कॅनडात उष्णतेची लाट : पारा 49 अंशांच्या पुढे, एका दिवसात 70 जणांचा उष्णतेमुळे मृत्यू

एरवी कॅनडा म्हटलं की लोकांच्या नजरेसमोर बर्फाच्छादित प्रदेश येतो. काहींना फोटो पाहूनच थंडीही भरत असेल. पण त्याच कॅनडात तापमान पन्नास अंशांजवळ पोहोचलं आहे. उष्णतेच्या लाटेमुळे इथे एका दिवसात 70 जणांचा मृत्यू झाला आहे.

व्हँकुवर हे ब्रिटिश कोलंबिया राज्यातलं शहर आहे. हा भाग कॅनडाच्या नैऋत्य भागात पॅसिफिक महासागराकाठी असून एरवी इथं जून महिन्यातलं सरासरी तापमान 20 अंशांपर्यंत जायचं. पण यंदा त्यात मोठी वाढ झाली आहे.

कॅनडामध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे काही लोकांचे प्राण गेले आहेत.

गेल्या आठवड्यातील शुक्रवारपासून म्हणजे 18 जूनपासून 130 लोकांचा अचानक मृत्यू झाल्याचं व्हँकुवर पोलिसांनी सांगितलं आहे. त्यातील बहुतांश लोकांचं वय जास्त होतं आणि काही आजारांनी ग्रस्त होते. मृत्यूच्या अनेक कारणांमध्ये उष्णतेची लाट हेही एक असल्याचं त्यांनी सांगितलं.

29 जून रोजी सलग तिसऱ्या दिवशी कॅनडामध्ये सर्वाधीक तापमान ब्रिटिश कोलंबियातल्या लिटन इथं 49.05 अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं.

या आठवड्याआधी कॅनडामध्ये तापमान 45 अंश सेल्सियसच्या वर कधीही गेलं नव्हतं. वायव्य अमेरिका आणि कॅनडाच्या वर सध्या तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे ही लाट तयार झाल्याचं सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते हवामान बदलामुळे असे उष्णतेच्या लाटेसारखे बदल यापुढे वारंवार दिसून येतील. अर्थात कोणतीही एक घटना हवामान बदल म्हणजे क्लायमेट चेंजशी जोडणं थोडं कठीण वाटतं.

पोलिसांच्या माहितीनुसार व्हँकुवर शहरात 65 लोकांच्या मृत्यूचं तापमान हे कारण असण्याची शक्यता असल्याचं सांगितलं.

"व्हँकुवरमध्ये अशा प्रकारची उष्णतेची लाट कधीच आली नव्हती. या लाटेमुळे लोकांचे प्राण जात आहेत", असं पोलीस सार्जंट स्टीव्ह अडिसन यांनी सांगितलं.

"आमच्या अधिकाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, तरीही लोकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत," असं ते म्हणाले.

लिटनमध्ये राहाणाऱ्या मेगन फँडरीख यांनी घराबाहेर बाहेर पडणं जवळपास अशक्य असल्याचं सांगितलं.

ग्लोब अँड मेल या वर्तमानपत्राशी बोलताना त्या म्हणाल्या, "आम्ही शक्य तितकं घराच्या आत राहाण्याचा प्रयत्न करत आहोत. इथं 30 अंशांपर्यंतच्या उन्हाची लोकांना सवय होती पण 30 अंश आणि आताचे 47 अंश यात फार फरक आहे."

एरव्ही उन्हाळ्यातही ब्रिटिश कोलंबियातलं तापमान फारसं जास्त नसतं त्यामुळे अनेक घरांमध्ये एसी नाहीत.

व्हँकुवरमध्ये काही ठिकाणी तात्पुरते पाण्याचे कारंजे आणि कूलिंग सेंटर्स उभी केली आहेत.

कॅनडाच्या हवामान विभागाने ब्रिटिश कोलंबिया, अल्बर्टा तसेच स्साक्त्चेवान इथं उष्णता जास्त असेल असा इशारा दिला आहे.

कॅनडातील हवामानतज्ज्ञ डेव्हिड फिलिप्स म्हणाले, "आमचा देश जगातील सर्वांत दुसरा थंड आणि बर्फाच्छादित देश आहे. आम्ही नेहमीच थंड वाऱ्याबद्दल बोललो आहोत मात्र आता सध्याच्या स्थितीसारख्या स्थितीबद्दल फारसं बोलण्याची वेळ आलेली नाही."

अमेरिकेत 28 जून रोजी पोर्टलँड आणि ओरेगॉन इथं 46.2 अंश सेल्सियस इतकं तर सीएटल, वॉशिंग्टन इथं 42.2 इतक्या तापमानाची नोंद झाली. वॉशिंग्टन आणि ओरेगॉन इथल्या काही मृत्यूंसाठी उष्णतेची लाट कारणीभूत असू शकते.

सीएटलमधील एक रहिवासी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, आता शहरात वाळवंटी प्रदेशासारखं वाटतंय. सर्वजण टी शर्ट आणि अर्ध्या चड्ड्यांवर फिरत आहेत. पण हे सगळं एकदम वाईट आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)