भारत-चीन सीमा तणाव : दोन्ही देशातील वादाची 3 मोठी कारणं

    • Author, नितीन श्रीवास्तव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झालेत, पण भारताचे 20 जवान मृत्युमुखी पडले.

दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमेवरून तणाव आहे. त्यानंतर झालेल्या अनेक चर्चांनंतर दोन्ही देशांनी आपापली सैन्यं कमी करण्याचा निर्णयसुद्धा घेतला.

पण तणाव काही कमी होताना दिसत नाहीय. जूनच्या अखेरीस भारत सरकारने 59 चिनी अॅप्सवर भारतात बंदी घातली. यात देशभरात 12 कोटी युजर्स असलेल्या टिकटॉक आणि युसी ब्राऊझरसारख्या मोठ्या अॅप्सचा समावेश आहे. वाचा संपूर्ण बातमी इथे .

पण या तणावामागची कारणं काय? पाहूयात एक एक करून...

ही कारणं पाहण्याआधी इथं एका पुस्तकाचा संदर्भ देणं महत्त्वाचा ठरतं. आजपासून साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये एक प्रसिद्ध सेनापती होऊन गेले. त्यांनी 'द ऑर्ट ऑफ वॉर' हे पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं आहे की "लढाई न करताच शत्रूला हरवणे हीच युद्धाची सर्वोत्कृष्ट कला आहे."

शेकडो वर्षांनंतर आजही चीनमध्ये या पुस्तकातील सिद्धांतांना आदर्श मानलं जातं. अगदी तसंच जसं भारतात चाणक्यनितीला मानलं जातं.

भारत-चीनच्या सीमेवर सध्या असलेल्या तणावाला समजून घेण्यासाठी 'युद्धाच्या या सर्वोत्कृष्ट कलेला' लक्षात ठेवण्याची गरज आहे.

1999 मध्ये कारगील युद्ध झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय सीमेवर इतक्या मोठ्या प्रमाणात हालचाल झाल्याचं दिसून आलं.

1962 चं भारत चीन युद्ध झाल्यानंतर या दोन्ही देशांची जी सीमा निश्चित करण्यात आली तिला अॅक्च्युअल लाइन ऑफ कंट्रोल म्हटलं जातं.

सध्या जे तणावाचं वातावरण दिसतंय त्याची सुरुवात एप्रिल महिन्यात झाल्याचं संरक्षण मंत्रालयातील सूत्रं सांगतात.

लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर "चीनी सैन्याच्या तुकड्या आणि मोठ्या संख्येने ट्रक दिसत होते."

यानंतरही मे महिन्यात सीमेवर चिनी सैनिकांच्या हालचाली नोंदवण्यात आल्या. लडाखची सीमा निश्चित करणाऱ्या नदीजवळही चिनी सैन्य गस्त घालत असल्याचं दिसून आलं होतं.

काही दिवसांपूर्वी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी सीमा भागाचा दौरा केला. यावरूनच या घडामोडी किती गंभीर आहेत याचा अंदाज येतो.

दोन्ही देशांमधला तणाव आणखी वाढला जेव्हा मंगळवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोणत्याही देशाचं नाव न घेता 'लष्कराल तयार राहण्याचे निर्देश दिले.'

दरम्यान, दिल्लीत तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या बैठकांचे सत्र सुरू होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पहिल्यांदाच भारत-चीन सीमा वादावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर या विषयाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली.

2017 मध्येही डोकलाममध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. त्याचे व्हीडिओही व्हायरल झाले होते.

भारत आणि चीनच्या या वादाचा इतिहास शेकडो वर्षं जुना आहे. पण सध्या सुरू असलेल्या तणावाची तीन प्रमुख कारणं दिसून येतात.

'रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग नियंत्रणात आणण्याची धडपड'

पहिलं कारण सामरिक म्हणजे युद्धविषयक आहे. चीन आणि भारत दोन असे देश आहेत ज्यांच्या सैन्याची संख्या जगभरात पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी मानली जाते. या दोन्ही देशांमध्ये परस्पर विरोधाचा मोठा इतिहास आहे.

यावेळीही तोच भाग पुन्हा चर्चेत आहे ज्यावरून 1962 मध्ये दोन्ही देशांमध्ये युद्धही झालं होतं. चीनचा दावा आहे की या युद्धात त्यांनी बाजी मारली होती.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय सीमा भागांमध्ये सुरू असलेलं बांधकाम हेही तणावाचे एक मोठे कारण असू शकतं. याभागात वाहतुकीची सोय व्हावी म्हणून भारत सरकार इथं रस्ते बांधत आहे. त्यावरून तणावाचं वातावरण निर्माण झालं असू शकतं, असं सुरक्षा विषयक जाणकार अजय शुक्ला सांगतात.

त्यांनी सांगितलं, "एरवी शांत असलेले गलवान खोरे आता एक हॉटस्पॉट बनलंय. कारण प्रत्यक्ष नियंत्रण रेषा इथेच आहे, ज्याच्याजवळ भारताने श्योक नदी ते दौलत बेग ओल्डी (डिबीओ) पर्यंत एका रस्त्याचं बांधकाम केलं आहे. लडाखच्या एलएसी भागातील हा भाग सर्वांत दुर्गम आहे."

जवळपास सर्वच जाणकार याविषयी सहमती दर्शवतात की चीनच्या सीमा भागात विकासाची मोठी आणि चांगली कामं झाली आहेत. सीमा भागांत मुलभूत सुविधा पोहोचवण्यात चीन भारतापेक्षा कायम पुढे राहिला आहे.

भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी सांगितलं, "चीन अस्वस्थ असण्यामागे आणखी एक कारण आहे. चीनच्या सैनिकांची क्रिपिंगची रणनीती आहे. (रांगत पुढे सरकणे). अशा हालचाली चालू करून वादग्रस्त भागांना ते हळुहळू आपल्या अधिकार क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करतात. पण ही शक्यता आता कमी होत चालली आहे. कारण भारतीय सीमा भागांत विकास होतोय आणि संपर्क क्षमताही वाढलीय."

हिंदुस्तान टाईम्सचे डिफेन्स कव्हर करणारे वरिष्ठ पत्रकार राहुल सिंह सांगतात, "गेल्या पाच वर्षांत भारतीय सीमा अधिक सुसज्ज बनवण्याकडे जास्त लक्ष दिले गेले आहे."

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "याआधीही भारतीय सीमेवर दोन्ही देशांकडून छोट्या मोठ्या कारवाया होत होत्या. 2017 पूर्वीही 2013 आणि 2014 मध्ये चुमार याठिकाणी अशा घडामोडी घडल्या होत्या. पण यावेळी अधिक हालचाली होत आहेत."

माजी मेजर जनरल अशोक मेहता सांगतात, "भारताने प्रत्यक्ष नियंत्रण सीमा रेषेजवळ पूल आणि एअर स्ट्रिप बनवण्याचं काम हाती घेतलं होतं. यामुळे चिनी सैन्याच्या कथित हालचाली वाढल्या असाव्यात. यामुळेच भरतीय सैन्याला गस्त वाढवावी लागली."

'कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था'

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.

चीन, अमेरिका, यूरोप,मध्य पूर्वसह भारत आणि दक्षिण आशिया देशांचा विकास दरही घसरला आहे. बेरोजगारी आणि ठप्प होणारे व्यवसाय यांना पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारला लाखो करोडो रुपये खर्च करावे लागत आहेत.

1930 च्या 'द ग्रेट डिप्रेशन' सोबतही आताच्या परिस्थितीची तुलना केली जात आहे. यादरम्यान भारत सरकारने 17 एप्रिलला आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने देशात होणारी थेट परकिय गुंतवणूक म्हणजेच एफडीआयचे नियम त्या शेजारील देशांसाठी आणखी कडक केले ज्यांच्या सीमा रेषा आपआपसात मिळतात.

नवीन नियमानुसार कोणत्याही भारतीय कंपनीत समभाग घेण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे अनिवार्य असेल. याचा सर्वाधिक फटका चीनला बसणार आहे. कारण भारताच्या शेजारील देशांपैकी सर्वाधिक व्यापार चीनसोबत होतो.

या निर्णयाच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे चीनची सेंट्रल बँक 'पीपल्स बँक ऑफ चायना'ने भारताची सर्वांत मोठी खासगी बँक 'एचडीएफसी'चे 1.75 कोटी शेअर्स खरेदी केले. यापूर्वीही चीन भारतीय कंपन्यांमध्ये 'बेधडक' गुंतवणूक करत होता.

आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जाणकार आणि जामिया मिलिया इस्लामियाचे माजी प्राध्यापक एम. एम. खान यांनी सांगितलं, "संरक्षण आणि अर्थव्यवस्था हे दोन असे क्षेत्र आहेत जिथे चीन आपले जागतिक वर्चस्व कायम करण्यासाठी परराष्ट्रनीती वेळोवेळी बदलत असतो."

त्यांनी सांगितलं, "कोरोनानंतर जगभरातल्या शेअर बाजारात उलथापालथ झाली आहे. यावेळी चीन मोठ्या देशांमधल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहे. तुम्ही दक्षिण आशियातील देशांकडे पाहा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि तंत्रज्ञानाच्या मोठ्या कंपन्यांमध्ये चिनी कर्ज किंवा गुंतवणूक आढळते."

भारताने अचानकपणे एफडीआय गुंतवणुकीचे नियम बदलले याचा असाही एक अर्थ निघतो की चीनची ही परराष्ट्र नीती भारताला फारशी रुचलेली दिसत नाही.

कोरोना व्हायरस आणि चीन बॅकफूटवर?

जगाला नुकसान पोहचवणारा हा कोरोना व्हायरस कुठून आला? याचा शोध घेण्यात यावा असा प्रस्ताव नुकताच 194 देशांचे सदस्यत्व असलेल्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीमध्ये सादर करण्यात आला. इतर देशांप्रमाणे भारतानेही या प्रस्तावाला समर्थन दिलं.

या प्रकरणात चीननं पारदर्शी आणि जबाबदारीनं काम केलं असल्याचं स्पष्टीकरण संमेलनात उपस्थित चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलं.

शी जिनपिंग यांनी सांगितलं,"आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि संबंधित सर्व देशांना वेळीच सर्व माहिती दिली होती. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर चीन कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे."

कोरोना व्हायरसचा स्त्रोत चीन आहे असा टीकाकारांचा रोख आहे तसंच त्यांनी सुरुवातीच्या काळात चुकीची पावलं उचलल्यामुळे व्हायरसचा उद्रेक झाला असंही म्हटलं जात आहे. चीनने याचा पूर्ण ताकदीने विरोध केला आहे.

चीनवर सर्वाधिक टीका अमेरिकेनं केली आहे. जिथे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1 लाखापेक्षा अधिक आहे. अमेरिकेचे आर्थिक विकास, ऊर्जा आणि पर्यावरण मंत्री किथ क्रॅच यांनी सांगितले की, "कोव्हिड-19 विषयी चीन शांत राहिल्याप्रकरणी ट्रंप प्रशासन दंडात्मक कारवाई करण्याचा विचार करत आहे."

हिंदुस्तान टाईम्सचे राहुल सिंह सांगतात, "वुहानमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर जगभरातून चीनवर टीका करण्यात आली. आता भारत-चीन सीमा वाद सुरू झाल्यामुळे फोकस बदलू शकतो."

अमेरिकेत चीन विरोध जोर पकडू लागलाय याचं वार्तांकन वॉशिंगटनमध्ये असलेले बीबीसीचे पत्रकार विनीत खरे गेल्या काही महिन्यांपासून करत आहेत. त्यांनी सांगितले की आता भारत चीन सीमेवरून येत असलेल्या बातम्यांना अमेरिकन माध्यमं एका वेगळ्या अँगलनेही पाहत आहेत.

सीएनएनच्या वेबसाईटवर चीनविषयी एक लेख लिहिला गेलाय, "हे पहिल्यांदा झालं नाहीय जेव्हा बिजिंगने दक्षिण चिनी समुद्रामध्ये आपलं शक्तिप्रदर्शन केलं आहे किंवा भारतासोबत सीमा प्रश्नावरून वाद ओढून घेतला आहे. पण यावेळी वॉशिंगटन आणि नवी दिल्लीतही कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. सर्व राजकीय नेत्यांचं लक्ष कोरोनावर असताना चीनसाठी ही नवी संधी उपलब्ध झाली आहे."

दक्षिण आशियासाठी अमेरिकेची मुख्य डिप्लोमॅट ऐलिस वेल्स नेहाल यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितलं, "ज्याला कुणाला चीनच्या अतिक्रमण करण्याबाबत शंका आहे त्यांनी भारताशी बोलावं. त्यांना दर आठवड्याला, महिन्याला, नियमितपणे चीनच्या सैन्याकडून त्रास दिला जातो."

भारत चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाचे कारण या तीन कारणांपेक्षा वेगळेही असू शकते. याबाबत यापुढेही वाद सुरूच राहणारआहे.

सध्या चीनचं परराष्ट्र मंत्रालय आणि राजदूत दोघांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. "भारत आणि चीन एकमेकांसाठी संधी आहेत, धोका नव्हे," असं वक्तव्य राजदूत सन विडोंग यांनी केलंय.

माजी भारतीय लष्कर प्रमुख जनरल व्ही. पी. मलिक सांगतात की, "मुत्सद्देगिरी आणि राजकारण हेच अशा प्रकारच्या वादावर उपाय असू शकतात."

पण स्पष्ट शब्दात त्यांनी हेही सांगितले की, "सध्याच्या वादात लष्करी उपाय अपयशी ठरला असून जिथे जिथे आपापसात तक्रारी आहेत त्या वाढू शकतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)