लाँग कोव्हिड : गंभीर संसर्गापेक्षा सौम्य लक्षणं असणाऱ्यांना होऊ शकतो जास्त त्रास

जगभरात कोरोना विषाणूची बाधा होऊन गेलेल्या अनेकांना दीर्घकाळ या आजाराची लक्षण कायम असल्याचं दिसून येतंय. यालाच 'लाँग कोव्हिड' म्हणतात.

युकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्चने लाँग कोव्हिडवर एक अहवाल सादर केला आहे. या अहवालातल्या निष्कर्षानुसार लाँग कोव्हिडचे लोकांवर चार प्रकारे परिणाम होऊ शकतात.

तसंच लाँग कोव्हिडचा सामना करत असलेल्या व्यक्तींवर मोठा मानसिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना अधिक आधाराची गरज असते आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लाँग कोव्हिडविषयी परिपूर्ण माहिती असायला हवी.

कोरोनाने बदललं आयुष्य

कोव्हिड-19 चा सौम्य संसर्ग झालेले दोन आठवड्यात तर गंभीर संसर्ग झालेले रुग्ण तीन आठवड्यात बरे होतात, असं सांगितलं जातं.

मात्र, हजारो लोकांना लाँग कोव्हिडचा सामना करावा लागत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच भविष्यात लाँग कोव्हिड रुग्णांची संख्याही वाढत जाणार, हे नक्की.

फेसबुकवरच्या लाँग कोव्हिड सपोर्ट ग्रुपच्या 14 सदस्यांच्या मुलाखती आणि ताज्या संशोधनावरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. कोरोनातून बरं होत असताना बरीच लक्षणं अधून-मधून दिसत असतात. याला 'रिकरिंग सिम्पटम्स' (recurring symptoms) म्हणतात. श्वासोच्छास, मेंदू, हृदय, रक्तवाहिन्या ते किडनी, आतडे, यकृत आणि त्वचेपर्यंत शरीरातल्या अनेक अवयवांवर रिकरिंग सिम्प्टम्सचा परिणाम दिसून येत असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

चार वेगवेगळ्या सिंड्रोम्समुळे ही लक्षणं असू शकतात :

  • फुफ्फुस आणि हृदयाला झालेली कायमस्वरुपी दुखापत
  • पोस्ट इंटेसिव्ह केअर सिंड्रोम (अतिदक्षता विभागातून बाहेर आल्यानंतर)
  • पोस्ट व्हायरल फटिग सिंड्रोम (विषाणू संसर्गातून बरे होताना येणारा थकवा)
  • कोव्हिड-19 आजाराची लक्षणं दीर्घकाळ राहणे

लाँग कोव्हिड असणाऱ्यांपैकी काही रुग्णांना गंभीर स्वरुपाची लागण झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दिर्घकाळ उपचार घ्यावे लागले होते. मात्र, काही जण असेही होते की त्यांना कोव्हिड-19 ची अतिशय सौम्य लक्षणं होती आणि त्यांनी कोरोना चाचणीही केली नव्हती.

'लाँग कोव्हिडच्या क्रियाशील निदानामुळे (working dignosis)' लोकांना मदत होईल, असं या अहवालात म्हटलेलं आहे. वर्किंग डायग्नोसीस म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक संभाव्य रोगनिदानांपैकी अधिक प्रभावी पद्धत.

काही रुग्णांसाठी कोव्हिड-19 एक दीर्घकाळ टिकणारा आजार असल्याचं स्पष्ट होत आहे.

अहवालात म्हटलेलं आहे, "काही रुग्ण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी योग्य खबरदारी घेतल्यावर पूर्णपणे बरे होताच. मात्र, काहींसाठी हा अनुभव आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. अनेक रुग्ण असे आहेत की ज्यांना सौम्य संसर्ग झाल्याने ते कधीच हॉस्पिटलला गेले नाही. मात्र, पुढे त्यांना अधिक गंभीर लक्षणं दिसून आली."

लाँग कोव्हिडविषयी बोलतान हा अहवाल तयार करणाऱ्या डॉ. एलेन मॅक्सवेल म्हणतात की ज्यांना गंभीर संसर्ग झाला आहे त्यांच्यावर या आजाराचा सर्वाधिक परिणाम होतो आणि ज्यांना या आजारामुळे मृत्यू ओढावण्याचा धोका कमी आहे त्यांना या आजाराच्या दिर्घकालीन परिणामांचा धोकाही कमी आहे, असं त्यांना पूर्वी वाटायचं.

मात्र, अभ्यासावरून वेगळंच सत्य पुढे आलं.

याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, "कोव्हिडची कधी चाचणीसुद्धा न केलेल्यांना व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आलेल्या रुग्णांपेक्षा जास्त त्रास झाल्याचीही उदाहरणं आढळली आहेत."

ब्रिस्टल विद्यापीठात प्राध्यापिक असणाऱ्या जो हाऊस यांना कोरोनाची लागण होऊन 6 महिने उलटले आहेत. मात्र, त्यांना अजूनही त्रास जाणवतो आणि म्हणूनच 6 महिन्यांनंतरही त्यांना कामावर परत जाता आलेलं नाही.

सुरुवातीला त्यांना खूप खोकला होता आणि श्वास घ्यायलाही त्रास जाणवत होता. पुढे प्रचंड थकवा आणि डोकदुखी जाणवू लागली आणि त्यानंतर तर त्यांना हृदयाच्या तक्रारी आणि स्नायूदुखीचा त्रासही झाला.

जो सांगतात, "एक दिवस मी उठले आणि मला खूप चक्कर येत होती, अशक्तपणा जाणवत होता. शेवटी मला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं."

त्यांना हृदयाची धडधड आणि श्वासोच्छासाचा त्रास आता कमी झाला असला तरी इतर लक्षणं अजूनही जाणवतात आणि याचा मोठा परिणाम त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावरही झालाय.

त्यांचे जोडीदार अॅश यांनाही अजूनही काही लक्षणं जाणवतात. त्यामुळे स्वयंपाकापासून ते घरकामापर्यंत सर्व जबाबदारी जो यांची किशोरवयीन मुलंच सांभाळतात.

त्या म्हणतात, "बहुतांश लोकांना आजाराची सौम्य लक्षणं जाणवतात. पण खरं सांगायचं तर ती सौम्य नाहीत. आम्हाला आधाराची गरज आहे."

जो यांना न्युमोनिया झाला होता. मात्र, त्यांनी कधीच कोव्हिड चाचणीही केली नव्हती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखलही करण्यात आलं नव्हतं.

"आम्ही आजारी होतो तेव्हा आम्ही दोघांनीही मृत्यूपत्र लिहून ठेवलं. आम्ही खूप हादरलो होतो."

लाँग कोव्हिडचा सामना करणाऱ्यांना समाजातून आधार मिळायला हवा. तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांचीही त्यादृष्टीने तयारी करायला हवी, असं या अहवालात म्हटलेलं आहे.

हा अहवाल यूकेतल्या निरीक्षणांवर आधारित असल्याने त्यातली काही निरीक्षणं ही त्या अंगाने आहे. कृष्णवर्णीय, आशियाई व्यक्ती, मानसिक आजार असणारे आणि लर्निंग डिफिकल्टीज असणारे, अशा वेगवेगळ्या समाजघटकांवर लाँग कोव्हिडचा अधिक परिणाम होत असल्यांच त्यात नमूद करण्यात आलेलं आहे.

डॉ. मॅक्सवेल म्हणतात, "रुग्णांना येणारे अनुभव समजून घेऊन त्यांना आवश्यक उपचार, देखभाल आणि आधार मिळावा, हा या अहवालाचा हेतू आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)