कॉमनवेल्थ गेम्स : सायना की सिंधू, कोण आहे सरस?

    • Author, वंदना
    • Role, बीबीसी टीव्ही एडिटर

गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये पी. व्ही. सिंधूला हरवून सायना नेहवालनं बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. पी. व्ही. सिंधूला सिल्वर मेडल मिळालं. दोघींमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.

पहिला गेम 22 मिनिट चालला. पहिला सेट सायनानं 21-18नं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूनं खूप जोर लावला पण सायनानं हा सेट देखील 23-21 नं जिंकला.

सायनाने गोल्ड मेडल जिंकल्यावर भारताच्या एकूण गोल्ड मेडलची संख्या 26 झाली आहे.

या आधी सकाळी भारताला टेबल टेनिस मिक्स्ड इव्हेंटमध्ये ब्राँझ मेडल मिळालं. मनिका बत्रा आणि एस. गनानासेकरन या जोडीनं मोऊमा दास आणि शरत कमल या जोडीला हरवून ब्राँझ मिळवलं.

कॉमनवेल्थमध्ये आतापर्यंत भारताला 26 गोल्ड, 17 सिल्वर आणि 19 ब्राँझ मेडल मिळाले आहेत.

आमने-सामने

कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की, पी.व्ही सिंधू आणि सायना नेहवाल अशा 2 भारतीय महिलांमध्ये अंतिम सामना झाला. हा सामना कोणत्याही 'सुपर संडे'पेक्षा कमी नव्हता.

एकाच प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळायला सुरुवात करणाऱ्या सायना, सिंधू आणि गोपीचंद अकॅडमीमध्ये एकत्र सराव करणाऱ्या सायना आणि सिंधू यांचा प्रवास काही अर्थाने समान तर काही अर्थाने वेगळा आहे.

28 वर्षीय सायना आणि 22 वर्षीय सिंधू यापूर्वी अनेकवेळा एकमेकांच्या विरोधात खेळल्या आहेत.

यापूर्वीच्या 4 सामन्यांत सायनाने सिंधूला तीनदा पराभूत केलं होतं.

  • 2018-इंडोनेशिया मास्टर्स, सायना विजेती
  • 2017- नॅशनल चॅम्पियनशिप, सायना विजेती
  • 2017 - इंडिया ओपन, सिंधू विजेती
  • 2014-इंडिया ग्रां.प्री. सायना विजेती

सायनाचा प्रवास

सायनाचा जन्म 17 मार्च 1990ला झाला. पण 2003 साली चेक ओपन स्पर्धेत ज्युनियर टायटल जिंकल्यानंतर ती चर्चेत आली.

15 वर्षांची असताना तिनं 9 वेळा चॅम्पियन राहिलेल्या अपर्णा पोपट हिला हरवलं तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर 2006मध्ये सायना नॅशनल चॅम्पियन बनली.

तेव्हापासून सायनानं भरारी घेतली ती आजपर्यंत कायम आहे. असं असलं तरी तिच्यासाठी हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.

बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी सायना पहिली भारतीय होय. 2015साली बॅडमिंटनच्या रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.

तसंच सुपरसीरिज जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली.

2010मध्ये दिल्लीच्या सीरी फोर्ट ऑडिटोरियमध्ये बघितलेला कॉमननेल्थ स्पर्धेतला अंतिम सामना मला आजही आठवतो. कॉमनवेल्थ स्पर्धेचा तो शेवटचा दिवस होता आणि भारतानं तोपर्यंत 99 पदकं जिकली होती.

100वं पदक आणि गोल्ड मेडल मिळवून देण्याचं दडपण सायनावर होतं. उत्कृष्ठ खेळ करत सायनानं अंतिम सामना 19-21, 23-21, 21-13 अशा गुणांनी जिंकला होता.

त्यानंतर 2012मध्ये लंडनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकलं आणि 10 सुपरसीरिज स्वत:च्या नावावर जमा केल्या. खेळाच्या तंत्रज्ञानाबाबत सदैव जागृत असणं आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणं या सायनाच्या जमेच्या बाजू आहेत.

पण मोठ्या सामन्यांत झालेल्या पराभवामुळे अनेक वेळा सायनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. त्यानंतर ती प्रशिक्षक गोपीचंद यांच्या अकॅडमीतून बाहेर पडली.

2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सायनाला गंभीर दुखापत झाली. हा तिच्यासाठी मोठा धक्का होती. पण यातून सावरत तिनं चांगल्या प्रकारे कमबॅक केलं आहे आणि गुरू आणि शिष्याची जोडीसुद्धा सध्या योबत आहे. कॉमनवेल्थमधील पदकामुळे सायनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सिंधूचा प्रवास

सायना नेहवालप्रमाणेच सिंधूला प्रशिक्षण देण्याचं काम गोपीचंद यांनी केलं आहे.

सायनाप्रमाणेच सिंधूनेही कमी वयात विजयी पताका रोवायला सुरुवात केली होती. अंडर -10, अंडर 13 यांसारख्या स्पर्धा ती नियमितपणे जिंकत होती.

2014 आणि 2014 अशी सलग 2 वर्षं ती वर्ल्ड चॅम्पियन ठरली. बॅडमिंटनमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. हा तेव्हाचा काळ होता जेव्हा सायना नेहवालसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये होती आणि दोघींमध्ये स्पर्धा सुरू झाली होती.

2016मध्ये ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात पोहोचणारी सिंधू पहिली भारतीय महिला ठरली. अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरी सिल्व्हर मेडल तिनं जिंकलं होतं. दुसरीकडे दुखापतीमुळे सायना ऑलिम्पिकमधून बाहेर पडली होती.

5.11 फूट उंची असलेल्या सिंधूचे वडील पी व्ही रमन्ना आणि आई पी. विजया व्हॉलीबॉल खेळाडू होते.

माजी आशियाई चॅम्पियन दिनेश खन्ना यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, "सिंधू नेहमीच मोठ्या खेळाडूंसमोर अडचण निर्माण करते. पण जेव्हा केव्हा तिचा सामना कमी रँकिगच्या खेळाडूशी अथवा कमजोर खेळाडूशी असतो तेव्हा मात्र ती कमकूवत ठरते."

सिंधू विरुद्ध सायना

सध्या सायना आणि सिंधू दोघीही गोपीचंद यांचं मार्गदर्शन घेत आहेत. दोघींचाही फॉर्म कायम राहिला तर भविष्यातही त्या आमने-सामने येऊ शकतात.

महिला बॅडमिंटनमध्ये सायनानं ज्या क्रांतीची सुरुवात केली होती सिंधू तीच क्रांती पुढे घेऊन जात आहे.

इंग्रजीत एक म्हण आहे. 'मोर द मेरियर' याचा अर्थ जितकं जास्त तितकं चांगलं असतं. भारतासाठी हा सामना म्हणजे चांगलीच घटना होती.

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जे गोल्ड मेडल जिंकता आलं नाही ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकण्याचं सिंधूचं स्वप्न आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)