मुतखडा ते मूत्रपिंड निकामी होणं, 'ही' आहेत किडनीच्या 8 आजारांची लक्षणं

इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीने प्रकाशित केलेल्या अलीकडील अभ्यासानुसार, जगभरात 84 कोटी लोक तीव्र मूत्रपिंडाच्या म्हणजेच किडनीच्या विविध आजाराने ग्रस्त आहेत. याचा अर्थ 10 पैकी 1 व्यक्तीला किडनीचा आजार आहे.

अलिकडच्या काळात मृत्यूच्या 10 प्रमुख कारणांपैकी एक कारण मूत्रपिंडाच्या आजाराचं असून हा आजार 7 व्या क्रमांकावर आहे. इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीने प्रकाशित केलेल्या जर्नलमध्ये असं नमूद केलंय की एकट्या भारतात दरवर्षी 2-2.5 लाख लोक मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असतात.

त्याचप्रमाणे, संस्थेने म्हटलंय की भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी 8-10% लोक दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आहेत.

याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मूत्रपिंडांशी संबंधित आजार सुरुवातीच्या टप्प्यात समजून येत नाही. मात्र गंभीर समस्या निर्माण झाल्यावर हा आजार आहे हे दिसून येतं असं एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलच्या वरिष्ठ यूरोलॉजिस्ट मिली मॅथ्यू यांनी सांगितलं.

मूत्रपिंडाचे काम काय असतं?

मूत्रपिंड म्हणजेच किडनी हा शरीराच्या ओटीपोटात असलेला सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपल्या शरीरातील कचरा मूत्राद्वारे शरीराच्या बाहेर फेकणे हे याचं मुख्य कार्य असतं.

मूत्रपिंड रक्तामध्ये आढळणारे टाकाऊ पदार्थ, शरीरासाठी अनावश्यक असलेले अतिरिक्त खनिजे लघवीवाटे बाहेर काढून टाकते आणि शुद्ध रक्त संपूर्ण शरीरात वितरीत करते.

परंतु आपली जीवनशैली, आहार, सवयी, आनुवंशिक समस्या, औषधाच्या गोळ्या घेणं आणि आरोग्याच्या इतर विकारांसह विविध कारणांमुळे या अवयवाच्या कार्यात अडथळा येतो.

मूत्रपिंडाचे विविध विकार तेव्हाच होतात जेव्हा त्याच्या कामात अडथळा निर्माण होतो आणि ते आपले नियमित काम नीट करू शकत नाही. आणखी एक धोका असा आहे की हे विकार सुरुवातीच्या काळात दिसून येत नाही. किंबहुना काही लक्षणं देखील दिसून येत नाहीत.

डॉक्टर मिली मॅथ्यू सांगतात की, या आजाराची तीव्रता दिवसेंदिवस जसजशी वाढत जाईल तसतशी तुम्हाला लक्षणे दिसू लागतील आणि वैद्यकीय चाचण्यांद्वारे तुम्हाला हा आजार किती बळावला आहे हे समजून येईल.

या लेखातून आपण तुम्हाला कोणत्या प्रकारचे मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात? कोणत्या प्रकारची लक्षणे दिसण्याची शक्यता आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

1. मूत्रपिंडाचा जुनाट (क्रोनिक) आजार

मूत्रपिंडाचा तीव्र आजार म्हणजेच क्रॉनिक किडनी डिसीज हा मूत्रपिंडाचा असा आजार आहे जो दीर्घकाळ टिकतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये हा आजार बळावणं अधिक सामान्य आहे. सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या प्रकारचे मूत्रपिंडाचे विकार अपरिवर्तनीय असतात. योग्य वैद्यकीय उपचाराने त्रास दूर करता येतो.

लक्षणे

  • मळमळ आणि उलटी
  • भूक न लागणे
  • पाय आणि घोट्याला सूज
  • धाप लागणे
  • झोपायला त्रास होतो
  • लघवी कमी-जास्त होणे

2. मुतखडा

क्षाराचे खडे किंवा मिनरल्स जे मूत्रपिंडामध्ये जमा होतात त्यांना किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा असे म्हणतात. एक किंवा दोन दगड तयार झाल्यावर कोणतीही लक्षणं किंवा गंभीर समस्या दिसून येत नसल्याचं डॉक्टर म्हणतात. पाणी कमी पिणे, लठ्ठपणा, खराब जीवनशैली, आहार इत्यादीमुळे हा त्रास होतो.

लक्षणे

  • लघवी करताना वेदना
  • लघवीत रक्त येणे
  • मूत्रमार्गात अडथळा
  • मुतखड्याच्या जागी वेदना

3. मधुमेहामुळे होणारा आजार

अभ्यासानुसार, मधुमेह असलेल्या 3 पैकी एकाचे मूत्रपिंड निकामी होते. मधुमेह हे जगभरातील मूत्रपिंडाच्या आजाराचे प्रमुख कारण आहे. डायबेटिक मूत्रपिंडाचा आजार अशा लोकांमध्ये होतो ज्यांचा मधुमेह नियंत्रणात नाही.

लक्षणे

  • सुजलेले पाय
  • लघवीतून फेस येणे
  • शारीरिक थकवा
  • वजन कमी होणे
  • अंगावर खाज सुटणे
  • मळमळ आणि उलटी

4. हायपरटेन्सिव्ह नेफ्रोस्क्लेरोसिस

मधुमेहासोबतच मूत्रपिंडावर परिणाम करणारी आणखी एक समस्या म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडातील रक्तवाहिन्या खराब होतात, त्यामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो.

रक्तातील अनावश्यक कचरा काढून टाकणे आणि अतिरिक्त खनिजे काढून टाकणे यावर याचा परिणाम होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो आणि अनावश्यक द्रव रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो, ज्यामुळे रक्तदाब आणखी वाढतो.

लक्षणे

  • मळमळ आणि उलटी
  • चक्कर येणे
  • सुस्ती येणे
  • डोकेदुखी
  • मान दुखी

5. मूत्रमार्गातील संसर्ग

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हा मूत्रपिंडाचा विकार नसला तरी त्याचा परिणाम मूत्रपिंडावरही होतो. मूत्रमार्गाचा संसर्ग हा जीवाणूंद्वारे होणारा संसर्ग आहे.

यामुळे मूत्रपिंड खराब होण्याची शक्यता कमी असते. मात्र, संसर्ग साचून वरच्या भागात पोहोचला तर त्यामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.

लक्षणे

  • पाठदुखी
  • ताप
  • लघवी करताना वेदना
  • पोटदुखी
  • लघवी करताना रक्त
  • मळमळ आणि उलटी

6. पॉलीसिस्टिक किडनी डिसीज

पॉलीसिस्टिक किडनी डिसीज म्हणजे तुमच्या मूत्राशयात होणाऱ्या गाठी. कालांतराने त्या वाढू शकतात आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकते. हे बहुतेक अनुवांशिक मूत्रपिंड विकार आहेत.

लक्षणे

  • वरच्या ओटीपोटात वेदना
  • ओटीपोटाच्या बाजूला वेदना
  • पाठदुखी
  • लघवीत रक्त येणे
  • वारंवार मूत्रमार्गात संक्रमण

7. आयजीए नेफ्रोपॅथी

आयजीए नेफ्रोपॅथी हा मूत्रपिंडाचा विकार आहे जो अनेकदा लहानपणी आणि पौगंडावस्थेत सुरू होतो असं डॉ. मिली मॅथ्यू म्हणतात. यामध्ये लघवी बाहेर पडली की त्यासोबत रक्तही बाहेर पडतं. हे चाचणीद्वारे आपल्याला कळू शकते.

8. मूत्रपिंड निकामी होणे

मूत्रपिंड निकामी झालेल्या लोकांना फक्त त्याच्या प्रगत अवस्थेत लक्षणे माहित असतात. विशेषतः त्याचे 5 स्तर आहेत. यामध्ये चौथ्या स्तरापर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

जेव्हा मूत्रपिंड काम करणं बंद करतं तेव्हाच लक्षणं दिसून येतात. त्या स्थितीत काही सामान्य लक्षणे दिसतात.

लक्षणे

  • भूक न लागणे
  • उलट्या
  • तीव्र शारीरिक थकवा
  • अंगावर सूज येणे
  • निद्रानाश