You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : बीजिंगमध्ये नवे रुग्ण, चीनमध्ये संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता
जगभरात फैलाव झालेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूचं केंद्र चीन होतं. शिस्तबद्ध उपाययोजनांनंतर चीनमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आला होता. मात्र तब्बल 56 दिवसांनंतर चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.
चीनमध्ये कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले आहेत. राजधानी बीजिंगमध्ये दोनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बीजिंगमध्ये गुरुवारी (11 जून) प्रदीर्घ कालावधीनंतर कोरोनाचा रुग्ण आढळला. शुक्रवारी (12 जून) आणखी दोन रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झालं. 9 जून रोजी कोरोनाच्या शेवटच्या रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं होतं. मात्र आता नव्याने रुग्ण आढळू लागल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. नवीन रुग्ण आढळू लागल्याने शाळा सुरू करण्याचा विचार प्रशासनाने रद्द केला आहे. दोन नवे रुग्ण हे फेंगताई जिल्ह्यातील चायना मीट फूड रिसर्च सेंटरचे कर्मचारी असल्याचं जिल्हा उपधिकाऱ्यांनी सांगितलं.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
चीन सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली आहेत. अन्य देशात अडकलेल्या चीनच्या नागरिकांना घेऊन येणारी विमानं अन्य शहरांकडे वळवण्यात आली. बाहेरून आलेल्या नागरिकांना आरोग्य चाचणी आणि 14 दिवस क्वारंटीनमध्ये राहणं अनिवार्य आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने बीजिंग प्रशासनाने 1 ते 3 ग्रेडच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द केला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन रुग्णांनी बीजिंग शहराबाहेर प्रवास केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान गुरुवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोनजणांची न्यूक्लेकिक असिड आणि अँटिबॉडी टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी चीनमधल्या क्षिचेंग प्रांतात हे रुग्ण आढळले होते. या रुग्णांचे कुटुंबीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असून, त्यांना कोणताही त्रास जाणवलेला नाही. 52 वर्षीय व्यक्तीला सातत्याने ताप येत असल्याने त्याने हॉस्पिटल गाठलं. चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. या माणसाचा मुलगा ज्या शाळेत शिकतो तिथल्या 33 मुलांना तसंच 15 शिक्षकांना घरी परतण्यास सांगण्यात आलं. अन्य दोन वर्गांना नव्या क्लासरुममध्ये हलवण्यात आलं आहे. शाळेने संपूर्ण परिसराला निर्जंतुक करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.
चीनमध्ये अनेक मार्केट्स बंद
चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरात कोरोना संसर्गाच्या केसेस सलग दुसऱ्या दिवशी समोर आल्याने स्थानिक प्रशासनाने 6 होलसेल फूड मार्केट पूर्ण तसंच आंशिक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
इथे दोन माणसं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मार्केट बंद करण्यात आलं. ही दोन माणसं त्या मार्केटमध्ये गेली होती. या दोघांना कोरोनाचा संसर्ग कुठून आणि कसा झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
नव्या केसेस आढळल्याने शाळा सुरू करण्याची घाई करणार नाही, असं स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे.
सलग दोन दिवशी तीन नवे रुग्ण आढळल्याने चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलीये, अशा चर्चांना उधाण आलं आहे. केवळ चीनच नाही तर जगातील इतर देशांनाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता भेडसावत आहे. कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे डळमळलेल्या अर्थव्यवस्थेचीही देशांना चिंता आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. मायकेल रायन यांनी सांगितलं की, जगातले अनेक देश कोरोनाच्या थैमानाने त्रस्त झाले आहेत. युरोपातील काही देश, दक्षिण पूर्व आशियातील, उत्तर अमेरिकेतील काही देशांमध्ये कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. काही देशांनी लॉकडाऊन लागू करत कोरोनाचा प्रसार थांबवण्याचा प्रयत्न केला.
"मात्र काही देशांमध्ये कोरोना संक्रमणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना संसर्गाची ही दुसरी लाट आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर हा आजार समूळ नष्ट झालेला नाही. विषाणूवर थोड्या वेळासाठी आपण नियंत्रण मिळवलं मात्र तो आता पुन्हा फैलावू लागला आहे."
"याचं कारण म्हणजे अनेक देशांनी लॉकडाऊन शिथिल केलं आहे. लोक कामानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. अशावेळी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना आयसोलेट करण्याची आवश्यकता आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढायला हवी."
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक एडहॉनम ग्रीबीसुएस यांनी सांगितलं, "कोरोनाविरुद्धची लढाई संपलेली नाही. लोक विषाणुप्रति संवेदनशीलता गमावू शकतात. त्यामुळे विषाणू शरीरावर पुन्हा आक्रमण करू शकतो."
दक्षिण कोरियातही नव्या केसेस
दक्षिण कोरियातही कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे तिथल्या इंटेन्सिव्ह प्रिव्हेन्शन आणि सॅनिटायझेशनच्या कामाची वारंवारता वाढवण्यात आली आहे.
दिवसभरात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दहाहून कमी होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील. सोल शहरात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत.
अमेरिकेत अनेक भागांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण
अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळू लागले आहेत. यामुळे तिथली हॉस्पिटलं भरू लागली आहेत.
टेक्सास आणि अरिझोना या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होतो आहे. अलाबामा, फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना, साऊथ कॅरिलोना, ओरेगॉन, नेब्रास्का या राज्यांमध्ये गुरुवारी संक्रमणाच्या विक्रमी केसेस वाढल्या.
कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातल्या अनेक देशांमधील अर्थव्यवस्था कोलमडल्या आहेत. त्यामुळे अनेक देशांना लॉकडाऊन शिथिल करायचा आहे किंवा पूर्णपणे त्यातून बाहेर पडायचं आहे.
युरोपियन युनियनच्या आरोग्य मंत्री स्टेला किर्याकिड्स यांनी युनियनशी संलग्न 27 देशांना विनंती केली आहे की, शाळा आणि बाकी उद्योगधंदे सुरू करत असाल तर चाचण्यांची संख्याही तितकीच वाढवा.
आवश्यकता भासली तर लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या सवलती पुन्हा लागू केल्या जाऊ शकतात.
कोरोना रुग्णांच्या संख्येत भारताने ब्रिटनला मागे टाकलं
देशात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. 8 जूनपासून दुकानं, आस्थापनं तसंच धार्मिक स्थळं उघडायला परवानगी देण्यात आली. त्यानंतर देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येने टोक गाठलेलं नाही असं तज्ज्ञांना वाटतं.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार, 8 जून रोजी भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 257, 486 एवढी होती. याबरोबरच जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत भारत पाचव्या स्थानी आला होता. 12 जूनला भारताने ब्रिटनला मागे टाकत चौथं स्थान गाठलं.
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 75.70 लाख एवढी झाली आहे. आतापर्यंत 4.22 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत आहेत. तिथे 20.31 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 1.14 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अमेरिकेनंतर ब्राझीलचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने आठ लाखाचा आकडा पार केला असून, तिथे आतापर्यंत 40.919 लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)