You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस उन्हाळा सुरू झाल्यावर आटोक्यात येईल का?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
वाढत्या तापमानाचा कोरोना विषाणूवर परिणाम होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे, कारण कोरोना व्हायरस जगभरात मोठ्या प्रमाणावर फैलाव झालाय.
भारतात उन्हाळा सुरू होऊन आता महिना उलटला आहे, मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच चाललाय. मात्र काही नवीन संशोधनानं आणखी एक आशेचा नवा किरण दाखवलाय.
काय आहेत नवीन संशोधनाची निरीक्षणं?
थंड आणि कोरड्या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं संशोधनात आढळून आलंय. ज्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी संख्येन आढळून आले, त्याच्या तुलनेत कमी तापमान असलेल्या देशांमध्ये 10 मार्चपर्यंत कम्युनिटी ट्रान्समिशनच्या माध्यमातून कोरोनाचा मोठा फैलाव झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय.
दुसऱ्या एका संशोधनात चीनमधल्या 40 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या 100 शहरांमध्ये तापमान वाढल्यानंतर कोरोनाचा फैलाव कमी होत असल्याचा दावा करण्यात आलाय.
कोरोना व्हायरस आता जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत असलेल्या सर्व भागांमध्ये पसरला असून शीत, कोरडा, उष्ण आणि दमट अशा सर्व वातावरणात त्याची वाढ होत असल्याचं लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनच्या संशोधकांनी म्हटलंय.
कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो?
काही संशोधनांमध्ये सर्व ऋतूंमध्येच कोरोनाचा जगभरात फैलाव होत असल्याचा दावा करण्यात आलाय. त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू या व्हायरसचा प्रसार कसा होतो.
एखादी कोरोनाबाधित व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर नाका-तोंडातून एका वेळला किमान 3,000 शिंतोडे बाहेर पडतात. या शिंतोड्यांमध्ये कोट्यवधी कोरोना व्हायरस प्रोटीनच्या आवरणांमध्ये सुरक्षित असतात.
बीबीसी फ्युचर या वेबसाईटवर कोरोना व्हायरस आपल्या शरीराबाहेर पडल्यावर किती वेळ जिवंत राहतो, याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्यात लिहिलंय की अमेरिकन नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार व्हायरस सूक्ष्म थेंबामध्ये कमीत कमी तीन ते चार तास जिवंत राहू शकतात. डोळ्यांना न दिसणारे हे थेंब हवेतही काही वेळासाठी तरंगू शकतात.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
यातला एखादा थेंब लाकडावर पडला तर त्यातला व्हायरस 24 तासांहून अधिक वेळ जिवंत राहू शकतो. प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलवर थेंब पडला तर तो चक्क दोन ते तीन दिवसांसाठी सक्रिय राहू शकतो, म्हणजे कोरोनाग्रस्त माणूस तोंडावर हात धरून शिंकला आणि त्याने त्या हाताने दरवाजा उघडला. त्याच हँडलला तुम्ही दुसऱ्या दिवशी हात लावला तरी तुम्हाला लागण होऊ शकते, असं बीबीसी फ्युचरने अमेरिकन हेल्थ सेंटरच्या हवाल्याने म्हटलं आहे.
तापमानाचा काय परिणाम होतो?
कोणताही विषाणू हा 60-70 डिग्री सेल्सियसपर्यंत नष्ट होत नाही. तेवढं तापमान उन्हाळ्यात बाहेरही नसतं आणि आपल्या शरीराच्या आत तर अजिबात नसतं.
काही व्हायरस तापमान वाढल्यावर नष्ट होतात, पण कोरोना व्हायरसवर तापमानाचा परिणाम होतो का? याविषयी ब्रिटिश डॉक्टर सारा जार्विस सांगतात, "काही विषाणूंमध्ये ऋतूनुसार बदल घडतात हे आपल्याला ठाऊक आहे. त्याची बरीच कारणं आहेत. ज्या थेंबांमध्ये विषाणू आहेत, ते थेंब दमट हवेत जास्त काळ राहू शकतात.
"2002 मध्ये सार्सची साथ आली होती. ही साथ नोव्हेंबर महिन्यात आली, पण ती जुलैमध्ये थांबली होती. पण हे नेमकं ऋतूतील बदलामुळेच झालं का, हे सांगणं कठीण आहे. उन्हाळ्यात आपण घराबाहेर पडणं थांबवतो हे देखील त्या मागे कारण असू शकेल," असं जार्विस सांगतात.
विषाणूतज्ज्ञ डॉ. परेश देशपांडे सांगतात की, तापमान वाढल्यामुळे फार तर त्याच्या नष्ट होण्याचा काळ कमी होऊ शकतो. ते म्हणतात, "जर कडक उन्हात कुणी शिंकलं तर कोरोना असलेले ड्रॉपलेट लवकर वाळतील आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात मंदावू शकतो."
व्हायरस उन्हाळ्याच्या दिवसांत शरिराबाहेर फारसा टिकू शकत नाही, हे साधारणतः माहीत आहे, पण उष्णतेचा यावर नेमका काय परिणाम होतो, हे अजून माहीत नाहीये.
तापमानाच्या भरवशावर बसू नका!
कोरोना व्हायरस जगभरात 180 हून जास्त देशांमध्ये पसरला आहे. यात ग्रीनलॅंडसारखे थंड प्रदेश आणि आखातामधले देश एकसारखेच या रोगाने ग्रस्त आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसवर भारतीय उन्हाळ्याचा फरक पडेल, अशी आशा बाळगायला सध्या तरी काही आधार नाहीये. त्याबद्दल जगभरात संशोधन सुरू आहे.
हार्वर्ड TH चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधले संशोधक मार्क लिपसिच म्हणतात, "फक्त कडाक्याचा उन्हाळा येईल आणि त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबेल या भरवशावर बसून चालणार नाही. आपल्याला सार्वजनिक पातळीवर कठोर उपाययोजना राबवाव्या लागतील."
कोरोनाचे इतर व्हायरस ऋतूसापेक्ष आहेत का?
कोरोनाच्या इतर व्हायरसचा हिवाळ्यात फैलाव होतो असे काही पुरावे असल्याचा दावा युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीननं केलाय. श्वास घेताना त्रास होत असल्याच्या लक्षणांबाबत संशोधकांनी जवळपास दोन हजार लोकांचं आठवडाभर निरीक्षण संशोधकांनी केलं. लक्षणं असलेल्या लोकांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले.
हिवाळ्यात रुग्णांचं प्रमाण जास्त तर उन्हाळ्यात हे प्रमाण कमी असल्याचं संशोधकांच्या निरीक्षणात दिसून आलं. या संशोधनातल्या एलेन फ्रॅगस्झी या शास्त्रज्ञाच्या निरीक्षणानुसार "उन्हाळ्यात काही अंशी दिलासा मिळू शकतो," असं नमूद करण्यात आलंय. पण कोरोना व्हायरसबाबत याची खात्री देता येत नसल्याचंही त्यांचं म्हणणंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)