भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

आता या गोष्टीला साडेचारशे वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. पोर्तुगीजांचे पाय भारताच्या पश्चिम किनाऱ्याला लागूनही अनेक वर्षं लोटली होती.

वास्को द गामा 1498 साली कालिकतमध्ये आला त्यानंतर पोर्तुगीजांनी व्यापार आणि धर्मप्रसारासाठी महत्त्वाच्या जागा हेरायला सुरुवात केली.

1510 साली अल्फान्सो दि अल्बुकर्क गोव्यात आला आणि त्यांचं लक्ष आणखी उत्तरेकडच्या प्रदेशांत जायला लागलं.

लवकरच पोर्तुगीजांची इच्छा पूर्ण झाली. 1513 मध्ये पोर्तुगीजांना रेवदंड्यात लहानसा किल्ला बांधायची परवानगी मिळाली. मग ठाणे कल्याण, तारापूर अशा गावांवर त्यांची नजर गेली. त्यातच वसईत आधीच असलेल्या लहानशा किल्लेवजा जागेवर त्यांचा डोळा होताच.

थोड्याच काळात म्हणजे 1533 मध्ये पोर्तुगीजांनी वसईच्या आजच्या किल्ल्याची जागा जिंकली आणि आपले पाय पुढच्या दोनशे वर्षांसाठी भक्कमपणे रोवले.

या रोवलेल्या पायांनी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल बदललाच पण महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवाहातही मोठे बदल झाले.

बहुसांस्कृतिक अशा महाराष्ट्राच्या ओळखीत एक नवा धर्म आणि संस्कृती, भाषा समाविष्ट झाली. यात कधी युद्ध, धाकदपटशाही आणि बळजबरीचेही प्रसंग आले हे नाकारता येत नाही.

वसईला महत्त्व का आलं?

वसई हे शहर मुंबईपासून उत्तरेस साधारण 50 किमी अंतरावर आहे. एकेकाळी ठाणे जिल्ह्यात असणारं हे शहर आता पालघर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्याला ब्रिटिश काळात बॅसिन, बेसिन अशा नावानं ओळखलं जात होतं.

पोर्तुगीजांनी इथं कसे पाय रोवले याची माहिती घेणं आवश्यक आहे. पोर्तुगीजांच्या भारतातील उत्तरेतील प्रांताचं नाव प्रोविन्सिया दो नोर्टे असं होतं.

यामध्ये उत्तरेस दमण ते दक्षिणेस करंजा असा साधारण 200 किलोमीटरचा प्रांत येत होता. त्यात दीव बेट आणि चौलही येत होते. हा भाग त्यापूर्वी गुजरात आणि अहमदनगरच्या (अहमदनगरची निजामशाही) राज्यात होता.

या त्यांच्या प्रांताची वसई ही राजधानी होती. गुजरातच्या सुलतानाने मुघलांशी लढण्यासाठी मदत मागताना वसईचा ताबा पोर्तुगीजांना दिला आणि इथं पोर्तुगीजांनी दीर्घकाळ आपला ताबा ठेवला.

वसईच्या किल्ल्याचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्यामते मात्र या किल्ल्याचा असा गुजरातच्या सुलतानाचा थेट संबंध असल्याचा पुरावा सापडत नाही.

ते सांगतात, "हा किल्ला 12 व्या शतकात भोंगळे राजांनी बांधला असे उल्लेख आणि पुरावे सापडतात. त्यावेळेस बालेकिल्ला आणि काही बांधकामं झाली होती, ती आजही दिसून येतात."

गुजरातच्या सुलतानाच्या काळात झालेलं थोडंफार बांधकाम पोर्तुगीजांच्या काळात वेगानं वाढलं. किल्ल्याला आतून बाहेरून रुप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधकामांना सुरुवात झाली.

आतमध्ये बालेकिल्ला, चर्चेस, इमारती, राहाण्याच्या जागा, बाहेर बुरुज असलेली मोठी तटबंदी असं बांधकाम पोर्तुगीजांनी वेगानं करायला सुरुवात केली.

वसईच्या किल्ल्याचा प्रदेश एखाद्या बेटासारखा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे. दक्षिण आणि नैऋत्येला उल्हास नदी ज्याला वसईची खाडी असंही म्हटलं जातं. आणि त्याचाच एक फाटा पूर्वेला होता. तो सर्व भाग आता गाळाने भरलेला दिसून येतो. अशाप्रकारे जमिनिशी जोडलेला पण पाण्याने वेढलेला या किल्ल्यात पोर्तुगीजांनी एका शहरासारखी व्यवस्था तयार केली होती.

त्यांनी 1536 पासून 1739 पर्यंत किल्ल्यावर घट्ट पकड ठेवली आणि त्यानंतर तो मराठी साम्राज्यात सामील झाला.

वसईचा किल्ला

पोर्तुगीजांनी 1536 साली हे शहर वसवलं आणि इथली सगळी बांधकामं केली होती. महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि भारतातील किल्ल्यांवर प्रेम असणाऱ्या व्यक्तीला वसई हे नाव माहिती नसणं विरळाच. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या वसईचा किल्ला गेल्या चारशेहून अधिक वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे.

वसईचा किल्ला हा व्यापाराच्या नावाखाली पोर्तुगीजांनी भारतात किती बळकटपणे पाय रोवले होते आणि त्यांना तिथून उखडून टाकण्यासाठी मराठी सत्ता तितकीच कशी सामर्थ्यवान होती याचं उदाहरण म्हणावं लागेल.

वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांनी केलेल्या मोहिमेमुळे इतिहासात प्रसिद्ध झालाच त्याहून वसईची मोहीम, वसईची लढाई या नावाने त्याला विशेष स्थान मिळालं.

हे स्थान पोर्तुगीजांच्या महाराष्ट्रातल्या कोर्लई, चौलसारख्या किल्ल्यांना मिळालेलं नाही.

या किल्ल्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर बुरुज असलेली याची भक्कम तटबंदी. या किल्ल्याला दोन दरवाजे असून त्यातला एक दरवाजा मुख्य भूमीच्या दिशेने आणि दुसरा खाडीच्या दिशेने उघडतो. साओ सेबेस्टिओ, साओ पाअलो, साओ पेद्रो, सेंट फ्रान्सिस झेवियर अशा प्रकारचे अनेक बुरुज या किल्ल्याच्या कोटाला आहेत.

या किल्ल्यात तीन चर्चेस आणि जेसुईटांच्या अध्ययनासाठी कॉलेजही होतं. आतमध्ये रस्ते आणि वस्त्यांची विशेष रचना करण्यात आली होती. किल्ल्यातच एक तुरुंग आणि कोर्टही होतं.

या किल्ल्यात बाजारपेठ वसवण्यात आली होती तसेच वज्रेश्वरी मंदिरही आहे. पेशव्यांनी किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर बुरुजांची नावं बदलण्यात आली होती.

यशवंत, कल्याण, भवानी मार्तंड, वेताळ, दर्या अशी बुरुजांची नावं ठेवण्यात आली होती. अशाप्रकारे वसई किल्ला हे बालेकिल्ल्याच्या भोवती वसलेलं एक शहरच तयार झालं होतं.

पोर्तुगीजांच्या काळात याच्या बालेकिल्ल्याला 'फोर्टे दे साओ सेबॅस्टिओ' असं नाव होतं.

ही जागा किल्ल्याच्या साधारण मध्यभागी आहे. सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या तटबंदीवर असलेल्या 10 बुरुजांद्वारे किल्ल्याचं रक्षण होत असे.

मराठ्यांनी किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर 1739 पासून मराठा साम्राज्य असेपर्यंत म्हणजे 1818 पर्यंत किल्ल्यावर त्यांचंच राज्य होतं. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात त्याकडे फार लक्ष देण्यात आलं नाही. इंग्रजांनी किल्ला भाडेतत्वाने कारखान्यासाठी दिला. मात्र या काळात पडझड सुरूच राहिली. पोर्तुगीजांच्या काळात मोठ्या प्रमाणात इथं बांधकामं झाल्यामुळे एवढी पडझड होऊनही या इमारतींचे अवशेष दिसून येतात.

ब्रिटिशांनी लिटिलवूड नावाच्या व्यक्तीला साखर कारखान्यासाठी हा किल्ला दिला. मात्र अपेक्षित पैसा न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या लिटिलवूडने किल्ल्यातले दगड विकून पैसे उभारायला सुरुवात केली. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत मोठी बांधकामं होत होती. या बांधकामांसाठीही किल्ल्याचे दगड वापरले गेले.

वसईसारखं मोठं ठाणं हाती आल्यावर पोर्तुगीज राजांनी त्याला शहराचा दर्जा दिला. किल्ल्यामध्ये नगरपालिका, वस्त्या, रुग्णालय, शाळा, कॉलेज, चर्चेसची बांधणी करुन बस्तान बसवलं.

पोर्तुगीज वसाहतीतल्या श्रीमंत माणसांना फिदाल्गो दि वसई म्हणजे वसईचा उमराव असं संबोधलं जाऊ लागलं. एकदा आर्थिक आणि राजकीय सत्ता स्थापन झाल्यावर धर्मप्रसारासाठी पावलं उचलायला सुरुवात केली.

किल्ल्यामध्ये फ्रान्सिस्कन, जेसुईट, डॉमिनिकन, ऑगस्टिनियन, हॉस्पिटॅर्ल्स अशा धार्मिक संघटनांनी आपापली चर्चेस उभी केली. यामुळेच अनेक स्थानिक लोकही ख्रिश्चन झाले किंवा पोर्तुगीज आणि स्थानिक महिलांचे विवाह झाले.

गोन्सालो गार्सिया

याच पोर्तुगीज सैनिक आणि स्थानिक महिलांच्या विवाह पद्धतीतून अनेक नव्या नागरिकांचा जन्म झाला. यात समावेश होता गोन्सालो गार्सिया यांचा.

गोन्सालो गार्सिया यांचा जन्म 1557 साली वसईजवळच्या आगाशी इथं झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गार्सिया होतं आणि आईला कनारिना किंवा कनारिसे असं संबोधलं जायचं असं डॉ. रजीन डिसिल्वा आपल्या 'गाथा वसईच्या सुपुत्राची' या पुस्तकात लिहितात.

डॉ. डिसिल्वा हे इतिहास अभ्यासक असून वसईच्या गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाचे ते माजी प्राचार्य आहेत.

डॉ. रजीन यांच्यामते त्याकाळी पोर्तुगीजांनी स्थानिक महिलांशी विवाह करण्यासाठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे पोर्तुगीज राजवटीच्या सुरुवातीच्या काळामध्ये गोवा, चौल, वसई, दीव, दमण या वसाहतींमध्ये असे विवाह झाले.

असं लग्न केल्यामुळे त्यांच्या आईवडिलांना किल्ल्यात राहायची संधी मिळाली आणि सैनिकी पेशा सोडून दुसरा व्यवसाय करण्याची मुभा मिळाली. त्यामुळे गोन्सालो गार्सियाचं बालपण किल्ल्यातच गेलं.

आईवडिलांचं छत्र लवकरच हरपलं तरी त्यांना जेसुईटांच्या मठात राहाण्याची संधी मिळाली. इथंच त्यांना सेबॅस्टियन गोन्साल्विस यांच्यासारखे गुरू मिळाले आणि ते अल्तार बॉय म्हणून काम करू लागले.

जपानला जाण्याची संधी

अशाप्रकारे जेसुईटांबरोबर धर्मशिक्षणाला सुरुवात केलेल्या गोन्सालो गार्सिया यांना वेगवेगळ्या भाषा शिकण्याची संधी मिळाली.

स्थानिक मराठी, कोकणीबरोबर पोर्तुगीज, लॅटिन भाषा त्यांनी आत्मसात केल्या. थोड्या वर्षांतर मिशनऱ्यांनी जपान आणि पूर्व आशियात धर्मप्रसाराला जायचं ठरवल्यावर गोन्सालो गार्सिया यांना अगदी अल्पवयात जपानला जायची संधी मिळाली. त्यामुळे त्यांनी जपानी भाषाही शिकून घेतली.

जपानला गेल्यावर मिशनबरोबर गरिबांना मदत करायचं काम त्यांनी सुरू ठेवलं. मात्र तिथं धर्मशिक्षक म्हणून काम करत असताना त्यांना धर्मगुरू म्हणजे फादर व्हायची इच्छा होती.

पण ते युरोपियन वंशाचे नसल्यामुळे त्यांना ती संधी नाकारण्यात आली. त्यामुळे गोन्सालो यांच्या उत्साहावर अचानक पाणी पडलं. त्यांनी जेसुईट संघाला निरोप दिला आणि ते थेट व्यापारी झाले. फिलिपाईन्समध्ये व्यापाराला सुरुवात करुन त्यांनी आपलं मन रिझवण्याचा प्रयत्न केला.

मात्र काही काळातच जपानचा तेव्हाचा राजा सम्राट हिदौशीने मिशनऱ्यांना जपानमध्ये आमंत्रित केलं. त्यामध्ये गोन्सालो यांचा समावेश होता.

सुरुवातीच्या काळात हिदौशीनं या सर्वांना चांगला पाठिंबा दिला. त्यामुळे जपानमध्ये परतल्यावर गोन्सालो यांनी कुष्ठरोग्यांना मदत, अनाथाश्रमात काम करुन जोमानं प्रयत्न सुरू केले. त्याचप्रमाणे धर्मप्रसाराचं कामही वेगानं सुरू केलं. यावेळेस ते फ्रान्सिस्कन मठात काम करत होते. अशाप्रकारे भारतीय वंशाची पहिली व्यक्ती जपानमध्ये मिशनरी म्हणून काम करू लागली.

वारं फिरलं, तारुण्यातच शिक्षा

असं असलं तरी ही हिदौशीचं हे पाठबळ फारकाळ टिकलं नाही. स्थानिक धर्मातल्या लोकांना आणि त्यांच्या धर्मगुरूंना हे बाहेरचे लोक आल्यामुळे जपानवर संकटं येत आहेत असं सांगण्याचं कारण मिळालं.

जपानमध्ये धूळ आणि पावसाचा लाल पाऊस पडला, भूकंप झाला की या मिशनऱ्यांना दोषी ठरवलं जाऊ लागलं. हळूहळू या मिशनऱ्यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यात आलं. हिदौशीच्या कानावरही या तक्रारी घालण्यात आल्या. हे लोक धर्मप्रसाराबरोर छळ करतात असा समजही हिदौशीचा झाला. याचा परिणाम म्हणून शेवटी या मिशनऱ्यांना शत्रू ठरवून त्यांना मारण्याचा आदेश त्यानं दिला.

यामुळेच 5 फेब्रुवारी 1597 रोजी गोन्सालो यांच्यासह त्यांच्या 25 सहकाऱ्यांना क्रुसावर चढवून मारण्यात आलं. नागासाकीच्या ज्या टेकडीवर ही शिक्षा देण्यात आली त्याला कालांतरानं तीर्थस्थळाचं रूप आलं.

संतपद

1597 साली क्रुसावर चढवलेल्या गोन्सालो गार्सिया यांना संत म्हणून घोषणा करायला मात्र दोन शतकं केली. 1862 साली पोप नववे पायस यांनी गोन्सालो आणि त्यांच्या 25 सहकाऱ्यांना संतपद घोषित केलं.

इतिहास अभ्यासक प्रशांत घरत बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "संत गोन्सालो गार्सिया हे एक इतिहास, श्रद्धा आणि भूगोल एकत्र आणणारं दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे."

"भारतीय ख्रिस्ती इतिहासात संत गोन्सालो गार्सिया यांचे स्थान अनन्यसाधारण आहे, कारण ते भारतीय वंशातील पहिले संत मानले जातात. भारतातील ख्रिस्ती धर्म त्या काळी युरोपीय सत्तांसोबत घट्ट जोडलेला असताना, त्यांच्या आयुष्याने दाखवून दिले की हा धर्म स्थानिक पातळीवरही रुजला होता. पुढे त्यांनी फ्रान्सिस्कन संघात प्रवेश घेतला आणि जपानमध्ये शहीद झाले, ज्यामुळे त्यांच्या कहाणीला व्यापक, जागतिक आयाम मिळाला. ते 16व्या शतकात निधन पावले असले तरी त्यांचे संतपद घोषित होणे बऱ्याच उशिरा झाले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या दीर्घकालीन प्रभावाचा अंदाज येतो."

वसईनं जपली आठवण

जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे. वसईच्या गोन्सालो गार्सिया महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या प्राध्यापिका ट्रिझा परेरा याबद्दल अधिक माहिती देतात.

बीबीसी मराठीला माहिती देताना त्या सांगतात, "वसईच्या किल्ल्यात एक मोठे चर्च 1549 साली बांधलं गेलं. हे चर्च नंतर गोन्सालो गार्सिया यांना समर्पित करण्यात आलं. गोन्सालो यांच्या आयुष्यातली आठ वर्षं याच किल्ल्यात गेली होती. त्यांच्या नावानं हे चर्च आजही उभं आहे. त्याचप्रमाणे बऱ्हामपूर, गास या वसईजवळच्या गावांमध्ये त्यांच्या नावाने चर्चेस उभी केलेली आहेत. तसेच अनाथालय आणि शाळाही चालवली जाते. त्यांच्याच नावानं वसईत आज गोन्सालो गार्सिया महाविद्यालय उभं आहे, तिथं गोन्सालोंची स्मृति जपत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गोन्सालो यांच्या आगाशीतल्या मूळघराचं स्मारक होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)