अंटार्क्टिका : बर्फात दडलेलं एक रहस्यमय जग

अंटार्क्टिकामधील बर्फवृष्टीबाबतीत शास्त्रज्ञांनी दोनशे वर्षांतील निरीक्षण नोंदवलं आहे. त्यानुसार या कालावधीत बर्फवृष्टीत 10% वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

जागतिक समुद्र पातळीत वाढमध्येही अंटार्क्टिकामधील अधिकच्या बर्फवृष्टीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. असं असलं तरी या खंडाच्या आजूबाजूला असलेला बर्फ वितळत असल्याने महासागराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

या शुभ्र खंडावर 1801-1810 च्या तुलनेत 2001-2010 दरम्यान दरवर्षी 272 अब्ज टन इतका अधिक बर्फ साठला होता.

जादा साठलेलं हे बर्फ मृत सागरातील पाण्याच्या दुप्पट आहे.

दुसऱ्या शब्दात सांगायचं तर न्यूझीलंडला एक मीटर पाण्यात बुडवण्यासाठी जेवढं पाणी लागेल इतक्या पाण्याइतकं हे बर्फ आहे.

डॉ. लिझ थॉमस यांनी या अभ्यासातील निष्कर्ष 'युरोपीयन जिओसायन्सेस युनियन'च्या (EGU) सर्वसाधारण सभेत मांडले. वर्तमानात हिमस्तराचं नुकसान व्यापकस्तरावर अभ्यासण्याचा प्रयत्न यातून झाला आहे.

"आतापर्यंतची सर्वसाधारण कल्पना अशी आहे की यात काहीच बदल झालेला नाही - ते फक्त स्थिर आहे. पण असं काही नाही हे या अभ्यासातून दिसून येते," असं डॉ. लिझ म्हणतात.

डॉ. लिझ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंटार्क्टिका खंडातील विविध भागातून गोळा केलेल्या बर्फाच्या 76 कोर ड्रिलचा अभ्यास केला. हे सिलिंडर म्हणजे दरवर्षी जमा होत जाणाऱ्या बर्फाचे गोठलेले थर असतात.

याआधी जे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. ते फक्त 16 कोर ड्रिलवर आधारीत होतं. आताचं व्यापक आहे. या खंडातील बर्फवृष्टीचा पॅटर्न अभ्यासण्यासाठी ते महत्त्वाचं ठरलं.

अंटार्क्टिका खंडात 1800 आणि 2010 दरम्यान दर दशकात 7 अब्ज टन प्रमाणे अतिरिक्त बर्फाचा स्तर तयार झाला. 1900 नंतरचा काळ लक्षात घेतल्यास प्रति दशक हे प्रमाण 14 अब्ज टन असं होतं.

दरम्यान 2018च्या सुरूवातीला रॉयटरचे फोटो जर्नालिस्ट अलेक्झांडर मेनेगिनी यांनी अंटार्क्टिकाची सफर केली. त्यावेळी त्यांनी टिपलेली ही सुंदर छायाचित्रं खास तुमच्यासाठी.

अंटार्क्टिकामधील समुद्री पर्यावरणाच्या संरक्षणासाठी युरोपीयन युनियनने प्रस्ताव सादर केला आहे. त्याअंतर्गत ग्रीन पीसतर्फे या टूरचं आयोजन करण्यात आलं होतं.

चार दिवसांच्या प्रवासानंतर या द्विपावर आढळले ते व्हेल्स, पेंग्विन्स आणि असंख्य हिमनद्या.

प्रस्तावित 'Weddell Sea Marine Protected Area (MPA)'मध्ये 18 लाख चौरस किलोमीटर परिसर संरक्षित करण्यात येणार आहे. हे व्हेल्स, सील्स, पेंग्विन्स यांच्या अधिवासाचं क्षेत्र आहे.

पेंग्विन्ससह सील्सनी समुद्र किनाऱ्यावर केलेली गर्दी. हेलीकॉप्टरमधून हे दृश्य टिपण्यात आलं.

अंटार्क्टिकावर प्राण्याचं एक समृद्ध जग आहे. ज्यात पेंग्विन्स, सीबर्ड्स, सील्स आणि व्हेल्सच्या विविध प्रजाती आढळतात.

सर्व छायाचित्रांचे कॉपीराईट - अलेक्झांडर मेनेगिनी आणि रॉयटर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)