गुप्तांगांवर खाज सुटते किंवा जळजळ होते? 'हे' आहेत उपचार

    • Author, जिउलिया ग्रँची
    • Role, बीबीसी न्यूज

काही लोकांना गुप्तांगाच्या आसपास किंवा आतमध्ये खाज सुटते, कधीकधी लघवी करताना खूप जळजळ किंवा आग होते. हा संसर्ग कॅन्डिडा अल्बिकन्स या बुरशीमुळे होतो.

याला कँडिडिआसिस संसर्ग असं देखील म्हणतात. या संसर्गाचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक आहे.

सामान्यतः कॅन्डिडा अल्बिकन्स ही बुरशी गुप्तांगामधील सूक्ष्मजंतूंसोबत एकत्र राहत असते. हे सूक्ष्मजंतू निरोगी सूक्ष्मजंतूंमध्ये गणले जातात.

पण ही बुरशी मात्र संधीसाधू असते. म्हणजे एका निरोगी गुप्तांगामध्ये सूक्ष्मजंतू आणि काही बुरशीच्या पेशी असतात, परंतु जेव्हा या दोन्हींचं संतुलन बिघडतं तेव्हा सूक्ष्मजीवांची संख्या झपाट्याने वाढते आणि कँडिडिआसिसची लागण होते.

स्त्रियांच्या योनीत ही बुरशी जास्त प्रमाणात वाढण्याची अनेक कारणं आहेत.

मासिक पाळी दरम्यान हार्मोनचं असंतुलन, गर्भधारणा, गर्भनिरोधकांचा वापर आणि हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी यामुळे योनीच्या पीएच पातळीवर परिणाम होतो. परिणामी बुरशीच्या वाढीसाठी सकारात्मक परिस्थिती तयार होते.

योनीचा भाग ओलसर आणि उबदार असतो, ज्यामुळे कॅन्डिडा बुरशी अगदी जलद वाढते.

ब्राझिलियन सोसायटी ऑफ यूरोलॉजीच्या विभागाच्या सदस्य बियान्का मॅसेडो सांगतात, हेच जेव्हा पुरुषांचा विचार केला जातो तेव्हा घाम आणि ओले कपडे वापरल्याने पुरुषांच्या लिंगावर घाम येऊ शकतो. यातून कॅन्डिडा बुरशीच्या वाढीचा धोका असतो.

पुरुषांमध्ये, इतर काही कारणांमुळे या संसर्गाचा धोका वाढतो. जसं की :

  • गुप्तांगाची स्वच्छता न ठेवणे
  • शरीराचा भाग सतत झाकणे

या गोष्टी पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही संक्रमणाचे धोके वाढवतात :

  • मधुमेह (रक्तातील ग्लुकोज वाढल्यास बुरशीची झपाट्याने वाढ होते)
  • प्रतिजैविकांचा वारंवार वापर (यामुळे चांगले सूक्ष्मजंतू मरतात)
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे रोग (जसं की कुपोषण, केमोथेरपी, औषधांचा वापर)

लक्षणं काय असतात?

स्त्रियांमध्ये, या संसर्गामुळे योनीतून पांढरा स्त्राव होऊ शकतो. या व्यतिरिक्त योनीत जळजळ, लघवी करताना अस्वस्थता आणि संभोग करताना वेदना होतात.

बियान्का मॅसेडो सांगतात, "पुरुषांमध्ये, लिंगावर लहान लाल ठिपके दिसतात. चट्टे येतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांनाही लिंगामध्ये अत्यंत खाज सुटते."

एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे कँडिडिआसिस हा लैंगिक संक्रमित रोग नाही. मात्र संभोगादरम्यान संक्रमित त्वचेला स्पर्श झाल्यास हा आजार पसरू शकतो असं बियान्का सांगतात.

आजार झालाय हे ओळखायचं कसं? यावर उपचार काय?

चाचण्या न करता संक्रमित भाग पाहून संसर्ग आहे की नाही हे डॉक्टरांना ओळखता येतं.

मात्र काहीवेळा शंका असल्यास 'जर्म आयसोलेशन' किंवा 'बायोप्सी' सारख्या चाचण्या सुचवल्या जाऊ शकतात.

"संक्रमित भागातून ऊतक किंवा द्रव घेऊन चाचणी केली जाते आणि हा कॅन्डिडा संसर्गाचा प्रकार आहे का हे ओळखलं जातं. मात्र बहुतेक प्रकरणांमध्ये, या चाचणीची आवश्यकता नसताना उपचार सुरू केले जातात." असं ब्राझीलमधील सांता पॉला हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट ॲलेक्स मिलर सांगतात.

"कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये बुरशी अधिक वेगाने पसरते. तर बहुतेक प्रकरणांमध्ये संसर्ग आपोआप बरा होतो."

पुरुषांमध्ये काही प्रकारचे मलम आणि अँटीफंगल गोळ्या घेतल्यावर स्थितीत थोडी सुधारणा होते.

साधारणपणे, पुरुषांना तीन ते पाच दिवस अँटीफंगल मलम लावण्याचा सल्ला दिला जातो. काही प्रकरणांमध्ये गोळ्या देखील घेण्यास सांगितलं जातं.

मात्र, या संसर्गाचे गंभीर दुष्परिणाम दिसणं अगदी दुर्मिळ असल्याचं मिलर सांगतात. फारच कमी प्रकरणांमध्ये फिमोसिस दिसून येतं.

फिमोसिस म्हणजे लिंगाच्या पुढील भागावरील त्वचेची लवचिकता तात्पुरती कमी होते.

कँडिडिआसिसचे इतर प्रकार

शरीरात ज्या ठिकाणी बुरशीच्या वाढीसाठी योग्य जागा असते तिथे कँडिडिआसिस संसर्ग होण्याची शक्यता असते.

तोंडावाटे कॅन्डिडिआसिस होण्याची प्रकरणं देखील दिसतात. मुख्यतः बाळांमध्ये आणि लहान मुलांमध्ये याचं प्रमाण दिसून येतं. याला थ्रश असंही म्हणतात. त्यामुळे ओठ, तोंड आणि घशाच्या आत फोड येतात.

त्यामुळे जिभेवर पांढरे डाग पडतात. कोणतेही अन्न गिळतानाही अडचण होते, जळजळ होते.

ज्या भागात भरपूर घाम येतो, जसं की, काखेत आणि स्तनांखाली कॅन्डिडिआसिस संसर्गाचा धोका जास्त असतो.

त्या भागात त्वचेवर लाल ठिपके दिसतात, त्वचेवर तीव्र खाज सुटते.

कँडिडिआसिसचा आतड्यांवर देखील परिणाम होतो.

अँटिबायोटिक्स आणि इम्युनोसप्रेसिव्ह डिसऑर्डरमुळे आतड्यांमध्ये सूक्ष्मजंतूंची संख्या वाढू शकते.

आतड्यामध्ये हा संसर्ग झाल्यास पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, अतिसार, बद्धकोष्ठता आणि मलामध्ये पांढरा द्रव यांसारखी लक्षणे दिसतात.

यातील सर्वात गंभीर संक्रमण म्हणजे सिस्टेमिक कँडिडिआसिस. या प्रकरणात, बुरशी रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरते.

हा गंभीर संसर्ग सामान्यतः एचआयव्ही आणि एड्स सारख्या संसर्गाने बाधित लोकांमध्ये, अवयव प्रत्यारोपणाच्या वेळी आणि इम्युनोसप्रेसिव्ह औषधं घेत असताना होतो.

अशा वेळी ताप, अंगदुखी, स्नायू, सांधेदुखी अशी लक्षणे दिसतात.

कँडिडिआसिसच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून डॉक्टर अँटीफंगल क्रीम आणि गोळ्या लिहून देतात. जेव्हा संसर्ग तीव्र असतो, तेव्हा वेळोवेळी डॉक्टरांना भेट देणं आवश्यक असतं.