You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या : ज्यांचा तपास करणं गरजेचं अशी अनेक नावं समोर- अनिल देशमुख
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकणी अनेक नावं समोर आली आहेत, ज्यांचा तपास करणं अतिशय गरजेचं आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं आहे.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी कोरोनाची राज्यातील परिस्थिती, देवेंद्र फडणवीसांनी केलेले शरद पवार यांच्यासंदर्भात केलेले राजकीय गौप्यस्फोट यावरदेखील भाष्य केलं आहे.
त्यांना अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणीही काही प्रश्न विचारले. यासंदर्भातलाच मुलाखतीमधला हा संपादित अंश.
सुशांत सिंह प्रकरणात तुम्ही 15 जूनला एक स्टेटमेंट दिलंकी, पोलीस यामध्ये व्यावसायिक स्पर्धेच्या अनुषंगानेही तपास करतील. खरंच असं काही आहे का? आत्महत्येमागची नेमकी कारणं कळू शकली आहेत का?
या प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू आहे. गेल्या 8 दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत. ज्यांना त्यांना बोलवायचं आहे, त्यांना बोलवून चौकशी सुरू आहे.
आमच्याकडे व्यावसायिक स्पर्धेतून त्यानं आत्महत्या केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापद्धतीनं पोलीस खातं तपास करत आहे. अनेकांना बोलावून त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत.
बॉलिवूडमधील काही निर्माते आणि अभिनेते सुशांतच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहेत, असं सोशल मीडियावर बोललं जातंय. अशी काही नावं पुढे आली आहेत का?
मी आपल्याला इथे नावं सांगणार नाही, पण अनेक नावं समोर आली आहेत ज्यांचा तपास करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना बोलावलं जाईल, त्यांची चौकशी केली जाईल. त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल. त्याने खरंच व्यावसायिक स्पर्धेतून आत्महत्या केली आहे का याची चौकशी सुरू आहे.
पण मीडियामध्ये फारच कळतंय-समजतंय, सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत आहेत. तुम्हाला नाही वाटत कीया प्रकरणी अधिकृत माहिती जाहीर करणं गरजेचं आहे.
जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत सांगणं योग्य नाही. या सगळ्या गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. त्याची चौकशी आपण जाहीर करू शकत नाही. कुणी काय सांगितलं यावरून संपूर्ण तपासाअंती जो निष्कर्ष काढू तेव्हा आम्ही जाहीररित्या सर्व सांगू. सध्या चौकशी व्यवस्थित सुरू आहे. ज्यांना बोलवायची आवश्यकता आहे, ज्यांच्याकडून माहिती घेणं आवश्यक आहे त्यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेणं सुरू आहे.
या प्रकरणाच्या CBI चौकशीची मागणी केली जात आहे. खरंच त्याची गरज आहे का?
महाराष्ट्राचं पोलीस खातं या चौकशीसाठी सक्षम आहे.
संजय लीला भन्सालींचीही चौकशी होण्याची शक्यता
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सिनेसृष्टीतल्या अनेकांची चौकशी केली आहे. या प्रकरणी आता दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचीही पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात संजय लीला भन्साली यांना समन्स बजावल्याचं मुंबई मिरर दैनिकाने म्हटलं आहे.
संजय लीला भन्साली आपल्या 'गोलियों की रासलीला...रामलीला' या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूतला घेणार होते, असं सांगितलं जातं. मात्र, सुशांत सिंह राजपूतने यशराज फिल्मसोबत करार केला असल्याने त्याला संजय लीला भंसाळींना नकार द्यावा लागला होता. याचसंदर्भात पोलीस त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
संजय लीला भन्सालीसोबत सुप्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांना त्यांनाही चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत सुशांत सिंहची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, यशराज फिल्मच्या कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मा, दिल बेचारा सिनेमाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा, सहकलाकार संजना सांघी यासह कुटुंब, मित्रपरिवार, सहकारी मिळून एकूण 28 जणांची पोलीस चौकशी झाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)