You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: मॉडर्ना कंपनीची लस 95 टक्के परिणामकारक असल्याचा कंपनीचा दावा
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, बीबीसी न्यूज
मॉडर्ना कंपनीने विकसित केलेली लस ही 95 टक्के परिणामकारक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मॉडर्ना ही अमेरिकन कंपनी आहे.
काही दिवसांपूर्वीच फायजर कंपनीने दावा केला होता की त्यांची लस 90 टक्के परिणामकारक आहे. त्यानंतर मॉडर्नाने हा दावा केला आहे.
हा ऐतिहासिक दिवस आहे, असं मॉडर्नाने म्हटलं आहे. या लसीच्या उत्पादनासाठी पुढील परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती कंपनीने दिली.
अद्याप मॉडर्नाचा डेटा पूर्ण उपलब्ध झालेल नाही. मॉडर्ना लसीच्या चाचणीत 30,000 जण सहभागी होते. त्यापैकी निम्म्या लोकांना चार आठवड्यांसाठी दोन डोस देण्यात आले होते तर इतरांना डमी इंजेक्शन देण्यात आले होते.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
हे विश्लेषण कोव्हिड-19 ची लक्षणं दिसून आलेल्या पहिल्या 95 जणांवर आधारित आहे.
लस दिलेल्यांपैकी केवळ पाच जणांना कोव्हिडची लक्षणं दिसून आली, तर डमी इंजेक्शन दिलेल्यांपैकी 90 जणांना कोव्हिड-19 चा संसर्ग झाला. ही लस 94.5 टक्के सुरक्षित असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
चाचणीमध्ये कोव्हिडचा तीव्र संसर्ग झालेले 11 रुग्ण होते, पण प्रतिबंधक लस दिलेल्यांना त्यामुळे लागण झाली नाही.
"एकूणच लशीची परिणामकारकता उल्लेखनीय आहे...हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, मॉडर्नाचे चीफ मेडिकल ऑफिसर टॅल झॅक्स यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना म्हटलं.
कोणते प्रश्न अनुत्तरित आहेत?
लशीमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकेल याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. ते मिळविण्यासाठी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचं निरीक्षण करावं लागेल.
वृद्ध लोकांवर ही लस किती परिणामकारकपणे काम करते, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. कोव्हिडमुळे मृत्यूमुखी पडण्याचा धोका वृद्धांमध्ये अधिक आहे.
मात्र झॅक्स यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "आतापर्यंतच्या डेटावरून तरी वयपरत्वे लशीचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसलं नाहीये."
ही लस लोकांना केवळ आजारी पडण्यापासून वाचवते की कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबवते, हेही समोर आलेलं नाहीये.
ही लस सुरक्षित आहे?
आतापर्यंत तरी लशीच्या सुरक्षिततेबद्दल कोणतेही गंभीर प्रश्न उपस्थित झाले नाहीयेत. पण पॅरासिटामोलही 100 टक्के सुरक्षित नसते.
इंजेक्शन दिल्यानंतर काही रुग्णांमध्ये थोड्या काळासाठी येणारा थकवा, डोकेदुखी आणि वेदना अशी लक्षणं जाणवली होती.
"लस ही तिचं काम योग्य पद्धतीनं काम करत आहे आणि चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करत आहे, यादृष्टिनं ही लक्षण महत्त्वाची आहेत," असं इंपीरिअल कॉलेज लंडनमधील प्राध्यापक पीटर ओपेनशॉ यांनी म्हटलं.
फायझरच्या तुलनेत ही लस कशी आहे?
फायझर आणि मॉडर्नाची लस ही एकाच पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून तयार केली आहे.
प्राथमिक डेटानुसार फायझरची लस 90 टक्के सुरक्षित आहे, तर मॉडर्नाची लस 95 टक्के सुरक्षित आहे.
अर्थात, अजूनही दोन्ही लशींच्या चाचण्या सुरूच आहेत आणि अंतिम निष्कर्ष हे बदलू शकतात.
पण मॉडर्नाची लस ही साठवून ठेवायला अधिक सोपी वाटत आहे. कारण ती उणे वीस अंश तापमानालाही सहा महिन्यांपर्यंत स्थिर राहू शकते आणि आपल्या साधारण फ्रीजमध्ये महिन्याभरापर्यंत टिकू शकते.
फायझर लस उणे 75 अंश सेल्सियसमध्ये टिकून राहते. फ्रीजमध्ये ही लस पाचच दिवस टिकते.
रशियानं विकसित केलेली स्पुटनिक व्ही लस 92 टक्क्यांपर्यंत सुरक्षित असल्याचं प्राथमिक डेटातून समोर आलं आहे.
ही लस आपल्याला कधी मिळेल?
तुम्ही जगात कुठे आहात आणि तुमचं वय काय आहे, यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे.
आपण लशीच्या उत्पादनासंबंधी परवानगी घेण्यासाठी अमेरिकेतील नियंत्रकांकडे येत्या आठवड्यांत अर्ज करू, असं मॉडर्नानं म्हटलं आहे. देशात 20 दशलक्ष डोस उपलब्ध करून देण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
पुढच्या वर्षीपर्यंत जगभरात या लशीचे एक अब्जापर्यंतचे डोस उपलब्ध होतील अशी आशाही कंपनीला आहे. त्या त्या देशांमध्ये उत्पादनासाठी परवानगी घेण्याचंही नियोजन केलं जात आहे.
युके सरकार अजूनही मॉडर्नासोबत बोलणी करत आहे. कारण त्यांनी आधी ज्या सहा लशी मागवल्या आहेत, त्यामध्ये मॉडर्नाचा समावेश नाहीये.
वृद्ध लोकांना आधी लस देण्याची युके सरकारची योजना आहे.
ही लस काम कसं करते?
मॉडर्नानं 'RNA व्हॅक्सिन' तयार केलं आहे. म्हणजे ही लस कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचा एक भाग शरीरात इंजेक्ट करते.
हा भाग व्हायरल प्रोटीन्स तयार करायला सुरूवात करतो, जे शरीराच्या प्रतिकारशक्तीला विषाणू संसर्गाविरुद्ध प्रशिक्षित करण्यासाठी पुरेसे असतात.
ही लस शरीराला अँटीबॉडीज तसेच प्रतिकार यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेल्या टी-सेल्स तयार करण्यासाठी प्रशिक्षित करते, ज्यामुळे शरीर कोरोना व्हायरसचा प्रतिकार करू शकतं.
काय आहेत तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया?
"मॉडर्नाच्या लशीसंबंधीची बातमी अतिशय उत्साहवर्धक आणि आशादायक आहे. येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला चांगल्या लशींचे पर्याय उपलब्ध होतील," इंपीरिअल कॉलेज लंडनमधील प्रोफेसर पीटर ओपेनशॉ यांनी म्हटलं.
"अर्थात, आपल्याला या प्रेस रिलीजच्या पलिकडे जाणारे अधिक तपशीलही पाहावे लागतील. पण या घोषणेनंही एक आशादायी चित्र निर्माण केलं आहे," असंही ओपेनशॉ यांनी म्हटलं.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक ट्रुडी लँग सांगतात की, गेल्या आठवड्यात फायझरच्या लशीसंबंधीची बातमी आली आणि आता सारख्याच परिणामकारकतेच्या दुसऱ्या लशीबद्दलही माहिती समोर आली आहे. ही खरंच चांगली बातमी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)