पुणे महानगर पालिकेच्या दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या निकालांचे नेमके अर्थ काय? याबाबत बीबीसी मराठीच्या प्राची कुलकर्णी यांनी पुणे सकाळच्या संपादक शीतल पवार यांच्याशी चर्चा केली.
यावेळी निकालाच्या कलांबाबत बोलताना पवार म्हणाल्या की, "पुण्याची निवडणूक भाजपसाठी एकतर्फी वाटत होती. मात्र, निवडणूक जशी पुढे गेली तशी अजित पवार यांचा आवाज वाढताना दिसला. त्यांनी माध्यमांमध्येही जागा व्यापली.
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इलेक्टिव्ह मेरिट फार महत्त्वाचं ठरतं. देवेंद्र फडणवीस यांनीही हा शब्द वापरला. मागील निवडणुकीत (2017) भाजपकडे दोन्ही महानगरपालिकांमध्ये सत्ता होती. त्यांचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक होते. त्या बळावर आधीपासून भाजप आघाडीवर होता.
शेवटच्या टप्प्यात भाजपनं पुणे शहरात आरोप प्रत्यारोपांना बगल दिली आणि त्यांचं सगळं नरेटिव्ह विकासाकडे शिफ्ट केलं होतं. त्यामुळे पुणे शहराचे निकाल मला अजिबात आश्चर्याचे वाटत नाहीत."
शीतल पवार यांनी पिंपरी चिंचवड मनपाच्या निकालांचंही विश्लेषण केलं.
“पिंपरी चिंचवडमध्ये अपक्ष निवडून आलेल्या उमेदवारांचा फरक खूप कमी आहे. त्यातील भाजपमधीलच एक बंडखोर नगरसेवक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षसंघटनेवर पक्षफुटीनंतर झालं नव्हतं. त्यातल्या त्यात अजित पवार एकटे खिंड लढवत होते. मात्र, त्यांच्या पक्षाबाबतही वारंवार बोललं जात होतं की, खालची यंत्रणा कमी पडत होती. त्यांना मुलाखतीत काहींनी हेही विचारलं होतं की, त्यांचे स्थानिक उमेदवार विरोधात बोलत नाहीत.
स्थानिक निवडणुकीत प्रत्येकाची गणितं असतात. प्रत्येकजण आपला गड राखण्याचा, आपला प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र अजित पवारांना नरेटिव्हच्या पातळीवर जागा मिळेल याची त्यांना खूप खात्री होती. मात्र, तसं आकड्यांमध्ये दिसत नाही. पुन्हा भाजप आघाडीवर दिसत आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्याकडे ताकदीचे उमेदवार नक्कीच होते. शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीने पक्षांतरं करून घेतली गेली, स्थानिक मजबूत इलेक्टिव्ह मेरिट असलेले उमेदवार राष्ट्रवादीकडे फार उरले नव्हते. त्यांच्या स्थानिक नेत्यांनीही संघटना वाढण्यासाठी किंवा ताकदीचे उमेदवार देण्यासाठी फार प्रयत्न केले नाहीत. याउलट भाजपकडे ताकदीचे उमेदवार होते.
पिंपरी चिंचवडचे राजकारण गावकी-भावकीचे आहे. त्यात उमेदवाराचा संपर्क किती, तो किती शक्तीशाली यावरही हे राजकारण अवलंबून असतं. त्यामुळे हे कल इलेक्टिव्ह मेरिटकडे जाणारे आहेत.
लोकसभा किंवा विधानसभेला हिंदुत्वासारखं 'ब्रॉड कार्पेट नरेटिव्ह' आणलं जातं आणि त्याचा परिणाम होताना आपण बघतो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असं होतं नाही. या निवडणुकांमध्ये स्थानिक उमेदवारांच्या ताकदीवर खूप काही अवलंबून असतं. या ताकदीत स्थानिक वोटबँक, आर्थिक क्षमता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. भाजपनं जिंकण्यासाठी जे जे करावं लागतं ते केलं आणि आज विजयाचं पारडं त्यांच्याकडे आहे,” असं त्या म्हणाल्या.