कॉमनवेल्थ गेम्स : हिना आणि मनू कशा झाल्या शूटिंग स्टार?

गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत रविवारची सकाळ भारतासाठी सोनेरी ठरली. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवनी सुवर्ण पदक जिंकल्यानंतर भारताने नेमबाजीत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं आहे.

नेमबाजीच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत मनू भाखर हिनं सुवर्ण पदक जिंकलं तर हिना सिद्धूने रौप्य पदक जिंकलं.

मनूनं 240.9 अंक मिळवत सुवर्ण पटकवलं तर हिनाने 234 अंक मिळवत दुसरं स्थान पटकवलं. ऑस्ट्रेलियाच्या इलेना गालियाबोविचनं 214 अंक मिळवून कास्य पदक जिंकलं.

फक्त 2 वर्षांत मनू बनली शूटिंग स्टार

क्रीडा क्षेत्रात मनूनं यश धवल यश मिळवलं आहे. खेळाबरोबरच ती अभ्यासला ही महत्त्व देते. मनू बारावी सायन्सची विद्यार्थिनी आहे. तिच्या वर्गातल्या इतर मुलींप्रमाणे तिनं देखील मेडिकल प्रवेशासाठी क्लासेस लावले आहेत. याच वर्षी झालेल्या सिनिअर वर्ल्ड कपमध्ये तिनं एक नाही दोन वर्ल्ड कप जिंकले आहेत.

10 महिन्यांपूर्वी झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये ती 49 व्या नंबरवर आली होती आणि या वर्षी झालेल्या स्पर्धेत तिनं थेट 10 मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्ण पदक पटकवलं.

2017 साली झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तिनं 15 पदकं जिंकली होती.

तिची खेळातील गती पाहून आपल्याला वाटू शकतं की ती खूप दिवसांपासून सराव करत असावी, पण खरी गोष्ट अशी आहे की तिनं केवळ दोनच वर्षांपूर्वी नेमबाजीला सुरुवात केली आहे.

शाळेत असताना मनूने वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवलं. बॉक्सिंग असो की स्विमिंग की मार्शल आर्ट थांग टा सर्व प्रकारांमध्ये तिला गती आहे. बॉक्सिंगमध्ये शालेय स्तरावर तिनं किती पदक आणि स्पर्धा जिंकल्या याची तर गिनतीच नाही.

एकदा जखम झाल्यावर तिला बॉक्सिंग सोडावी लागली नंतर ती मणिपूरची मार्शल आर्ट थांग टा आणि ज्युडो शिकली.

दोन वर्षांपूर्वी मनूच्या शाळेतील मुलं नेमबाजी करत असताना तिच्या वडिलांनी पाहिलं आणि त्यांनी तिला विचारलं की तू नेमबाजी का शिकत नाहीस?

त्यानंतर तिनं सरावाला सुरुवात केली. लवकरच ती राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागली.

तिच्या यशस्वी होण्यापाठीमागं जितके तिचे परिश्रम आहे तितकाच मोठा वाटा तिच्या पालकांचा देखील आहे.

मनूचे वडील मरीन इंजिनीअर होते. पण जेव्हा मनू शूटर बनली तेव्हा तिला त्यांच्या मार्गदर्शनाची आणि सोबतीची गरज पडू लागली म्हणून त्यांनी आपली नोकरी सोडली.

सराव करताना मनूला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सरावाला जाताना पिस्टल घेऊन जाणं हे कठीण काम होऊन जात असे. त्या पिस्टलचा परवाना असला तरी तिला ती घेऊन जाताना अडचणी येत असत. मनूला विदेशी बनावटीची पिस्टल घेऊन देण्यास तिच्या वडिलांना मोठी कसरत करावी लागली. मनूची आई शिक्षिका आहे. मनू शूटर झाल्यापासून त्यांचा दिनक्रमही बदलला आहे.

आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि ताण-तणावाला चार हात दूर ठेवण्यासाठी मनू योगा आणि ध्यान करते. फक्त शूटिंग कॅंपवरच नाही तर घरी आल्यावर देखील ती ध्यान करते.

हरियाणातल्या गोरिया या तिच्या मूळ गावाला तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या वर्षी होणाऱ्या युथ ऑलिंपिक आणि 2020मध्ये होणाऱ्या टोकिओ ऑलिंपिकच्या सहभागावर सर्वांचं लक्ष असणार आहे.

मनू चॅंपियन बनली आहे पण तिच्या प्रशिक्षकांनी तिला दिलेला सल्ला ध्यानात आहे. तिचे प्रशिक्षक जसपाल राणा म्हणतात, 'नेम भलेही मोठ्या लक्ष्यावर असावा पण आपले पाय मात्र जमिनीवर असावेत.'

हिजाबला नाही म्हणणारी हिना

2016 मध्ये होणाऱ्या नवव्या आशिआई स्पर्धेत तिनं जाण्यास नकार दिल्यानंतर तिचं नाव क्रीडा क्षेत्राबाहेर देखील गाजलं होतं. त्याचं कारण होतं, तिनं हिजाब घालून खेळण्यास नकार दिला होता. ईराणमध्ये चॅम्पियनशिप होती आणि तिथं प्रत्येक महिला खेळाडूनं हिजाब घालूनच खेळावं अशी सक्ती करण्यात आली होती. त्याविरोधात तिनं हे पाऊल उचललं होतं.

गोल्ड कोस्टमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर ती आज पुन्हा चर्चेत आली आहे. 1989मध्ये लुधियानात जन्मलेल्या हिनानं डेंटल सर्जरीमध्ये पदवी मिळवली आहे. राष्ट्रीय स्तरावर नेमबाजी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या वडिलांकडूनच तिनं नेमबाजीचं बाळकडू घेतलं.

पण तिला मेडिकल क्षेत्रातील करिअरही खुणावत होतं. तिला न्यूरोलॉजिस्ट व्हावं वाटत होतं. 2006 साली ती मेडिकल प्रवेशासाठी तयारी करत होती त्याच वेळी तिची नजर आपल्या काकांच्या बंदुकीवर पडली. तिच्या काकांचं बंदुकींच्या मेंटेनन्सचं दुकान आहे. त्यांच्याकडून पिस्टल घेऊन ती नेमबाजी करू लागली. छंदाचं रूपांतर करिअरमध्ये झालं आणि ती नेमबाजीकडे वळली.

पुढं तिनं डेंटल कॉलेजला प्रवेश घेतला. कॉलेज सांभाळून ती स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. 19व्या वर्षीच तिनं हंगेरियन ओपन स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर 2009मध्ये झालेल्या बीजिंग वर्ल्डकपमध्ये तिनं रौप्य जिंकलं.

नेमबाज रौनक पंडित तिचे कोच बनले आणि नंतर त्यांनी लग्न देखील केलं.

2013मध्ये विश्व शूटिंग स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत विश्व विक्रम रचून सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बनली.

नेमबाजीसाठी मनाची एकाग्रता खूप आवश्यक असते. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिनं सांगितलं होतं, खेळात स्थैर्य, टायमिंग, रिदम आणि ट्रिगरचं खूप महत्त्व आहे. त्यामुळं मी वेगवेगळ्या पद्धतीनं सराव करते.

मॅचच्या आधी ती आपल्या आहाराकडं विशेष लक्ष देते. स्पर्धेआधी ती कार्बोहायड्रेड आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवते आणि चहा, कॉफी, साखर कमी करते.

तिच्या कारकीर्दीत तिनं अनेक चढ उतार पाहिले आहेत. जखमी झाल्यामुळं तिला सक्तीची विश्रांती देखील घ्यावी लागली आहे. 2017मध्ये बोटांना झालेल्या जखमांमुळे तिला त्या वर्षी सराव करता आला नाही. सरावावेळी तिच्या बोटांना कंप सुटत असे. फिजिओथेरपी आणि दृढनिश्चयाच्या बळावर तिनं 'कमबॅक' केलं.

2017मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तिनं सुवर्ण पदक पटकवलं होतं. तसेच मिश्र दुहेरी स्पर्धेत जीतू राय सोबत 10 मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं.

जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर नाव कोरलेल्या हिनाचा समावेश फोर्ब्सच्या अंडर-30 यंग अॅचिवर्स या यादीमध्ये करण्यात आला आहे.

शूटिंग व्यतिरिक्त तिला पुस्तकं वाचणं, फिरणं आणि लिहिणं आवडतं. अॅनॉटॉमी, मानसशास्त्र, क्रीडा आणि इंटिरिअर डिजाइनिंग या विषयी वाचणं तिला आवडतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)