जळगावच्या छोट्या आदिवासी गावातून अमेरिकेतील पीएचडीपर्यंत: भिल्ल समाजातील शंकरचा प्रेरणादायी प्रवास

जळगाव जिल्ह्यातल्या अवघ्या 20–25 घरांच्या नागझिरी गावातून थेट अमेरिकेतील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन डिएगोपर्यंत पोहोचलेला शंकर अरुण भिल. त्याचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर आदिवासी समाजाच्या संघर्षाचा, शिकण्याच्या जिद्दीचा आहे. आता शंकरचं ध्येय एकच आहे- आपल्या पीएचडीच्या संशोधनातून न्यायाचा आवाज बुलंद करणं.

26 वर्षांचा शंकर अरुण भिल हा भिल्ल आदिवासी समाजातून येतो. नुकतीच त्याची अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन डिएगो येथे एथनिक स्टडीज या विषयात पीएचडीसाठी निवड झाली आहे. एथनिक स्टडीजमध्ये म्हणजे विविध जातीय, वांशिक, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायांचा इतिहास, संस्कृती, राजकारण, अर्थव्यवस्था आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा अभ्यास केला जातो.

शंकरला फेलोशिपमध्ये पहिल्या नऊ महिन्यांसाठी साधारण 71 हजार डॉलर्स (70–75 लाख रुपये) इतकं फंडिंग मिळणार आहे. त्यात स्टायपेंड, फी वेव्हर आणि नॉन रेसिडेंट फीचा समावेश आहे.

आपल्या फेलोशिपविषयी तो सविस्तर सांगत होता, जेणेकरुन इतर विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. "या फेलोशिपमध्ये मला पहिल्या वर्षी काम करावं लागणार नाही, दुसऱ्या वर्षापासून काम करावं लागेल असं ते अ‍ॅग्रीमेंट आहे. पहिल्या दोन वर्षांत माझं कोर्स वर्क राहील. नंतर परीक्षा आणि मग रिसर्च करायचा आहे."

आईची जिद्द आणि शंकरची भरारी

शंकर ज्या नागझिरी गावात राहतो, तिथे शिक्षणाचं प्रमाण आजही कमी आहे. 80 ते 100 लोकसंख्या असलेल्या या गावात केवळ तीन-चार मुलं बारावीपर्यंत शिकलेली आहेत. शंकर हा गावातील उच्च शिक्षण घेणारा एकमेव तरुण आहे.

"आमच्या समाजात बहुतेक लोक मजुरी करतात. शेतात मजुरी किंवा वीटभट्टी, ऊसतोडी, नदीत ट्रॅक्टर भरायचं अशी काम करतात. काही जण सालंदारी करतात," असं तो सांगतो.

शंकर अकरावीत असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं. सालगडी म्हणून काम करणाऱ्या वडिलांनंतर कुटुंबाची जबाबदारी आई सिंधुबाई भिल यांच्यावर आली. त्यांनी मजुरी करत पाच मुलांना सांभाळलं, पण शंकरचं शिक्षण थांबू दिलं नाही.

"कशीही परिस्थिती असली तरी मुलं शिकवायचीच," असं सिंधुबाई सांगतात. आज मुलगा परदेशात शिक्षणासाठी जातोय याचा त्यांना अभिमान वाटतोय. पण तो दूर जाणार याचं दुःखही त्यांना आहे.

पहिलीपासून दहावीपर्यंतचं शिक्षण शंकरनं गंगापुरी येथील आदिवासी आश्रमशाळेत घेतलं.

बारावीपर्यंतचं शिक्षण जळगावमध्ये, पदवी पुण्यात आणि पदव्युत्तर शिक्षण बंगळुरूच्या अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीत पूर्ण केलं. तिथेच त्याने पीएचडीची तयारी सुरू केली.

'बहुजन इकॉनॉमिस्ट'चं मार्गदर्शन

अमेरिकेतील पीएचडीसाठी अर्ज प्रक्रिया सोपी नव्हती. योग्य प्रोफेसर शोधणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि मार्गदर्शन मिळवणं, या सगळ्या टप्प्यांत बहुजन इकॉनॉमिस्ट या प्लॅटफॉर्ममधील मेंटॉरशिप शंकरसाठी महत्त्वाची ठरली.

या 'बहुजन इकॉनॉमिस्ट' बद्दल त्याला मित्रांकडून कळलं.

बहुजन इकॉनॉमिस्ट 2023 पासून कार्यरत आहे. हे अर्थशास्त्र क्षेत्रातील ऐतिहासिकदृष्ट्या वंचित जाती, जमाती आणि धार्मिक समुदायांमधील संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठीचं एक व्यासपीठ आहे.

संशोधनामध्ये बहुजनांचं प्रतिनिधित्व वाढावं आणि अर्थशास्त्र या विषयात आजवर दुर्लक्षित राहिलेले बहुजनांचे दृष्टिकोन समोर यावेत, हा या व्यासपीठाचा मुख्य उद्देश आहे.

शंकर सांगतो- "त्यांच्या मेंटॉरशिपमधून गाईड मिळाले आणि त्यांनी संपूर्ण प्रक्रियेत मला मार्गदर्शन केलं."

"पीएचडीसाठी अर्जप्रक्रिया अशी असते की आपल्याला विद्यापीठात थेट अर्ज करता येत नाही. आधी त्या विद्यापीठात आपल्या संशोधन विषयात रस असलेले प्रोफेसर शोधावे लागतात. किमान चार असे प्रोफेसर हवेत, ज्यांच्यासोबत तुम्ही काम करू शकता आणि जे तुमचं संशोधन सुपरवाइज करायला तयार होतील. त्यांनी सहमती दिल्यानंतरच तुम्हाला त्यांच्या विभागात अर्ज करायला सांगितलं जातं.

"अर्ज केल्यानंतर त्या विभागाची निवड समिती अर्जांची छाननी करते. त्यानंतर हेच प्रोफेसर आपल्या वतीने शिफारस करतात की उमेदवाराला प्रवेश द्यावा आणि आम्ही त्याच्या संशोधनासाठी मार्गदर्शन करू."

आदिवासींची जमीन कशी गेली?

पीएचडीसाठी शंकरचा संशोधन विषय अत्यंत संवेदनशील आहे, 'आदिवासींची जमीन गैरआदिवासींकडे कशी गेली?'

"आमच्या समाजाच्या जमिनी अगदी क्षुल्लक क्षुल्लक कारणांसाठी गेल्या आहेत. हजार, दहा हजार रुपये दिले आणि जमिनी ठेवून घेतल्या असं घडलंय. आमच्या आजीची, आईच्या वडिलांची जमीनही अशीच गेली. आमच्या गावातले म्हातारे सांगतात की या पूर्ण भिल्लांच्या जमिनी होत्या म्हणून. असं नाही की त्या पूर्ण अप्पर कास्टवाल्यांकडे गेल्या, पण स्थानिक पातळीवर ज्यांचं वर्चस्व होतं त्यांच्याकडे गेल्या. तर मी तेच बघतोय की आदिवासींच्या जमिनी ज्या गैरआदिवासींकडे गेल्या, त्याची काय प्रोसेस होती. दमन कशाप्रकारे झालं, याच्यात सरकारची काय भूमिका आहे?"

स्थानिक सत्ताधारी, सामाजिक दबाव आणि सरकारची भूमिका यांचा अभ्यास करून आदिवासींवरच्या अन्यायाला शैक्षणिक व्यासपीठावर आवाज देण्याचा त्याचा उद्देश आहे.

उच्चशिक्षणापर्यंतच्या प्रवासात शंकरला आर्थिक अडचणींबरोबरच सामाजिक दृष्टिकोनाचाही सामना करावा लागला. "लोकांचा दृष्टिकोन असाच आहे की, तू शेड्युल कास्टमध्ये (ST) मध्ये आहेस. तुम्हाला रिझर्व्हेशनचा फायदा आहे. लोकांना वाटतं ST असल्यामुळे सगळं सोपं होतं. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा अमेरिकेत रिझर्व्हेशनचा काहीच संबंध नाही," असं शंकर स्पष्टपणे सांगतो.

आदिवासी समाजातील तरुणांनाही तो शिकण्याचा आग्रह करतो. "मी भिल्ल आदिवासी समाजातील मुलांना एकच सल्ला देईन की तुम्ही शिक्षणाकडे वळा. सध्या तोच आपल्याकडे एकमेव मार्ग आहे. कारण आपल्याकडे घरचं भांडवल नाही. सोशल नेटवर्क नाही. आपल्या समाजाकडे सांस्कृतिक भांडवल (cultural capital) असलं तरी बाहेर टिकण्यासाठी लागणारी कौशल्यं आपल्याकडे नाहीत. त्यामुळे स्वतःचे उद्योगधंदे उभे करणं कठीण होतं. अशा परिस्थितीत शिक्षण हाच आपल्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग आहे."

नागझिरीसारख्या छोट्या गावातून अमेरिकेतील पीएचडीपर्यंतचा शंकर भिलचा प्रवास हा केवळ यशोगाथा नाही, तर शिक्षणातून सामाजिक अन्यायाला आव्हान देण्याची कहाणी आहे.

(लेखाचं संपादन प्राजक्ता धुळप यांनी केलं आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)