'मार्करची शाई पुसली जातेय', विरोधकांचा आरोप; फडणवीस म्हणाले, 'पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न'

मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. नऊ वर्षांनी होणारी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे.

मतदान प्रक्रियेवरून आरोप-प्रत्योराप होताना दिसत आहेत. यंदाच्या मतदान प्रक्रियेत मतदानांतर बोटावर शाई लावण्याऐवजी मार्करने शाई लावली जात आहे. यावर विविध राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे.

अनेक ठिकाणी सॅनिटायझरने मार्करची शाई मिटवून पुन्हा मतदान केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनीही मार्करची शाई लिक्विडने पुसली जात असल्याचं म्हटलं आहे. त्यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसने अशाच प्रकारचा आक्षेप नोंदवला आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप नाकारला असून निकालानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी विरोधक करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

मार्करच्या शाईबाबत काय आहे आरोप?

यंदा महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेत शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करून मतदारांच्या बोटाला शाई लावली जात आहे. परंतु, मार्करची शाई नेल पॉलिश रिमूव्हर, सॅनिटायझर आणि इतर काही लिक्विडने पुसली जात असल्याचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे.

याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनीही मार्करच्या शाईबाबत भाष्य केलं.

"यापूर्वी बोटाला शाई लावली जायची. पण आता त्यांनी पेन आणला आहे. या पेनबाबत सगळीकडून तक्रारी येत आहेत. मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्या शाईवर सॅनिटाझर लावल्यानंतर ती शाई जाते. शाई पुसा, परत जा आणि पुन्हा मतदान करा, असा प्रकार सुरू आहे," असा आरोप त्यांनी केला.

ऐनकेन प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्यानंतर वाटेल ते करायचं असं सरकारचं सुरू आहे. विरोधी पक्ष वगैरे काही गोष्टी ठेवायच्या नाहीत, दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्या नाहीत, असं सरकारकडून सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मुंबई महापालिकेकडून एक खुलासा करण्यात आला. मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारित होत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी ही बाब मान्य केल्याचेही वृत्तात सांगितलं जात आहे.

परंतु, मुंबई महापालिकेकडून हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नसल्याचे महापालिकेने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

राजकीय पक्ष काय म्हणत आहेत?

राज्यातील काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मार्करच्या शाईबाबत आरोप केले आहेत.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक व्हीडिओ शेअर करत शाई नेल पॉलिश रिमूव्हरने जात असल्याचे दाखवले. त्यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या पत्नीच्या बोटावरील मार्करची शाई नेल पॉलिश रिमूव्हरने काढली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यात त्या धायरी फाटा येथील एका मतदान केंद्रासमोर कार्यकर्त्यांबरोबर उभे आहेत. त्यांच्यासमोर पोलीस दलातील एक अधिकारी असून एक व्यक्ती मतदान करून आल्यानंतर एका लिक्विडने आपल्या हातावरील मार्करची शाई पुसून गेल्याचा व्हीडिओ त्या दाखवताना दिसतात. ही शाई पुसून पुन्हा बोगस मतदान केलं जात असल्याचं ते त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगताना त्यात दिसतात.

फडणवीस म्हणाले, 'विरोधक कारणं शोधत आहेत'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील धरमपेठ भागातील व्हीआयपी रोडवरील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांच्या आई सरिता फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मार्करच्या शाईविषयीही भाष्य केलं.

ते म्हणाले की, मार्कर वापरायचं की आणखी काय हे निवडणूक आयोग ठरवत असतं. याआधीही मार्कर पेन वापरला गेला आहे. कोणाचे काही आक्षेप असतील तर निवडणूक आयागोने लक्ष द्यावं. उद्याचा निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी ते करत आहेत.

तसेच मला सुद्धा मार्कर पेन लावण्यात आला. माझ्या बोटावरची मार्कर पेनची शाई पुसली जात नाहीये, असंही ते यावेळी म्हणाले.

'पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही'

मार्करच्या शाईवरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच निवडणूक आयोगाने देखील यावर आपली बाजू मांडली.

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे.

त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे.

बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही.

2869 जागांसाठी निवडणूक

दरम्यान, सकाळी मतदान सुरू होताच मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागात मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यात अडचणी आल्या. एकाच कुटुंबातील मतदारांची नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रावर असल्याचे ऐनवेळी मतदारांना लक्षात आलं. सर्वसामान्यांबरोबर याचा फटका राजकीय नेत्यांनाही बसल्याचे दिसले.

तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत.

एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी 15 हजार 908 इतके उमेदवार रिंगणात आहेत. 3 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील.

शाई पुसत असल्याच्या आरोपांवर निवडणूक आयोग काय म्हणालं?

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाईच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलंय.

त्यांनी म्हटलंय की, "महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मार्कर पेनची जी शाई वापरली जात आहे, त्याबाबत बराच संभ्रम पसरवला जातो आहे. त्याबाबत माझं सांगणं असं आहे की, ही शाई जी आहे, ती इंडेलिबल इंक आहे. भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरतो, तीच ही इंक आहे. मात्र, ती मार्कर पेनच्या स्वरुपात आहे. असे मार्कर पेन 2011 पासून वापरात आहेत. ही शाई पुसली जात नाही. शाई लावल्यानंतर बारा ते पंधरा सेकंदांनंतर ती ड्राय होते. या शाईविषयी कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न करणे, तसे व्हीडिओ बाहेर प्रसारित करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय."

"मतदान केंद्रांमध्ये मतदार प्रतिनिधी असतात. तेदेखील मतदारांची ओळख पटवत असतात. कुणी बोगस मतदान करण्यासाठी येत असेल तर त्यावर मतदार प्रतिनिधी तक्रार करू शकतात. त्यांच्यावर कारवाईही केली जाईल." असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, "मतदारांची पण जबाबदारी आहे. शाई सुकेपर्यंत मतदारांनी शाई पुसू नये. तसं होत असेल ती मतदारांची चूक आहे. मुद्दाम जर तसं फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचं कुणी करत असेल तर आम्ही त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करू."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)