगाची कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली अवस्था पाहता जगातल्या 60 ते 70 टक्के लोकांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लशीची गरज आहे.

जर, कोरोनावर लस उपलब्ध झाली आणि ती परिणामकारक ठरली तर जगातल्या काहीशे अब्ज लोकांना ही लस टोचावी लागेल.

प्रथम लस कोणाला टोचली जाईल?

त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यांत ही लस कोणाला टोचावी याची आखणी करावी लागेल. यात प्रथम कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचावी लागेल. तसंच, ही लस जर सर्व वयोगटातल्या लोकांवर परिणामकारक ठरणारी असेल तर तिचा दुसऱ्या टप्प्यांत वापर वृद्ध किंवा 50 वर्षांच्यावरील लोकांवर करावा लागेल.

कारण, या वयोगटातील लोकांचं कोव्हिड-19 मुळे आजारी पडण्याचं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण मोठं आहे. तसंच, वृद्धांची काळजी घेणाऱ्या त्यांच्या निकटवर्तियांनाही ही लस यावेळी टोचावी लागेल. त्यानंतर जसं लशीचं उत्पादन वाढेल तशी ती सगळ्यांसाठी उपलब्ध होईल.

लस होईपर्यंत काय करावं?

लसीकरणामुळे माणूस आजार होण्यापासून वाचतो, हे खरं आहे. पण कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी स्वच्छता राखणं सर्वांत महत्त्वाचं आहे.

सुरक्षित अंतर पाळणं म्हणजेच सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. याशिवाय लक्षणं आढळल्यानंतर ताबडतोब पावलं उचलणं आणि सूचनाचं पालन करून आयसोलशेन वा क्वारंटाईन होणंही गरजेचं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)