कोरोना व्हायरस : चेहऱ्याला सतत हात लावल्यानं का आणि कसा होतो संसर्ग?

मनुष्य आणि इतर प्राण्यांमध्ये फरक करणारी एक गोष्ट आहे. या गोष्टीमुळे साथीचा रोग पसरण्यात भर पडते. ती गोष्ट म्हणजे चेहऱ्याला सतत स्पर्श करण्याची सवय.

ऐकून आश्चर्य वाटेल पण मनुष्य हा एकमेव जीव आहे, जो त्याच्याही नकळत चेहऱ्याला वारंवार स्पर्श करत असतो. पण अशापद्धतीने नकळतपणे चेहऱ्याला स्पर्श केल्याने कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराचा संसर्ग होतो.

त्यामुळे आपण असं का करतो आणि नकळत घडणाऱ्या या कृतीला आळा कसा घालता येईल, हा प्रश्न पडणं साहजिक आहे.

धोकादायक 'स्पर्शोत्सव'

आपण सगळेच स्वतःच्या चेहऱ्याला दिवसभरात अनेकदा स्पर्श करत असतो.

2015 साली ऑस्ट्रेलियातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर संशोधन करण्यात आलं.

चेहऱ्याला स्पर्श करणे म्हणजे संसर्गाला निमंत्रण देणे, हे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना माहीत असणं अपेक्षित आहे. मात्र, हे विद्यार्थीसुद्धा चेहऱ्याला स्पर्श करण्यापासून स्वतःला रोखू शकत नसल्याचं आढळून आलं.

ऑस्ट्रेलियातल्या वैद्यकीय महाविद्यालयातील हे विद्यार्थी एका तासात कमीत कमी 23 वेळा चेहऱ्याला स्पर्श करत असल्याचं आढळून आलं.

सार्वजनिक आरोग्य संस्था, डॉक्टर्स आणि जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा हा 'touch fest' म्हणजेच 'स्पर्शोत्सव' धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

म्हणूनच कोव्हिड-19 या कोरोना विषाणुपासून बचावासाठी साबणाने वारंवार हात धुणं जेवढं गरजेचं आहे तेवढचं चेहऱ्याला स्पर्श करणं टाळणंसुद्धा गरजेचं आहे.

आपण सतत चेहऱ्याला हात का लावतो?

या प्रश्नाचं उत्तर कदाचित मानवाच्या उत्क्रांतीत दडलेलं असू शकतं.

सर्वसाधारणपणे असं दिसून येतं, की प्राणी त्यांच्या चेहऱ्याला वारंवार स्पर्श करतात ते स्वच्छतेसाठी किंवा मग चेहऱ्यावर चिकटलेले कीटक काढण्यासाठी. मात्र मनुष्य यापेक्षा वेगळ्या कारणांसाठीसुद्धा चेहऱ्याला स्पर्श करत असतो.

कधीकधी स्वतःला शांत करण्यासाठी चेहऱ्याला हात लावला जातो, तर कधी उगाच फ्लर्ट करण्यासाठी, असं अमेरिकेतील मानसशास्त्राचे प्राध्यापक डॅचर केल्टनर यांच म्हणणं आहे.

ते म्हणतात, "कधीकधी चेहऱ्याला हात लावणे स्टेजवरच्या पडद्यासारखं असतं. एक नाटक संपलं की पडदा पडतो आणि मग दुसरं नाटक सुरू करण्यासाठी पडदा उघडला जातो, अगदी तसंच."

तर behavioural science म्हणजेच वर्तणुकीविषयक विज्ञानाचे तज्ज्ञ इतरही कारणं सांगतात. त्यांच्या मते भावना नियंत्रित करण्यासाठी आणि एखाद्या गोष्टीवर जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करण्यासाठीसुद्धा माणसं चेहऱ्याला हात लावतात.

जर्मन मानसोपचारतज्ज्ञ मार्टिन ग्रॅनवल्ड यांच्या मते हे आपल्या प्रजातीचं मूलभूत वर्तन (fundamental behaviour) आहे. 2017 साली प्रकाशित झालेल्या Homo Hapticus: Why we cannot live without a sense of touch या पुस्तकाचे ते लेखकही आहेत.

बीबीसीशी बोलताना मार्टिन ग्रॅनवल्ड यांनी म्हटलं, "स्वतःला स्पर्श करणं हे अनेकदा कोणताही संवाद साधण्यासाठी नसतं तर ते आपल्याही नकळत घडत असतं.

ते पुढे सांगतात, "चेहऱ्याला हात लावण्यसारख्या हालचाली या आकलनविषयक आणि भावनिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सगळेच करतात."

डोळे, नाक आणि तोंड हे आजार पसरवणाऱ्या जंतूंचे प्रवेशद्वार आहेत आणि म्हणूनच अस्वच्छ हाताने चेहऱ्याला स्पर्श करणं धोक्याचं आहे.

कोव्हिड-19 चं उदाहरण बघा. हे विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर पडलेल्या पाण्याच्या अतिसूक्ष्म थेंबामध्ये (ड्रॉपलेट्स) मोठ्या प्रमाणावर असतात आणि अशा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही आलात, की ते थेंब नाकावाटे तुमच्या शरीरात प्रवेश करतात.

मात्र, हे विषाणू ज्या पृष्ठभागावर जाऊन स्थिरावतात त्याला हात लावला की ते तुमच्या हाताला चिकटतात आणि मग विषाणू असलेला तोच हात तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावला की ते विषाणू डोळे, नाक किंवा तोंडावाटे तुमच्या शरीरात प्रवेश करतात.

कोरोना विषाणुविषयी अजून संशोधन सुरू असलं तरी एखाद्या पृष्ठभागावर कोरोनाचे विषाणू 9 दिवसही जिवंत राहू शकतात, असा अंदाज आहे.

पृष्ठभाग म्हणजे काय तर एखाद्या जनरल स्टोअरमध्ये दुकानदार ज्या काउंटरच्या मागे उभा असतो तो काउंटर, बँक, रेल्वे स्टेशन अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी असलेली आसनव्यवस्था, कपड्याच्या दुकानातले कपडे, तुमचा मोबाईल अशा कुठल्याही पृष्ठभागावर विषाणू असू शकतात.

सार्वजनिक ठिकाणच्या खुर्चीवर एखादी संसर्ग झालेली व्यक्ती बसली असेल आणि ती व्यक्ती तोंडावर हात ठेवून खोकलली असेल आणि तोच हात खुर्चीच्या हातावर ठेवला असेल तर त्या संसर्गजन्य व्यक्तीच्या शरीरातले विषाणू खुर्चीच्या हातावर चिकतात. जेव्हा त्याच खुर्चीत तुम्ही बसता आणि त्या खुर्चीच्या हाताला धरता तेव्हा खुर्चीच्या हातावरचे विषाणू तुमच्या हाताला चिकटतात. तुम्ही जेव्हा तेच हात चेहऱ्याला लावता तेव्हा ते विषाणू तोंड, नाक किंवा डोळ्यांवाटे तुमच्या शरीरात जातात.

पृष्ठभागावर दीर्घकाळ जिवंत राहण्याचे दुष्परिणाम

एखाद्या पृष्ठभागावर विषाणू दीर्घकाळ सक्रीय राहत असेल अशावेळी चेहऱ्याला सतत हात लावणं अधिक धोकादायक ठरतं.

2012 साली अमेरिका आणि ब्राझिलच्या संशोधकांच्या एका पथकाने एक प्रयोग करून बघितला. यात त्यांना आढळलं की त्यांनी रँडमली निवड केलेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणांवरच्या पृष्ठभागांना तासाभरात किमान तीन वेळा स्पर्श केला आणि या लोकांनी तेच हात तासाभरात किमान 3.6 वेळा स्वतःच्या चेहऱ्याला लावले.

काही तज्ज्ञांच्या मते स्वतःच्या चेहऱ्याला स्पर्श करण्याच्या या प्रवृत्तीमुळेच फेस मास्क वापरणं गरजेचं आहे. विषाणू गाळून निर्जंतूक केलेली हवा आत घेण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या चेहऱ्याला कमीत कमी स्पर्श करण्यासाठी मास्क उपयुक्त ठरतात, असं अनेकांना वाटतं.

आपण काय करायला हवं?

चेहऱ्याला हात लावणे, आरोग्यासाठी हानिकारक असेल तर ते टाळण्यासाठी काय करता येईल?

यूके सरकारसाठी धोरण सल्लागार म्हणून काम करणारे कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक आणि वर्तणुकविषयक विज्ञानतज्ज्ञ मिशेल हॉल्सवर्थ यांच्या मते हे करणं जरा अवघड आहे.

बीबीसीशी बोलताना मिशेल हॉल्सवर्थ म्हणाले, "नकळत घडणारं वर्तन थांबवणं एक क्लासिक प्रॉबलम आहे. त्यामुळे चेहऱ्याला स्पर्श करणं पूर्णपणे थांबवण्यापेक्षा सारखं हात धुणं, अधिक सोपं आहे. एखाद्याला 'तुझ्या नकळत घडणारी गोष्ट तू करू नको', असं सांगून उपयोग नाही."

मात्र, काही युक्त्या करता येईल, असं मिशेल हॉल्सवर्थ सांगतात. त्यापैकी एक म्हणजे आपण साधारण किती वेळा चेहऱ्याला स्पर्श करतो, याकडे लक्ष ठेवणं

ते म्हणतात, "उदाहरणार्थ खाज येणे ही शारीरिक गरज आहे. तेव्हा तुम्हाला स्पर्श करावाच लागणार. मात्र, हे कळल्यावर खाजवण्यासाठी तळहातापेक्षा हाताच्या मागच्या बाजूचा वापर केल्यास आपण धोका कमी करतो."

मात्र, हे समस्येवरचं खात्रीलायक उत्तर नसल्याचंही ते मान्य करतात.

चेहऱ्याला स्पर्श करण्याची इच्छा कधी होते, हे ओळखणे

तज्ज्ञांच्या मते चेहऱ्याला स्पर्श करण्याची भावना किंवा इच्छा कधी चाळवते, हे प्रत्येकाने ओळखलं तर त्यावर उपाय करणं सोपं होईल.

हॉल्सवर्थ सांगतात, "जे लोक सारखे डोळ्यांना हात लावतात ते गॉगल्स वापरू शकतात किंवा जेव्हा चेहऱ्याला स्पर्श करण्याची इच्छा होईल तेव्हा हातावर बसायचं"

हात सतत व्यग्र ठेवूनही उद्देश पूर्ती करता येते. उदाहरणार्थ स्ट्रेस बॉल किंवा फिगेट स्पिनर हातात ठेवायचे. मात्र, वापराआधी या वस्तूही निर्जंतूक करून घेणंही गरजेचं आहे.

चेहऱ्याला हात लावायचा नाही, याची स्वतःला वारंवार आठवण करून देणंही फायदेशीर ठरतं.

मिशेल हॉल्सवर्थ म्हणतात, "आपल्याला कम्पल्सिव्ह बिहेविअर आहे, हे माहिती असेल तर मला सारखी आठवण करून देत चला, असं आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना सांगू शकतो."

चेहऱ्याला स्पर्श करणं टाळण्यासाठी ग्लोव्ह्ज वापरणं उपयुक्त ठरतं का? तर नाही. कारण मग ग्लोव्जसुद्धा वारंवार निर्जंतूक करावे लागतील आणि ते सहज नाही.

सर्वोत्तम उपाय - हस्तप्रक्षालन

शेवटी काय तर वारंवार स्वच्छ हात धुणे आणि स्वतःच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, याला पर्याय नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडोस एडॉनॉम गेब्रेयेसूस यांनी 28 फेब्रुवारी रोजी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते, "औषधोपचार किंवा लसीची वाट बघण्याची गरज नाही. स्वतःचं आणि इतरांचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकाला करता येतील, अशा अनेक गोष्टी आहेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)