You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महापालिका निवडणूक : एक मत की अनेक? प्रभाग पद्धतीत मतदान कसं होतं, मतदारांनी नेमकं काय करायचं? जाणून घ्या
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्रातल्या 29 पैकी 28 महानगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धतीने निवडणुका होत आहेत.
मुंबई वगळता इतर सगळीकडे मतदारांना आपल्या प्रभागातून एकापेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे आहेत. पण यासाठी मतदान नेमकं कसं करायचं?
मतदान केंद्रात तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला काय दिसेल?
मुंबईत 227 नगरसेवक निवडून दिले जातील, प्रत्येक वॉर्डमधून एक. पण राज्यातल्या इतर महानगरपालिकांमध्ये एकाच वॉर्डमध्ये कुठे तीन. तर कुठे चार, तर कुठे पाच उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
प्रभाग पद्धतीत मतदान कसं करतात?
तुमच्या महानगरपालिकेत एका प्रभागातून जितके उमेदवार निवडून द्यायचे असतील तसे त्याचे अ ब क ड इ वगैरे भाग केले गेलेत.
प्रत्येक भागातून तुम्हाला एक उमेदवार निवडून द्यायचा आहे. हा प्रत्येक भाग वेगळा ओळखू यावा यासाठी प्रत्येक भागाला वेगळा रंग दिला गेलाय.
उदाहरणार्थ, अ भागात जितके उमेदवार उभे असतील तितक्या उमेदवारांची नावं आणि त्यांची निवडणूक चिन्हं त्यांच्यापुढे दिसतील. तुम्हाला तुमच्या आवडीच्या उमेदवारासमोरचं बटन दाबून मत नोंदवायचं आहे. ते बटन दाबलं की लाल लाईट लागेल.
जितके भाग असतील त्या प्रत्येक भागात तुम्हाला एक उमेदवार निवडायचा आहे किंवा जर तुम्हाला एकही उमेदवार पसंत नसेल तर NOTA चं बटन दाबण्याचाही पर्याय तुमच्याकडे असेल.
सगळ्या जागांसाठी तुम्ही मतं दिलीत, म्हणजे तितकी बटनं दाबलीत की मग बीप आवाज येईल. त्यानंतरच तुम्ही तुमचा मतदान कक्ष सोडून बाहेर पडायचंय. जोपर्यंत बीप आवाज येत नाही, तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
एकाच प्रभागात वेगवेगळ्या उमेदवारांना मत देता येतं का?
प्रत्येक पक्षाकडून किंवा युती - आघाडीकडून एका प्रभागात उमेदवार देण्यात आलेत. पण याचा अर्थ तुम्ही एकाच पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक प्रभागात मत देणं बंधनकारक आहे का?
अजिबात नाही. तुम्ही प्रत्येक भागात तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला मत द्या. जर तुम्हाला एकही उमेदवार पसंत नसेल तर NOTA चं बटन दाबा. पण जितके भाग असतील, म्हणजे 3, 4 किंवा 5 तितक्या सगळ्यांमध्ये मत दिल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही.
या निवडणुकीत VVPAT नसणारे, म्हणजे तुम्ही मत दिलंत की ते कुणाला गेलंय याची स्लिप दाखवणारं मशीन तुम्हाला दिसणार नाही. यावरूनही विरोधी पक्षांनी आक्षेप घेतले होते, पण निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट घोषणा आधीच करून झालीय. त्यात बदल झाला नाही.
तुमच्या प्रभागात किती सदस्य?
तुमच्या प्रभागातून किती सदस्य निवडून द्यायचे आहेत हे तुम्हाला प्रचारातून कळलं असेलच. साधारणपणे सर्व प्रभागांमध्ये समान सदस्यसंख्या आहे. पण काही अपवाद असू शकतात.
उदाहरणार्थ, संभाजीनगर महानगरपालिकेत 29 प्रभाग आहेत आणि 115 नगरसेवक निवडले जातील. या 29 पैकी 28 ठिकाणी प्रत्येकी 4 नगरसेवक आहेत आणि एका प्रभागात 3 नगरसेवक आहेत.
जालन्यात 16 प्रभागांमधून 65 नगरसेवक निवडले जाणार आहेत. एका प्रभागात 5 नगरसेवक आहेत आणि उरलेल्या 15 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 नगरसेवक असणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)