You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुशांत सिंह राजपूत: नेपोटिझममुळेच सुशांत गेला का अशी चर्चा सोशल मीडियावर का होत आहे?
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय बॉलिवुडमधल्या 'नेपोटिझम'ची.
नेपोटिझम म्हणजे हाती सत्ता वा शक्ती असणाऱ्यांनी आपल्याच ओळखीच्यांना - नातलगांना संधी देणं.
बॉलिवुडमधले गट - निर्माते - दिग्दर्शक नेपोटिझम करत असल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झालाय.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागचं एक कारण नेपोटिझम असू शकतं अशी चर्चा त्याच्या मृत्यूनंतर लगेच सुरू झाली.
इंडस्ट्रीतल्या अनेकांनी सोशल मीडियावर सुशांतच्या मृत्यूविषयीचं दुःख व्यक्त केलं. तर अनेकांनी नेपोटिझमविषयीची नाराजी व्यक्त केली.
फॅन्सनी व्यक्त केली नाराजी
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या त्याच्या अनेक फॅन्सनी हळहळ तर व्यक्त केलीच पण सुशांतला श्रद्धांजली वाहणाऱ्या इतर सेलिब्रिटीजच्या पोस्टवर टीकाही केली.
करण जोहर, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर या सेलिब्रिटींना फॅन्सनी धारेवर धरलं.
सुशांतचा फोटो पोस्ट करत करण जोहरने लिहिलं होतं - "गेले वर्षभर तुझ्या संपर्कात नसल्याबद्दल मी स्वतःला दोष देतोय. अनेकदा असं वाटायचं की कदाचित तुला माणसांची गरज आहे...पण मी कधी या विचाराचा पाठपुरावा केला नाही. पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही."
सुशांतच्या मृत्यूमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचं सांगणारी पोस्ट आलिया भट्टनेही लिहीली होती.
पण करण जोहरच्या शोमध्येच आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांनी सुशांतची थट्टा उडवली होती याची आठवण तिच्या या ट्वीटला रिप्लाय करत अनेक फॅन्सनी तिला करून दिली.
मीडियावर टीका करणाऱ्या सोनाक्षी सिन्हाच्या ट्वीटवरही फॅन्सनी तिला स्टारकिड असल्याबद्दल सुनावलं.
नेपोटिझमविषयीच्या इंडस्ट्रीतल्या प्रतिक्रिया
एकीकडे फॅन्स टीका करत असतानाच दुसरीकडे इंडस्ट्रीमधल्याच काही जणांनी यामागे नेपोटिझम हेच कारण असल्याचं म्हटलंय.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
आयफा सोहळ्यादरम्यान सुशांतने नेपोटिझमविषयी मत व्यक्त केलं होतं. बॉलिवुडमध्ये नेपोटिझम आहे. पण हा नेपोटिझम काहीच प्रमाणात असल्यास आतले आणि बाहेरचे एकत्र राहू शकतात. पण नेपोटिझमुळे बाहेरच्या टॅलंटला संधी मिळाली नाही, तर ते योग्य नसल्याचं सुशांतने या मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर जुन्या मुलाखतीचा हा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर फिरू लागला.
अभिनेते प्रकाश राज यांनीही हा व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. "मी स्वतः यातून गेलो आणि तरलो, माझ्या जखमा खोल आहेत... पण या मुलाला ते सहन झालं नाही...
बॉलिवुडमधल्या कंपूशाहीविषयी कायमच टीका करणाऱ्या कंगना राणावतने दोन मिनिटांच्या व्हिडिओद्वारे आपली मतं मांडली आहेत. सुशांतच्या कामाला इंडस्ट्रीने कधीही दाद दिली नाही, त्याच्या पहिल्या 'काय पो चे' सिनेमाबद्दल त्याला कधी पदार्पणाचा पुरस्कार देण्यात आला नाही किंवा गल्लीबॉयसारख्या सिनेमाला पुरस्कार मिळतात, पण छिछोरे हा चांगला चित्रपट असूनही त्याची दखल घेतली न गेल्याचं कंगनाने या व्हिडिओत म्हटलंय.
गुणवत्तेला दाद मिळणं गरजेचं असल्याचंही कंगनाने म्हटलंय. सुशांतच्या गेल्या काही पोस्ट पाहिल्यास तो प्रेक्षकांनी आपले सिनेमे पहावेत, माझा कोणीही गॉडफादर नाही, आपल्याला या इंडस्ट्रीतून बाहेर काढण्यात येईल अशा विनवण्या करत असल्याचं स्पष्ट दिसत असल्याचंही कंगना राणावतने या व्हिडिओत म्हटलंय..
सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्कारांना काही मोजक्याच सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. यापैकी एक होता अभिनेता विवेक ओबेरॉय. सुशांतच्या अंत्यविधीनंतर विवेक ओबेरॉयने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या भावना मांडल्या.
विवेक ओबेरॉय यामध्ये म्हणतो, "सुशांतच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणं हार्टब्रेकिंग होतं. असं वाटतं की जर मी माझा अनुभव त्याला सांगितला असता तर कदाचित त्याने त्याच्या वेदना कमी झाल्या असत्या. मीही या वेदनांमधून गेलेलो आहे आणि हा प्रवास अतिशय अंधारा आणि एकाकी ठरू शकतो. पण मृत्यू हे यावरचं उत्तर नाही आणि आत्महत्या हा त्यासाठीचा पर्याय ठरू शकत नाही.
"स्वतःला 'कुटुंब' म्हणवून घेणाऱ्या या इंडस्ट्रीने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. चांगलं घडावं यासाठी काही बदल होणं गरजेचं आहे. एकमेकांची निंदानालस्ती कमी करून एकमेकांची काळजी घ्यायला हवी. पॉवर प्ले कमी व्हावा आणि मन मोठं करावं. इगो न बाळगता खऱ्या टॅलेंटची दखल घ्यावी. या कुटुंबाने एक खरंखुरं कुटुंब होण्याची गरज आहे. जिथे नवीन टॅलेंटला प्रोत्साहन मिळेल, ते कुस्करलं जाणार नाही."
जेष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनीदेखील सुशांतच्या मृत्यूविषयी लिहीताना सुशांतला होणाऱ्या त्रास आणि वेदनांचा उल्लेख केलाय. शेखर कपूर यांच्या 'पानी' या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतची भूमिका असणार होती. पण YRF ने काही कारणास्तव हा चित्रपट गुंडाळला.
आपण सुशांतसोबत हा सिनेमा करणार नसल्याचं प्रोड्युसर्सनी सांगितलं आणि म्हणूनच आपण रागारागाने देशाबाहेर निघून गेलो, असं शेखर कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये सांगितलं. सुशांतला घेऊन दुसरा सिनेमा करायला हवा होता, असंही ते म्हणाले.
शेखर कपूर यांनी ट्विटरवर लिहीलंय, "तुला होत असलेल्या वेदना मला माहीत होत्या. तुझा कोणी घात केला हे देखील मला माहित आहे. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तू रडला होतास. गेले सहा महिने मी इथे असतो तर बरं झालं असतं. तू माझ्याशी बोलायला हवं होतंस. तुझ्यासोबत जे झालं, ते त्यांचं कर्म आहे. तुझं नाही."
बॉलिवुड इंडस्ट्रीवरच 'नेपोटिझम'चं अधिराज्य असतानाही सुशांतने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ठसा उमटवला होता असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने म्हटलंय.
तर दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्वीट केलंय - बॉलिवुडमधल्या 'प्रिव्हिलेज क्लब'ने आता शांतपणे बसून विचार करण्याची गरज आहे.
आत्महत्येविषयीच्या राजकीय प्रतिक्रिया
सुशांतचा 'छिछोरे' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याने 7 फिल्म्स साईन केल्या होत्या. पण गेल्या सहा महिन्यांत त्याच्याहातून सातही सिनेमे गेले, असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलाय.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतच्या आत्महत्येविषयीची मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याचं ट्वीट केलं.
त्यांनी लिहीलंय, "सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू गळफास घेऊन आत्महत्या केल्याने झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं असलं तरी, पेशातल्या वैमनस्यामुळे त्याला डिप्रेशनल आल्याच्या तथाकथित बातम्या मीडियात आल्या आहेत. मुंबई पोलीस या दृष्टीने तपास करतील."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)