You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'रेजांग ला' खिंडीतला तो थरार, जेव्हा 120 भारतीय सैनिकांनी चीनसमोर मागे हटण्यास दिला होता नकार
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
1962 च्या भारत-चीन युद्धातील विस्मरणात गेलेल्या लढाईची आठवण एका आगामी बॉलिवूड चित्रपटामुळे पुन्हा ताजी झाली आहे.
'120 बहादूर' हा चित्रपट लडाखच्या गोठवणाऱ्या थंडीत, हिमालयाच्या उंच शिखरांवर शौर्य गाजवणाऱ्या त्या भारतीय सैनिकांची शौर्यगाथा सांगतो, ज्यांनी 'रेजांग ला' खिंडीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर मुख्य भूमिकेत असून त्याने मेजर शैतान सिंह यांचे पात्र पडद्यावर जिवंत केले आहे.
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी 1962 च्या युद्धातील भारताच्या पराभवाच्या सावलीत ही एकमेव अभिमानास्पद बाजू या निमित्ताने जगासमोर आली आहे.
चित्रपटाचे संवाद लेखक सुमित अरोरा यांनी बीबीसीशी बोलताना या कथेचे महत्त्व अधोरेखित केले.
ते म्हणाले, "आम्हाला असे वाटले की, ही कथा सांगणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांनी हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवला आणि घडवला, आम्हाला त्यांचा सन्मान करायचा होता. चित्रपट म्हणून आम्ही काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी वापरली असली, तरी आमचा चित्रपट इतिहासाशी पूर्णपणे प्रामाणिक आहे."
जेव्हा सीमावादावरून भारत आणि चीनमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते अशा वेळी हे युद्ध झाले. हा वाद सोडवण्यासाठी झालेल्या चर्चेच्या सर्व फेऱ्या निष्फळ ठरल्या होत्या.
त्यातच, 1959 मध्ये तिबेटमधील उठावानंतर भारताने दलाई लामा यांना राजकीय आश्रय दिल्याने चीनचा रोष अधिकच वाढला होता.
20 ऑक्टोबर रोजी चीनने भारतावर अचानक हल्ला चढवला आणि महिनाभर हे युद्ध सुरू राहिले.
आश्चर्यकारक बाब म्हणजे, चीनने या हल्ल्याचे वर्णन 'सेल्फ डिफेन्स काउंटर अटॅक' म्हणजे स्वसंरक्षणार्थ केलेला प्रतिहल्ला असे केले होते.
भारतावरच आक्रमकतेचा आरोप करत चीनने दावा केला होता की, दिल्ली चिनी क्षेत्रावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत आहे.
युद्धाच्या एका महिन्यानंतर, चीनने अचानक एकतर्फी युद्धविराम जाहीर केला. यासोबतच त्यांनी आपले सैन्य मागे घेतले आणि युद्धकैद्यांची सुटका केली.
मात्र, या महिनाभराच्या युद्धात भारताला मोठी किंमत मोजावी लागली. भारताने आपले 7,000 शूर सैनिक गमावले आणि सुमारे 38,000 चौरस किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात गेली.
या युद्धानंतर दोन्ही देशांच्या सीमा निश्चित करण्यासाठी 3,440 किलोमीटर लांबीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) निश्चित करण्यात आली.
ही सीमा अत्यंत दुर्गम भागातून, म्हणजेच नद्या, विस्तीर्ण तलाव आणि बर्फाच्छादित शिखरांवरून जाते, जिथे आजही दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर तैनात असते.
ती लढाई, ज्यावर कोणालाच विश्वास बसला नाही!
चीनने या युद्धाबद्दल अधिकृतपणे अत्यंत कमी माहिती दिली आहे. त्यांनी केवळ असा दावा केला की, त्यांच्या सैनिकांनी संघर्ष क्षेत्रातील भारताच्या सर्व चौक्या नष्ट केल्या होत्या.
मात्र, 'रेजांग ला'च्या ऐतिहासिक लढाईवर चीनने कधीही कोणतीही अधिकृत टिप्पणी केली नाही. ही लढाई समुद्रसपाटीपासून 16,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढली गेली.
भारतात या संघर्षाला एक "ऐतिहासिक युद्ध" आणि "शेवटच्या श्वासापर्यंत लढल्या गेलेल्या महान युद्धांपैकी एक" म्हणून ओळखले जाते. या वीरांच्या बलिदानावर आधारित अनेक पुस्तके लिहिली गेली असून आता चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
ही ऐतिहासिक लढाई 18 नोव्हेंबरच्या रात्री 3.30 वाजता सुरू झाली आणि सकाळी 8.15 वाजेपर्यंत सुरू होती. अवघ्या काही तासांत भारतीय जवानांनी इतिहासाच्या पानात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले.
2021 मध्ये प्रकाशित झालेल्या 'बॅटल ऑफ रेजांग ला' या पुस्तकाचे लेखक आणि माजी नौसेना अधिकारी कुलप्रीत यादव सांगतात की, ही खिंड चुशुल हवाई पट्टीच्या जवळ होती.
त्याकाळी हा भाग लष्करी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता, कारण या भागाला उर्वरित भारताशी जोडणारे रस्ते नेटवर्क जवळपास अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे या खिंडीवर ताबा असणे म्हणजे लडाखच्या संरक्षणासाठी निर्णायक होते.
या भीषण युद्धात सहभागी झालेल्या 120 भारतीय सैनिकांपैकी केवळ 5 सैनिक जिवंत वाचले. या तुकडीचे नेतृत्व करणारे मेजर शैतान सिंह यांनी शत्रूशी लढताना वीरमरण पत्करले. त्यांच्या अतुलनीय शौर्य, साहस आणि नेतृत्वासाठी त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान 'परमवीर चक्र' देऊन गौरवण्यात आले.
या लढाईतील अतुलनीय शौर्यासाठी मेजर शैतान सिंह यांच्या व्यतिरिक्त इतर 12 सैनिकांना वीर पदकं देऊन गौरवण्यात आले. मात्र, या विजयाचा आणि शौर्याचा प्रवास सोपा नव्हता.
लेखक कुलप्रीत यादव यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा युद्धातून वाचलेल्या त्या 5 सैनिकांनी सुरुवातीला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या साहसी संघर्षाची माहिती दिली, तेव्हा दुर्दैवाने कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.
ते पुढे सांगतात की, त्यावेळी भारतीय लष्कराचे मनोधैर्य खूप खचलेले होते. आपण ते युद्ध वाईट रितीने हरलो होतो. एका ब्रिगेडियरसह आपले हजारो सैनिक चीनने युद्धबंदी बनवले होते.
अशा नैराश्याच्या वातावरणात, आपली एक छोटी तुकडी इतक्या धैर्याने शेवटपर्यंत लढली असेल आणि शत्रूचे मोठे नुकसान केले असेल, यावर कोणालाही विश्वास ठेवणे कठीण जात होते."
ज्या वेळी ही लढाई झाली, तेव्हा सुरुवातीला असा समज पसरला होता की, रेजांग ला वर तैनात असलेले सैनिक एक तर मैदानातून पळून गेले असावेत किंवा त्यांना युद्धबंदी बनवण्यात आले असावे. मात्र, वास्तव याच्या अगदी उलट होते.
कुलप्रीत यादव सांगतात की, युद्ध संपल्यानंतर साधारण 3 महिन्यांनी, जेव्हा एका स्थानिक मेंढपाळाला त्या भागात उद्ध्वस्त झालेले बंकर, रिकामे गोळे, वापरलेली काडतुसे आणि बर्फात गोठलेले भारतीय जवानांचे मृतदेह सापडले, तेव्हा सत्य जगासमोर आले. तेव्हाच पहिल्यांदा कळले की त्या रात्री तिथे नेमका किती मोठा संघर्ष झाला होता."
हे सर्व वीर सैनिक 13 कुमाऊं बटालियनच्या 'सी' कंपनीचे होते. मेजर शैतान सिंह यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीला खिंडीच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. प्रतिकूल परिस्थिती आणि मदतीची कोणतीही शक्यता नसतानाही या कंपनीने इतिहास घडवला.
लेखक कुलप्रीत यादव सांगतात की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेजर सिंह यांना सल्ला दिला होता की, जर दारुगोळा संपला तर मागे हटण्याचा विचार करावा. परंतु, जेव्हा मेजर सिंह यांनी हा विचार आपल्या जवानांसमोर मांडला, तेव्हा जवानांनी एकमुखाने उत्तर दिले, "आम्ही शेवटचा माणूस आणि शेवटची गोळी असेपर्यंत लढू!"
जेव्हा चिनी सैन्याने खिंडीवर हल्ला चढवला, तेव्हा 'सी' कंपनी प्रतिकारासाठी पूर्णपणे सज्ज होती. मात्र, काही वेळातच भारतीय चौकीवर प्रचंड दबाव आला. हा लढा पूर्णपणे असमान होता; एका बाजूला भारताचे केवळ 120 सैनिक होते, तर दुसऱ्या बाजूला हजारो चिनी हल्लेखोर.
चीनने 1962 च्या युद्धाशी संबंधित कागदपत्रे आजही सार्वजनिक केलेली नाहीत. परंतु, भारतीय लष्कराच्या अंदाजानुसार, या खिंडीवर हल्ला करण्यासाठी किमान 3,000 चिनी सैनिक आले होते. एवढ्या मोठ्या संख्येसमोरही भारतीय वीरांनी हार मानली नाही.
कुलप्रीत यादव सांगतात की, "चिनी सैनिकांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती आणि ते युद्धासाठी पूर्णपणे सुसज्ज होते. याउलट, भारतीय सैनिकांकडे जुन्या पद्धतीच्या सेमी-ऑटोमॅटिक रायफल्स होत्या आणि प्रत्येक जवानाकडे केवळ 600 गोळ्यांचा मर्यादित साठा उपलब्ध होता."
मेजर शैतान सिंह यांच्या जीवनावर 2014 मध्ये पुस्तक लिहिणाऱ्या पत्रकार रचना बिष्ट यांनी एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकला आहे.
त्या लिहितात की, सी' कंपनीतील बहुतांश जवान हे मैदानी प्रदेशातून आले होते. त्यांनी यापूर्वी कधीही बर्फ पाहिला नव्हता. अत्यंत उंचावरील या गोठवणाऱ्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना पुरेसा वेळही मिळाला नव्हता."
त्या रात्री नेमकं काय घडलं?
या लढाईतून जिवंत वाचलेले सुभेदार राम चंदर यांनी त्या रात्रीचा थरार आठवताना सांगितले, "हवामान अत्यंत खराब होते. आमच्याकडे हिवाळ्यासाठी योग्य प्रकारचे कपडे किंवा बूटही नव्हते."
त्यांनी पुढे माहिती दिली की, आम्हाला मिळालेली जर्सी, सुती पँट आणि हलका कोट त्या गोठवणाऱ्या वाऱ्यांपासून आमचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे नव्हते. सैनिकांना प्रचंड डोकेदुखीचा त्रास होत होता आणि आमचा नर्सिंग असिस्टंट एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर धावत औषधे वाटत होता."
"ज्या रात्री ही लढाई झाली, तेव्हा जोरदार बर्फवृष्टी होत होती आणि तापमान सुमारे मायनस 24 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. सुबेदार राम चंदर यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना आठवण सांगितली, "मी माझ्या अधिकार्यांना म्हणालो होतो की, हाच तो दिवस आहे ज्याची आपण वाट पाहत होतो."
रचना बिष्ट यांच्या लेखनानुसार, 'सी' कंपनीने चिनी हल्ल्याची पहिली लाट अत्यंत धैर्याने थोपवून धरली. मात्र, त्यानंतर चीनने केलेल्या भीषण मोर्टार हल्ल्यात भारतीय सैनिकांचे बंकर आणि तंबू उद्ध्वस्त झाले, ज्यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले. तिसऱ्या आणि सर्वात प्राणघातक हल्ल्यात कंपनीचे बहुतांश सैनिक शहीद झाले.
सुभेदार राम चंदर यांनी मेजर शैतान सिंह यांच्या शौर्याचे जे वर्णन केले आहे, ते अत्यंत भावूक करणारे आहे. ते सांगतात की, मेजर साहेबांच्या पोटात अनेक गोळ्या लागल्या होत्या. ते रक्ताने माखले होते, असहनीय वेदना होत होत्या आणि ते वारंवार बेशुद्ध पडत होते. तरीही, शुद्धीवर येताच ते मला लढाई कशी सुरू ठेवायची, याचे मार्गदर्शन करत होते."
त्यांनी मला बटालियनकडे परत जाण्यास सांगितले. मी म्हणालो, 'मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही.' पण ते ठामपणे म्हणाले, 'तुला जावेच लागेल. हा माझा आदेश आहे.'"
गोठलेली युद्धभूमी 3 महिन्यांनंतरही जशीच्या तशीच होती...
फेब्रुवारी 1963 मध्ये जेव्हा त्या वीर जवानांच्या मृतदेहांचा आणि उद्ध्वस्त बंकरचा शोध लागला, तेव्हा भारतीय लष्कराचे एक वरिष्ठ अधिकारी रेड क्रॉसचे कर्मचारी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन रेजांग ला येथे पोहोचले.
तिथे त्यांना जे दृश्य दिसले ते पाहून सर्वजण थक्क झाले; बर्फात गोठलेली ती युद्धभूमी अगदी जशीच्या तशी होती.
शोधमोहिमेत जे सैनिक सापडले, त्यापैकी प्रत्येकाच्या अंगावर अनेक गोळ्यांच्या खुणा होत्या. काहींचा मृत्यू गोळ्यांमुळे, तर काहींचा तोफेच्या गोळ्यांच्या चिंध्यांमुळे झाला होता.
काही जवान त्यांच्या बंकरमध्येच शहीद झाले होते, काही खडकांखाली दबले गेले होते, तर काही जवानांचे हात आजही त्यांच्या रायफलच्या कुंद्यावर घट्ट होते."
रचना बिष्ट यांनी या शोधमोहिमेबद्दल आपल्या पुस्तकात अत्यंत हृदयस्पर्शी माहिती दिली आहे. त्या लिहितात की, शोधमोहिमेत जे सैनिक सापडले, त्यापैकी प्रत्येकाच्या अंगावर अनेक गोळ्यांच्या खुणा होत्या.
काहींचा मृत्यू गोळ्यांमुळे, तर काहींचा तोफेच्या गोळ्यांमुळे झाला होता. काही जवान त्यांच्या बंकरमध्येच शहीद झाले होते, काही खडकांखाली दबले गेले होते, तर काही जवानांचे हात आजही त्यांच्या रायफलच्या दस्त्यावर घट्ट होते."
नर्सिंग असिस्टंटच्या हातात तेव्हाही इंजेक्शन आणि पट्ट्यांचा रोल होता, तर मोर्टार चालवणारा सैनिक गोळा हातात धरलेल्या अवस्थेतच शहीद झाला होता.
मेजर शैतान सिंह एका मोठ्या खडकापाशी विसावलेले आढळले. त्यांच्या डाव्या हाताला रक्ताने माखलेली पट्टी बांधलेली होती आणि मशिनगनच्या गोळीबारामुळे त्यांच्या पोटाला गंभीर जखमा झाल्या होत्या.
पराजयाच्या छायेत शौर्याची सुवर्णगाथा
पत्रकार रचना बिष्ट लिहितात की, ज्या 1962 च्या युद्धाला भारत सहसा "शर्मिंदगी" म्हणून आठवतो, त्याच युद्धात मेजर शैतान सिंह आणि त्यांच्या जवानांनी अचाट शौर्य गाजवले. या वीरांच्या सन्मानार्थ, 'सी' कंपनीचे नाव बदलून 'रेजांग ला कंपनी' असे ठेवण्यात आले. तसेच, हे सर्व सैनिक ज्या भागातून आले होते, त्या रेवाडी (हरियाणा) येथे त्यांचे एक भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.
युद्धविरामानंतर ही खिंड 'नो-मॅन्स लँड' बनली असून ती वादग्रस्त क्षेत्राचा भाग आहे.
यादव म्हणतात की, जर 'सी' कंपनी इतक्या शौर्याने लढली नसती, तर आज भारताचा नकाशा खूप वेगळा असता.
ते म्हणतात, "जर हे सैनिक नसते, तर माझ्या मते भारताने लडाखचा अर्धा भाग गमावला असता. चीनने हवाई पट्टी आणि चुशुलवर ताबा मिळवला असता."
1962 च्या युद्धात भारतासाठी ही लढाई एकमेव सकारात्मक बाजू होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)