You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: ऑक्सफर्डची लस 70 टक्के परिणामकारक
सर्व जगाचं लक्ष ज्या लसीकडे लागलेलं आहे ती ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोनाची लस 70 टक्के परिणामकारक असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.
फायजर आणि मॉडर्नाची लस 95 टक्के परिणामकारक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर हे निकाल थोडेसे निराशजनक असल्याचं म्हटलं जात आहे पण ऑक्सफर्डची लस स्वस्त आहे आणि जास्त काळ साठवून ठेवता येते असं संशोधकांनी सांगितलं आहे.
जर ही लस प्रमाणित करण्यात आली तर कोरोनावर विजय जिंकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
ज्या प्रक्रियेला साधारणतः दशक लागतं ती प्रक्रिया ऑक्सफर्डच्या संशोधकांनी 10 महिन्यांतच पूर्ण केली आहे.
या घोषणेमुळे या विषाणूमुळे झालेला विध्वंस संपविण्याच्या दृष्टिनं आपण अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे, असं या लशीवर संशोधन करणाऱ्या प्रोफेसर सारा गिल्बर्ट यांनी म्हटलं.
युकेनं या लशीचे 100 दशलक्ष डोस मागवले आहेत. या लशीमुळे 50 दशलक्ष लोकांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे.
चाचणीमधून काय आलं समोर?
कोरोना लशीच्या चाचणीत 20 हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यापैकी निम्मे स्वयंसेवक युकेमध्ये होते, तर उर्वरित ब्राझीलमध्ये होते.
ज्या स्वयंसेवकांना लशीचे दोन डोस देण्यात आले होते, त्यांपैकी 30 जणांमध्ये कोरोनाची लक्षणं पहायला मिळाली, तर ज्यांना डमी इंजेक्शन दिले होते, त्यांपैकी 101 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला.
ही लस 70 टक्के सुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
जेव्हा स्वयंसेवकांना या लशीचे दोन 'हाय डोस' देण्यात आले, तेव्हा कोरोनापासून संरक्षण मिळण्याचं प्रमाण 62 टक्के होतं. ज्यांना या लशीचा एक लो डोस आणि नंतर एक हाय डोस देण्यात आला, तेव्हा मात्र कोरोनापासून संरक्षणाचं प्रमाण हे 90 टक्के एवढं झालं.
या चाचण्यांचे प्रमुख संशोधक प्रोफेसर अँड्य्रू पोलार्ड यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, आम्ही या निष्कर्षांवर खूप खूश आहोत.
लस कधीपर्यंत उपलब्ध होईल?
युकेमध्ये चार दशलक्ष डोस आधीच तयार आहेत. युकेनं अजून 96 दशलक्ष डोसची मागणी केली आहे.
पण जोपर्यंत नियंत्रकांकडून लशीला मान्यता मिळत नाही, तोपर्यंत पुढे काही होणार नाही. नियंत्रकांकडून लशीची सुरक्षितता, परिणामकारकता आणि ती उच्च मानकांचा पालन करून तयार केली जाते की नाही याचं मूल्यमापन केलं जातं. ही सर्व प्रक्रिया येत्या काही आठवड्यात पार पडेल.
अर्थात, युकेनं सर्वांना ही लस कशी देता येईल यासंबंधीची तयारी सुरू केली आहे. पण याचा परिणाम हा फ्लूच्या लशीच्या वितरणावर किंवा लहान मुलांच्या लसीकरण कार्यक्रमावर होऊ शकतो.
लस देण्यासाठी केअर होममध्ये राहणारे वृद्ध आणि तिथल्या स्टाफला प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर आरोग्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. त्यानंतर विविध वयोगटानुसार लस देण्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल.
ही लस काम कशी करते?
चिंपाझींमध्ये वापरल्या जाणाऱ्या लशीचंच हे जेनेटिकली मॉडिफाइट व्हर्जन आहे.
त्यामध्ये कोरोनाव्हायरसची ब्ल्यूप्रिंट अल्टर करण्यात आली आहे.
जेव्हा ही ब्लूप्रिंट शरीरात जाते, तेव्हा ती कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटीन तयार करायला सुरूवात करते. त्यामुळे प्रतिकारशक्ती तयार होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)