You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात उष्णतेची लाट : उष्माघात कसा टाळावा आणि झाल्यास काय काळजी घ्यावी?
महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे राज्यात अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.
उष्माघातामुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
उष्माघात म्हणजे काय?
कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं. ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर्स सांगतात.
बाहेरचं तापमान खूप वाढलं की शरीरातील थर्मोरेग्यूलेशन बिघडतं, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू होऊ शकतो, असं आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात.
यापूर्वीही महाराष्ट्रासह देशभरात उष्माघातामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात विशेषत: नागपूर, मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात.
राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, अशा काही उष्ण राज्यांमध्येही उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ नागरिकांना सोसावी लागते.
जून 2021 मध्ये कॅनडात रेकॉर्डब्रेक उष्णता वाढल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. उष्णतेची लाट आल्याने आणि अनेक शहरांमध्ये पारा 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झाला होता.
एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय करावं?
लोकांनी घाबरू नये, पण काळजी घ्यावी असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. उष्णतेची लाट पाहता आवश्यक नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळा असं आवाहन हवामान खात्याने आणि मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सरीता पिकळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दर तीन ते चार तासाने लघवीला जाणं आवश्यक आहे, त्यासाठी तेवढं पाणी शरीरात जायला हवं. लघवीचा रंग गडद पीवळा असल्यास शरीरात पाण्याची कमतरता आहे असे समजावे."
उष्णतेच्या लाटेमुळे डोकेदुखी, थकवा तसंच सतत झोप येणं ही लक्षणं सुद्धा दिसतात असंही त्या म्हणाल्या.
उष्माघाताची लक्षणं
- चक्कर येणं, उल्ट्या होणं, मळमळ होणं.
- शरीराचं तापमान जास्त वाढणं.
- पोटात कळ येणं.
- शरीरातील पाणी कमी होणं.
ही लक्षणं आढळल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत मुंबई महानगरपालिकेनेही काही सूचना केल्या आहेत.
- तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- दरम्यानच्या काळात, त्याला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं.
- ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.
- त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.
- एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.
- त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या.
- त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.
मुंबई महापालिकेनं काय सांगितलं?
मुंबई महापालिकेनं काल (16 एप्रिल 2024) माध्यमांना माहिती देत म्हटलं की, मुंबईत विशेषतः उद्योग, बांधकामे सुरू असलेल्या भागात उष्णता सर्वाधिक असल्याचा अंदाज आहे. शिवाय बेकरी व्यवसाय अधिक असलेले भाग, लोखंडी कामे होणारे भाग, स्टील व्यवसाय आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक वाहनांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी 'हॉट' स्पॉट (उष्णता असणारे) भाग शोधले जातील.
'हॉट' स्पॉट असलेल्या भागात उष्णता कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाईल. उद्योग-व्यवसायातील कामे कमीत कमी उष्णता निर्माण होतील यासाठी उपाययोजना सुचवण्यात येतील. मोठ्या प्रमाणात वाहने असणाऱ्या ठिकाणी, सर्वाधिक प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी स्प्रिंकतर, प्रदूषण दूर करणारी यंत्रणा बसवण्यात येईल, अशीही माहिती महापालिकेनं दिली.
सोबत मुंबई महापालिकेनं उष्माघात कसा ओळखावा आणि उकाड्यापासून बचाव कसा करावा, याबाबतही मार्गदर्शनपर काही गोष्टी सांगितल्या आहेत.
उष्माघात कसा ओळखावा?
उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फॅरनहाईटपर्यंत (४० डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात.लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसतात.
असा करा उकाड्यापासून बचाव?
- उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी
- दुपारी १२ ते सायं. ४ वाजेपर्यंत शक्यतो घरात थांबा
- पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, थेट येणारा सूर्यप्रकाश, ऊन टाळा.
- पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.
- उन्हात चप्पल न घालता- अनवाणी चालू नये, चहा, कॉफी इत्यादी गरम पेय टाळावीत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)