You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : कोव्हिड-19 वर एकापेक्षा जास्त 'लशी' असतील?
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य प्रतिनिधी
कोव्हिड-19 या संसर्गजन्य आजारावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. यातल्या सर्वाधिक अपेक्षा असलेल्या मोजक्या लसींपैकी एक असलेल्या ऑक्सफोर्डच्या लस संशोधनात संशोधक एका महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहेत.
"ख्रिससमसपूर्वी या लसीच्या अंतिम चाचण्यांचे निकाल येतील," असं ऑक्सफोर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे प्रा. अँड्रू पोलार्ड यांनी सांगितलं आहे. ते बीबीसी रेडियो-4 च्या टुडे प्रोग्राम या कार्यक्रमात बोलत होते.
ही लस कोव्हिड-19 ची लागण होण्यापासून रोखू शकेल का, याचं उत्तर आता लवकरच मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं. टुडे प्रोग्रामशी बोलताना प्रा. पोलार्ड म्हणाले, "लस संशोधनातली प्रगती बघता ख्रिसमसपूर्वी नक्कीच निकाल हाती येतील."
अंतिम चाचण्यांचे निकाल हाती आल्यानंतर लस निर्मितीच्या प्रक्रियेस गती येईल आणि लवकरच कोरोना आटोक्यात येऊ शकेल असा अंदाज आहे.
"याआधीच चाचण्यांचे निकाल हाती येणं अपेक्षित होतं. मात्र, उन्हाळ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या घटली होती. त्यामुळे संशोधनाचा वेगही मंदावला होता.
"मात्र, गेल्या महिनाभरात केवळ युकेमध्येच नाही तर ऑक्सफोर्ड लसीची चाचणी सुरू असलेल्या इतरही अनेक देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आणि त्यामुळे संशोधनाला वेग आला आणि आता ख्रिसमसपूर्वी सर्व चाचण्यांचे निकाल हाती येतील आणि एका ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल," असं प्रा. पोलार्ड यांचं म्हणणं आहे.
आतापर्यंतच जे निकाल हाती येत आहेत त्यावर समाधानी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या लसीविषयी सांगताना ते म्हणाले, "सर्वच वयोगटात या लसीचा प्रतिसाद सारखाच आहे. अगदी 70 वर्षांहून मोठ्या व्यक्तींमध्येसुद्धा. इतकंच नाही तर 55 वर्षांहून मोठ्या व्यक्तीसुद्धा या लसीला चांगला प्रतिसाद देत आहेत."
"शरीराने लसीला चांगला प्रतिसाद देणे म्हणजे लसीचे कुणावरही दुष्परिणाम दिसून आलेले नाही. सर्वच वयोगटातल्या व्यक्ती लसीला उत्तम प्रतिसाद देत असतील तर जगभरात लस पोहोचवण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिवाय, यामुळे वृद्धांमधलं कोव्हिड-19 मुळे होणारं मृत्यूचं प्रमाणही कमी होईल," पोलार्ड सांगतात.
'ऑक्सफर्डची लस गेमचेंजर ठरेल'
ऑक्सफोर्डची लस 'गेम चेंजर' ठरेल, अशी आशा असल्याचं युके सरकारच्या विज्ञानविषयक सल्लागार गटाचे सदस्य डॉ. मिशेल टिल्डस्ले यांनी बीबीसी ब्रेकफास्ट कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
"यूके सरकारने ऑक्सफोर्ड लसीचे 10 कोटी डोस आधीच बुक करून ठेवले आहेत. सर्व चाचण्यांमध्ये लस यशस्वी ठरली तर एवढ्या डोसने ब्रिटन हर्ड इम्युनिटीचा टप्पा गाठेल," असंही डॉ. टिल्डस्ले यांचं म्हणणं आहे.
ऑक्सफोर्डच्या चाचण्यांमध्ये साठी आणि सत्तरीतल्या व्यक्तींमध्ये चांगले परिणाम आढळून आले आहेत. त्यामुळे कोव्हिडचा सर्वाधिक धोका असणाऱ्या वयोगटातल्या लोकांसाठी ही संजीवनीच ठरणार आहे.
560 सुदृढ प्रौढांवर करण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्याचे परिणाम 'उत्साहवर्धक' असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये 'Pfizer', 'BioNTech' आणि 'Moderna' या कंपन्यांनी कोरोना व्हायरस विरोधातील 'लशी' च्या क्लिनिकल चाचण्यांचे परिणाम अत्यंत चांगले आल्याचा दावा केला आहे.
बेल्जियमची कंपनी 'Janssen' कडून बनवण्यात आलेल्या कोरोना विरोधातील 'लशी' ची इंग्लंडमध्ये चाचणी होत आहे.
आपल्याला लशींची गरज का आहे?
कोव्हिड-19 मुळे थांबलेलं जनजीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी आपल्याला लशींची गरज आहे.
सद्य स्थितीतही जगभरात मोठ्या संख्येने लोक कोव्हिड-19 च्या संसर्गाला बळी पडण्याची शक्यता आहे. कोव्हिड-19 विरोधातील लढ्यात प्रत्येक व्यक्तीने आपल्यावर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. या बंधनांमुळेच आपण कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंवर प्रतिबंध घालू शकलो आहे.
एक सुरक्षित आणि प्रभावी 'लस' आपल्या शरीराला कोरोनाच्या संसर्गाविरोधात लढायला शिकवेल. ही लस, आपला कोरोना व्हायरसपासून बचाव करेल किंवा कोव्हिड-19चा त्रास कमी करण्यास मदत करेल.
कोरोना व्हायरसविरोधी प्रभावी लस आणि उत्तम दर्जाची उपचारपद्धती यांच्या मदतीने आपण कोरोना व्हायरसविरोधातील युद्ध जिंकू शकतो. या महामारीतून बाहेर पडण्याचा हाच मार्ग आहे.
कोणती लस सर्वांत जास्त प्रभावी आहे?
'Pfizer' आणि 'BioNTech' या औषध बनवणाऱ्या कंपन्यांनी सर्वांत आधी आपल्या लशीचे अंतीम टप्प्यातील चाचण्यांचे परिणाम जाहीर केले.
कंपनीच्या दाव्याप्रमाणे, त्यांची लस 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा या संसर्गापासून बचाव करेल.
जवळपास 43,000 लोकांना ही लस देण्यात आली असून. सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही प्रश्न किंवा भीती अजूनही समोर आलेली नाही.
दुसरीकडे, 'Moderna' या कंपनीने अमेरिकेत 30,000 लोकांवर लशीची चाचणी केली. ज्यातील जवळपास 50 टक्के लोकांना डमी (Dummy) इंजेक्शन देण्यात आली होती.
कंपनीचा दावा आहे की, त्यांची लस 94.5 टक्के लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी आहे. लशीच्या ट्रायलमध्ये सहभाग घेतलेल्या पहिल्या 95 स्वयंसेवकांपैकी फक्त 5 लोकांना कोव्हिड-19 सदृष्यं लक्षणं आढळून आली. ज्यांना खरी लस देण्यात आली होती.
औषध बनवणारी ब्रिटीश कंपनी 'AstraZeneca' आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बनवेल्या कोव्हिड-19 विरोधी लशीच्या अंतीम चाचण्यांचे परिणाम येत्या काही आठवड्यांमध्ये समोर येतील.
दरम्यान, रशियाने बनवलेल्या 'स्पुटनिक-5' लशीचे परिणामही समाधानकारक असल्याची माहिती आहे.
रशियन शास्त्रज्ञांचा दावा आहे की त्यांनी निर्माण केलेली कोरोना व्हायरस विरोधातील लस 92 टक्के प्रभावी आहे. या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे परिणाम जाहीर करण्यात आले आहेत. 'Pfizer' ने ही त्यांनी निर्माण केलेल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्याचे परिणाम जाहीर केले आहेत.
कोणत्या'लशी' विकासाच्या टप्प्यावर आहेत?
जगभरातील विविध देशात कोव्हिड-19 विरोधातील लशीच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांच्या अंतीम टप्प्याचे निकाल येत्या काही आठवड्यात किंवा महिन्यात येण्याची अपेक्षा आहे.
बेल्जियमची कंपनी "Janssen' इंग्लंडमध्ये 6,000 स्वयंसेवकांवर लशीची चाचणी करणार आहे. जगभरात 30,000 लोकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.
कंपनीकडून एक मोठी चाचणी सुरू करण्यात आली आहे. ज्यात स्वयंसेवकांना लशीचा एक डोस देण्यात येईल. त्यानंतर, दोन डोस दिल्याने जास्त काळासाठी आणि मजबूत रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते का, याचा अभ्यास केला जाईल.
जगभरातील विविध देशात कोव्हिड-19 विरोधातील लशीवर संशोधन सुरू आहे. 'वुहान इन्स्टिट्युट ऑफ बायलॉजिकल प्रॉडक्ट्स', चीनमध्ये 'सिनोफार्म', रशियामध्ये 'गमलेया' रिसर्च इन्स्टिट्युट यांच्याकडून निर्माण केल्या जाणाऱ्या लशी देखील अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत.
मात्र, ब्राझीलमध्ये चीनी कंपनी 'सिनोव्हॅक' कडून निर्माण केल्या जाणाऱ्या लशीची चाचणी रद्द करण्यात आली आहे. या चाचणीदरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला होता.
विकासाच्या टप्प्यावर असणाऱ्या लशींचं वेगळेपण काय?
'लशी' चं महत्त्व म्हणजे, शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला सुरिक्षतरित्या व्हायरसच्या संपर्कात येऊ देणं. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला, व्हायरस शरीरात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळेल. आणि आपल्या शरीरातील रोकप्रतिकारक शक्ती त्याचा मुकाबला करेल.
असं करण्याचे अनेक मार्ग आहेत.
'Pfizer', 'BioNTech' ने 'RNA' लशीची निर्माती केली आहे. याचा सद्य स्थितीत प्रायोगिक तत्वावर अभ्यास केला जात आहे. यामध्ये, कोरोना व्हायरसचा गुणसूत्रीय कोड शरीरात सोडला जातो आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला ट्रेनिंग दिलं जातं.
याउलट, 'Janssen' कंपनीच्या लशीत सर्दीला कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरसचा वापर करण्यात आला आहे. या व्हायरसमध्ये काही गुणसूत्रीय बदल करून त्याला निरूपद्रवी बनवण्यात आलं आहे.
जेणेकरून हा व्हायरस 'कोरोना' सारखा दिसेल. याच्या मदतीने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसला ओळखून त्याविरोधात लढण्यास सक्षम होईल.
त्याचप्रमाणे, ऑक्सफर्ड आणि रशियात निर्माण केल्या जाणाऱ्या लशीतही 'चिंपाझी'ला संसर्ग करणाऱ्या निरुपद्रवी व्हायरसचा वापर करण्यात आला आहे. या व्हायरसमध्ये गुणसूत्रीय बदल करून त्याला कोरोना व्हायरससारखं बनवण्यात आलं आहे. जेणेकरून शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीकडून प्रतिसाद मिळेल.
चीनमध्ये बनवण्यात येणाऱ्या लशीत कोरोना व्हायरचा वापर करण्यात आला आहे. पण, हा व्हायरस असक्षम आहे. ज्यामुळे संसर्गाची भीती नाही.
कोणत्या पद्धतीचा वापर केल्याने चांगले परिणाम दिसून येतात यावर अभ्यास गरजेचा आहे. ज्या आव्हानात्मक चाचण्यांमध्ये लोकांना ठरवून संक्रमित केलं जातं. यांच्या अभ्यासावरून या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.
लस केव्हा उपलब्ध होईल?
'Pfizer' ने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाअखेरीस कंपनी जगभरात 50 दशलक्ष डोस पुरवू शकते. आणि 2021 च्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस कंपनीकडून मिळू शकतात.
ब्रिटनमध्ये 10 दशलक्ष डोसेस या वर्षाअखेरीस मिळू शकतात. 30 दशलक्ष डोसची ऑर्डर देण्यात आली आहे.
'AstraZeneca' आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने फक्त ब्रिटनमध्ये 100 दशलक्ष डोस पुरवण्याचं मान्य केलं आहे. तर, 2 अब्ज डोस जगभरात पुरवले जाणार आहेत.
ब्रिटनची 'Moderna' कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.
लस कोणाला मिळणार?
कोव्हिड-19 विरोधात प्रभावी लस उपलब्ध झाल्यानतंर कोणत्या भागात आणि कोणत्या वयोगटातील लोकांमध्ये कोरोना संसर्ग जास्त पसरतो आहे यावर लस कोणाला दिली जाणार हे ठरेल.
ब्रिटनमधील ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था आणि या संस्थामध्ये काम करणारे कर्मचारी सरकारच्या प्राथमिक यादीत सर्वांत वर आहेत. त्यानतंर आरोग्यसेवा पुरवणारे कर्मचारी आणि त्यानंतर 80 वर्षांवरील लोकांचा या लिस्टमध्ये सहभाग आहे.
काय करण्याची आवश्यकता आहे?
चाचण्यांमध्ये लस सुरक्षित असली पाहिजे. लशीमुळे लोकांना संसर्ग होत नाही किंवा मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी होते हे चाचणीत आढळून आलं पाहिजे.
जगभरातील लोकांसाठी अब्जावधी डोस तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकास होणं गरजेचं
औषध नियंत्रकांनी लशीला मान्यता देणं आवश्यक आहे.
असा ही एक विचार केला जातोय की, जगभरातील 60-70 टक्के लोकांमध्ये कोरोना व्हायरसविरोधात 'हर्ड इम्युनिटी' म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली असेल.
लस सर्वांना सुरक्षित ठेवेल?
लशीला प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतं
जास्त वय असलेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकूवत झालेली असते. त्यामुळे वय जास्त असलेल्यांमध्ये लशीचा जास्त प्रभाव दिसून येत नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)