You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंटार्क्टिकाचं बर्फ कमी का होतंय? जाणून घ्या 4 महत्त्वाचे मुद्दे
अंटार्क्टिकावरील बर्फ वेगानं वितळत आहे. अंटार्क्टिकाचं निरीक्षण करणाऱ्या उपग्रहांनी दरवर्षी समुद्रात वितळून मिसळणाऱ्या बर्फाच्या प्रमाणात वाढ झाल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे.
दीर्घकाळासाठी पृथ्वीसाठी ही मोठी समस्या ठरेल.
बीबीसी सायन्सच्या प्रतिनिधी व्हिक्टोरिया गिल यांचं याविषयीचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणं :
अंटार्क्टिकावर अफाट बर्फाची चादर
या शुभ्र खंडावर चार किलोमीटर जाडीपर्यंतचा बर्फाचा थर आहे. याला जगाचा 'आईस बॉक्स' असंही म्हटलं जातं.
पृथ्वीवरील 90 टक्के ताजं पाणी त्यात असतं. ही बर्फाची चादर खूप जड आहे.
काही ठिकाणी तर या बर्फाच्या चादरी खालील जमीन समुद्रपातळीच्या खाली ढकलली गेली आहे.
तापमान वाढीचा परिणाम
जागतिक तापमानवाढीचा परिणाम इथंही पहायला मिळतो. अंटार्क्टिकावरील बर्फाचं प्रमाण कमी किंवा अधिक झाल्याचं चित्र स्पष्ट किंवा सुसंगत नाही.
समुद्रतळाशी बर्फाच्या चादरीचा थेट संपर्क आहे किंवा नाही यावर ते ठरतं. यानुसार बर्फाची चादर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देत असते.
पण ताज्या आकडेवारीनुसार, संपूर्ण अंटार्क्टिकावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास 200 अब्ज टन बर्फ विरघळत आहे.
अंटार्क्टिकावरील बर्फ वेगानं होत आहे कमी
24 स्वतंत्र उपग्रहांनी नोंदवलेल्या माहितीनुसार 2012 नंतर अंटार्क्टिकावरील बर्फ कमी होण्याचं प्रमाण तिप्पट झालं आहे. यावरील अभ्यास एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. यामुळे दरवर्षी समुद्राची पाणीपातळी 0.6 मिलीमीटरने वाढत आहे.
जगभरातील समुद्राची पातळी दरवर्षी तीन मिलीमीटर वाढत असल्याचं आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा अंटार्क्टिकामधील वितळलेल्या बर्फाचं त्यात फार मोठं योगदान असतं.
अंटार्क्टिका : संशोधन आणि शांतीसाठीचा प्रदेश
1959मध्ये वॉशिंग्टन इथं 12 देशांनी अंटार्क्टिका संधीवर स्वाक्षरी केली. हा संपूर्ण खंड शांतीचं प्रतीक आणि विज्ञान संशोधासाठी असेल असं त्यानुसार ठरलं.
या खंडावर मूळ मनुष्यवस्ती नसून आतापर्यंत कधी या प्रदेशावरून युद्धही झालेलं नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)