भारत-चीन सीमावाद : चीनवर भारत वरचढ चढला त्या युद्धाची कहाणी

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लडाखमधल्या भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्करी अधिकाऱ्यासह 20 जवानांचा मृत्यू झाला.

यापूर्वी 2017 साली डोकलामच्या सीमेजवळही दोन्ही देश जवळपास तीन महिने समोरासमोर उभे ठाकले होते. मात्र, त्यावेळी कुठलीही जीवित हानी झालेली नव्हती.

डोकलाम तणावावेळी चीन वारंवार 1962 च्या युद्धाची आठवण करून देत भारताला डिवचत होता. मात्र, 1967 साली नाथू ला भागात घडलेल्या घटनेचा चीनलाही कदाचित विसर पडला होता.

1967 साली नाथू लामध्ये चीनचे 300 हून अधिक जवान ठार झाले होते. तर भारताने केवळ 65 जवान गमाावले होते.

नाथू ला'चा वाद

1962 च्या युद्धानंतर भारत आणि चीन दोघांनीही एकमेकांच्या देशातल्या आपापल्या राजदूतांना माघारी बोलावलं होतं. दोन्हीकडच्या राजधानीच्या शहरांमध्येही एक छोटं मिशन तेवढं सुरू होतं.

हे मिशन सुरू असताना चीनने अचानक आरोप करायला सुरुवात केली की, भारतीय मिशनमध्ये काम करणारे दोन कर्मचारी भारतासाठी हेरगिरी करत आहेत. चीनने तात्काळ त्या दोघांनाही बाहेर काढलं.

ते इथेच थांबले नाहीत. चिनी पोलीस आणि सुरक्षा दलांनी भारतीय दूतावासाला घेराव घातला आणि दूतावासातून आत-बाहेर जाण्यावर बंदी घातली.

भारतानेही हेच केलं. ही कारवाई 3 जुलै 1967 रोजी सुरू झाली होती. पुढे ऑगस्टमध्ये हा घेराव काढण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झालं.

त्याच दरम्यान चीनने तक्रार केली की, भारतीय जवान चीनी मेंढ्या आपल्या हद्दीत नेत आहेत. त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या जनसंघाने या आरोपाचा विचित्र पद्धतीने विरोध करण्याचा निर्णय घेतला.

जनसंघ पक्षाचे तत्कालीन खासदार अटल बिहारी वाजपेयी नवी दिल्लीतल्या चिनी दूतावासात मेंढ्यांचा कळप घेऊन घुसले होते.

नाथू ला सोडा, चीनचा भारताला अल्टिमेटम

त्यापूर्वी 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत पाकिस्तानवर वरचढ ठरू लागला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं बघून पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयूब खान गुप्तपणे चीनला गेले.

पाकिस्तानवरचा दबाव कमी करण्यासाठी भारतावर लष्करी दबाव वाढवावा, अशी विनंती त्यांनी चीनला केली होती.

'Leadership in the Indian Army' या पुस्तकाचे लेखक (नि.) मेजर जनरल व्ही. के. सिंह सांगतात, "योगायोगाने मी त्यावेळी सिक्कीममध्ये तैनात होतो. चीनने पाकिस्तानला मदत करण्यासाठी भारताला एकप्रकारे अल्टिमेटम दिला की, भारताने सिक्कीम सीमेवरील नाथू ला आणि जेलेप ला इथल्या चेकपोस्ट सोडाव्या."

(नि.) मेजर जनरल. व्ही. के. सिंह पुढे सांगतात, "त्यावेळी आमची प्रमुख सुरक्षा रेषा छंगू वर होती. कोअर मुख्यालय प्रमुख जनरल बेवूर यांनी जनरल सगत सिंह यांना चेकपोस्ट रिकामे करण्याचे आदेश दिले. मात्र. जनरल सगत म्हणाले की, चेकपोस्ट सोडणं मूर्खपणा ठरेल. नाथू ला उंचावर आहे आणि तिथून चीनमध्ये जे काही घडतंय त्यावर लक्ष ठेवता येतं."

"चेकपोस्ट सोडली तर चीनी सैन्य पुढे सरकेल आणि तिथून सिक्कीममध्ये काय-काय घडतंय, त्यांना स्पष्टपणे दिसेल. तुम्ही आधीच मला आदेश दिलेला आहे की, नाथू ला सोडण्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार माझा असेल. मी तसं करणार नाही."

दुसरीकडे जेलेपा ला ज्यांच्या अधिकार क्षेत्रात यायचं त्या 27 माउंटेन डिव्हिजनने ते चेक पोस्ट सोडलं. चीनी सैन्याने तात्काळ त्यावर कब्जा केला.

ही चेकपोस्ट आजही चीनच्या ताब्यात आहे. यानंतर चीनी जवानांनी 17 आसाम रायफलच्या एका बटालियनवर घात लावून हल्ला चढवला. यात आपले दोन जवान शहीद झाले.

या घटनेमुळे संतापलेले सगत सिंह यांनी संधी मिळताच या घटनेचा सूड उगारण्याचा संकल्प केला.

भारत आणि चीनी जवानांमध्ये बाचाबाची

त्यावेळी नाथू ला इथे तैनात मेजर जनरल शेरू थपलियाल 'इंडियन डिफेंस रिव्ह्यू' च्या 22 सप्टेंबर 2014 च्या अंकात लिहितात, "नाथू लामध्ये दोन्ही लष्कराचा दिवस कथित सीमेवर गस्त घालण्याने सुरू व्हायचा. या दरम्यान दोन्ही देशांच्या जवानांमध्ये शाब्दिक बाचाबाचीसुद्धा व्हायची. चीनच्या एका अधिकाऱ्याला थोडं-फार इंग्रजी यायचं. त्याच्या टोपीवर लाल कापड असायचं आणि ही त्याची ओळख होती."

"दोन्हीकडचे जवान एकमेकांपासून फक्त मीटरभर अंतरावर उभे असायचे. तिथे एक नेहरू स्टोन होता. याच ठिकाणाहून 1958 साली जवाहरलाल नेहरू ट्रॅक करत भूटानला गेले होते. काही दिवसातच दोन्ही देशांच्या जवानांमधली शाब्दिक वाद धक्काबुक्कीवर आला आणि 6 सप्टेंबर 1967 रोजी भारतीय जवानांनी चीनी अधिकाऱ्याला धक्का देऊन पाडलं. त्यात त्याचा चष्मा तुटला."

तारेचं कुंपण घालण्याचा निर्णय

हा तणाव कमी करण्यासाठी भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी नाथू ला ते सेबू लापर्यंत सीमा निश्चित करण्यासाठी तारेचं कुंपण घालण्याचा निर्णय घेतला.

11 सप्टेंबरच्या सकाळी 70 फिल्ड कंपनीचे इंजीनिअर्स आणि 18 राजपूतच्या जवानांनी कुंपण घालायला सुरुवात केली. दुसरीकडे 2 ग्रेनेडिअर्स आणि सेबू लावर आर्टिलरी ऑब्जर्व्हेशन पोस्ट यांना कुठल्याही अप्रिय घटनेवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं.

कुंपण घालण्याचं काम सुरू होताच चीनी अधिकारी आपल्या काही जवानांसह तिथे पोहोचले जिथे 2 ग्रेनेडिअर्सचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल राय सिंह आपल्या कमांडो प्लाटूनसोबत उभे होते.

तो अधिकारी राय सिंह यांना कुंपण घालणं बंद करायला सांगत होता. मात्र, चीनची अशी कुठलीच विनंती मान्य करू नका, असे आदेश त्यांना होते. तेवढ्यात चीनी जवानांनी मशिनगनने गोळीबार सुरू केला.

चिनी जवानांवर डागल्या तोफ

भारतीय सैन्याचे माजी मेजर जनरल रंधीर सिंह (यांनी जनरल सगत सिंह यांचं चरित्र लिहिलं आहे) सांगतात, "लेफ्टनंट कर्नल राय सिंह यांना जनरल सगत सिंह यांनी आधीच कल्पना देऊन ठेवली होती की त्यांनी बंकरमधूनच कुंपण घालण्यावर लक्ष ठेवावं. मात्र, जवानांचं धैर्य वाढवण्यासाठी ते मोकळ्या जागेवर येऊन उभे होते. 7 वाजून 45 मिनिटांनी अचानक एक शिटी वाजली आणि चीनी जवानांनी भारतीय जवानांवर ऑटोमॅटिक फायरिंग सुरू केली. राय सिंह यांना तीन गोळ्या लागल्या. वैद्यकीय अधिकारी त्यांना ओढत तुलनेने सुरक्षित अशा ठिकाणी घेऊन गेले."

"जे भारतीय जवान कुंपण घालण्याचं काम करत होते किंवा मोकळ्या जागेत उभे होते त्यांनाही काही मिनिटात ठार करण्यता आलं. गोळीबार एवढा होता की जखमी जवानांना सुरक्षित ठिकाणी न्यायलाही वेळ मिळाला नाही. भारताचे बरेचसे जवान मोकळ्या जागी उभे होते आणि तिथे आडोसा घेण्यासाठीसुद्धा जागा नसल्याने जखमी होणाऱ्यांची संख्या जास्त होती. चीनकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार होत असल्याचं बघून सगत सिंह यांनी तोफगोळ्यांनी हल्ला करण्याचा आदेश दिला."

"त्यावेळी तोफगोळ्यांनी हल्ला करण्याचा आदेश देण्याचा अधिकार केवळ पंतप्रधानांना होता. सेना प्रमुखही हा निर्णय घेऊ शकत नव्हते. मात्र, चीनचा दबाव वाढत होता आणि वरून कुठलाच आदेश येत नव्हता. हे बघता जनरल सगत सिंह यांनी तोफगोळ्यांनी हल्ला करण्याचा आदेश दिला. यामुळे चीनचं मोठं नुकसान झालं. यात त्यांचे 300 हून अधिक जवान ठार झाले."

उंचीचा फायदा

(नि.) मेजर जनरल व्ही. के. सिंह सांगतात, "आपले जवान धारातीर्थी होताना बघून ग्रेनेडिअर्स संतापले. ते आपापल्या बंकरमधून बाहेर पडले आणि कॅप्टन पी. एस. डागर यांच्या नेतृत्त्वाखाली चिनी ठिकाणांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात कॅप्टन डागर आणि मेजर हरभजन सिंह दोघंही शहीद झाले आणि चीनच्या मशीनगन फायरिंगमध्ये अनेक भारतीय जवानही शहीद झाले."

"यानंतर सुरू झालेलं युद्ध तीन दिवस सुरू होतं. जनरल सगत सिंह यांनी लघू ते मध्यम अंतरावरच्या तोफ मागवल्या आणि चीनी ठिकाणांवर जबरदस्त हल्ला सुरू केला. भारतीय जवान उंचावर होते. तिथून त्यांना चीनी तळ स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे भारतीय तोफांचे गोळे योग्य निशाणा साधत होते. उत्तरादाखल चीनकडूनही गोळीबार सुरू होता. मात्र, ते भारतीय जवानांना बघू शकत नव्हते. त्यामुळे त्यांचा गोळीबार अंदाधुंद होता."

ब्लडी नोज

जनरल व्ही. के. सिंह पुढे सांगतात, "युद्ध संपल्यानतंर चीनने भारतावर आरोप केला की, आपण त्यांच्या क्षेत्रावर हल्ला केला. एकादृष्टीने ते योग्यही होते. कारण शहीद झालेल्या भारतीय जवानांचे पार्थिव चीनी सीमेतूनच काढण्यात आले होते. त्यांनी चीनच्या क्षेत्रात हल्ला केला होता."

भारतीय जवानांनी दिलेलं प्रत्युत्तर भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडलं नाही आणि काही दिवसातच लेफ्टनंट जनरल सगत सिंह यांची बदली करण्यात आली. मात्र, मानसशास्त्रीयदृष्ट्या या चकमकीचा भारतीय जवानांना मोठा फायदा झाला.

जनरल व्ही. के. सिंह सांगतात, "1962 च्या युद्धानंतर भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये चिनी सैन्याची जी भीती बसली होती की हे तर सुपरमॅन आहेत आणि भारतीय त्यांचा सामना करू शकत नाहीत. ही भीती या घटनेनंतर कमी झाली. भारतीय जवानाला हा आत्मविेश्वास मिळाला की तो ही चीनी जवानांना ठार करू शकतो आणि त्यांनी तसं केलंही आहे. संरक्षणतज्ज्ञ असणाऱ्या एका जाणकाराने अगदी योग्य शब्दात म्हटलं आहे, 'This was the first time the chinese has got so bloody nose.'"

1962 ची भीती दूर झाली

भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचा एवढा परिणाम झाला की, चीनने हवाई दलाचा वापर करण्याची धमकी दिली. मात्र, भारतावर या धमकीचा तसूभरही परिणाम झाला नाही.

इतकंच नाही तर 15 दिवसांनंतर 1 ऑक्टोबर 1967 रोजी सिक्कीममधल्याच चो ला या भागात भारत आणि चीनी जवानांमध्ये आणखी एक चकमक उडाली.

यावेळीही भारतीय जवानांनी चीनचा आक्रमकपणे सामना केला आणि चीनी जवानांना 3 किमी आत 'काम बॅरेक्स'पर्यंत मागे ढकललं.

विशेष म्हणजे 15 सप्टेंबर 1967 रोजी जेव्हा युद्ध थांबलं त्यावेळी भारतीय जवानांचे पार्थिव घेण्यासाठी सीमेवर फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ, जनरल जगजीत सिंह अरोरा आणि जनरल सगत सिंह उपस्थित होते. चार वर्षांनंतर 1971 साली पाकिस्तानविरोधी युद्धात हेच तीन अधिकारी मुख्य भूमिका बजावणार होते.

इंडियन एक्सप्रेसचे असोसिएट एडिटर सुशांत सिंह सांगतात, "1962 च्या युद्धात चीनचे 740 जवान ठार झाले होते. हे युद्ध जवळपास महिनाभर सुरू होतं आणि लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत या युद्धाचं क्षेत्र होतं. त्यामुळे 1967 मध्ये केवळ 3 दिवसात चीनला 300 जवान गमवावे लागले, याचा अर्थ ही संख्या खूप मोठी होती. या युद्धानंतर 1962 च्या युद्धाची भीती बऱ्याच अंशी कमी झाली होती. भारतीय जवानांना हे जाणवलं की चीनी जवानही आपल्यासारखेच आहेत. तेही मार खावू शकतात आणि पराभूतही होऊ शकतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)