You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'दुबई ग्रुप' ज्याच्यामुळे कोरोना व्हायरस महाराष्ट्रात पसरला....
- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मराठी नववर्ष उंबरठ्यावर असताना कोरोना व्हायरससारखा जीवघेणा आजार महाराष्ट्रात बळावतोय. चीन, इटली, इराण, अमेरिका, यूकेनंतर कोरोनानं भारतात शिरकाव केला आहे.
सुरुवातीला केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. गेल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात तर कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पण गेल्या सात दिवसात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढली की सध्या देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात असं काय घडलं की अचानक विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या चाचण्या होऊ लागल्या आणि त्या पॉझिटिव्ह येऊ लागल्या आणि हजारोंच्या संख्येनं राज्यातील नागरिकांना क्वारंटाईन करावं लागलं.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, "राज्यात आतापर्यंत 39 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर 108 जण विलगिकरण कक्षात दाखल असून 1063 जणांना होम क्वारंटाईन केलं आहे."
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
महाराष्ट्रात कसा दाखल झाला कोरोना व्हायरस?
राज्यात सर्वप्रथम धुळवडीच्या दिवशी म्हणजेच 10 मार्चला पुण्यात 2 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांच्यावर तातडीने पुण्याच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. कोरोना व्हायरस आता राज्यभर पसरणार याची शक्यता या रुग्णांच्या चौकशीतून समोर आली.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "महाराष्ट्रात सर्वप्रथम आढळलेले पुण्याचे 2 रुग्ण हे दुबईहून आले होते. 40 जणांच्या समूहासोबत हे दोघे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुबईला फिरण्यासाठी गेले होते. महत्त्वाचं म्हणजे या 40 पैकी 37 जण हे महाराष्ट्रातले नागरिक आहेत, तर 3 जण कर्नाटकातले. 1 मार्चला हे 37 जण मुंबई विमानतळावर उतरले. पुण्यातील दोघं मुंबईहून खासगी टॅक्सीने पुण्यात आले. 8 मार्चला या दोघांपैकी एकाला अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली, ज्यात दोघं कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या दोघांचे कुटुंबीय आणि मुंबईतला टॅक्सीचालक अशा सगळ्यांनाच कोरोनाची लागण झाली." .
आरोग्य विभागाचे जनसंपर्क अधिकारी एन. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 39 कोरोना रुग्णांपैकी 12 जण दुबईहून परतलेल्या त्या समुहातले आहे. तर 5 जण लागण झालेल्यांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाबाधीत झालेत.
'कोरोना व्हाया दुबई महाराष्ट्रात'
महाराष्ट्रात व्हाया दुबई आलेल्या या कोरोना व्हायरसचा तिढा पुण्यापर्यंतच थांबला नाही. तर दुबईहून आलेले उर्वरित 35 जण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील असल्यानं अशा सगळ्यांचा शोध प्रशासनाला घ्यावा लागला. या सगळ्या जणांचा शोध घेणं प्रशासनासाठी क्रमप्राप्त झालं आणि त्यासाठी वेळही लागला. तोपर्यंत हे सगळे जण राज्यातील अनेकांच्या संपर्कात आले.
जिल्हा प्रशासनानं अशा सगळ्यांचा शोध घेत त्यांची कोरोना चाचणी केली. तसंच त्यांच्या निकटवर्तीयांचीही तपासणी करण्यात आली. कोरोना व्हायरसचा पुढचा रुग्ण आढळला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या 2 रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 5 रुग्ण आढळले. ज्यामुळे मुंबई, पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली. यात 1 रुग्ण थायलंडहून परतला होता. शुक्रवारपर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 19 इतकी होती. पण लगेचच एका दिवसात राज्यात 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
'दुबईची सहल नेहमीप्रमाणे झाली'
दुबईहून आलेले 'ते' चाळीस जण खासगी टुर्समार्फत दुबईच्या सहलीला गेले होते. त्या टुरमध्ये पर्यटकांना कोणताही त्रास झाला नसल्याचा दावा टुर्सच्या मालकांनी केला आहे.
बीबीसीशी बोलताना टुर्सच्या मालकांनी सांगितलं, "दुबईची सहल नेहमीप्रमाणे चांगली झाली. सरकारनं तेव्हा दुबईला बॅन केलं नव्हतं. त्यामुळे हे कशामुळे झालं याची मलाही कल्पना नाही. मला आठ दिवसांनंतर रुग्णालयातून फोन आला. पुण्यातील दोघांना कोरोना झाल्याची माहिती मिळाली. मी रुग्णालय प्रशासनासोबत इतरांची माहितीही तपासणीसाठी दिली. पण एअरपोर्टला या सगळ्यांचं तापमान तपासलं गेले. त्यात कोणत्याही प्रवाशाला कोरोनाची लक्षणं आढळली नाहीत.
"अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत सहली परदेशाहून परत आल्या आहेत. ज्यात महाराष्ट्रत जवळपास 400 लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून परत आले आहेत. जवळपास 7 हजार पर्यटकांच्या सहली आता पुढे ढकलल्या आहेत. पण दुबईहून आलेल्या 'त्या' नागरिकांना लोक वाईट वागणूक देतायत. त्यांना वाळीत टाकल्यासारखं वागवलं जात आहे."
'महाराष्ट्रातले काही रुग्ण परदेशवारी करुन आलेले'
आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "राज्यात कोरोना व्हायरसची सुरुवात दुबईहून आलेल्या रुग्णांपासून झाली. त्यानंतर अमेरीका, थायलंड अशा परदेशाहून महाराष्ट्रात परतलेल्या नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या पॉझिटिव्ह येऊ लागल्या. त्यामुळे हे रुग्ण ज्यांच्या संपर्कात आले, अशा व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरस आढळला आणि महाराष्ट्रात संख्या वाढू लागली. नुकतंच मुंबईत 2 फिलीपीन्सच्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी ते मुंबईत कामानिमित्त आले होते.
"आता त्यांची चाचणी केली असता पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलंय. ते फिलिपाईन्सवरुन आले तेव्हा आपण व्हिसा बॅन केला नव्हता. आम्ही सरसकट सगळ्यांची चाचणी करु शकत नाही, तशा सूचना आरोग्य मंत्रालयाच्या नाहीत. जे परदेशाहून आलेत आणि ज्यांच्यात लक्षणं दिसत आहेत अशा व्यक्तींचीच कोरोना चाचणी केली जात आहे."
निर्णय घ्यायला उशीर?
भारतात कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरी कोरोना व्हायरसची मूळ लागण ही परदेशाहून आल्यानंतर किंवा अशा व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर होत आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील तपासणी ज्या तत्परतेने करायला हवी होती तशी झाली नसल्याची टीका केली जात आहे.
आरोग्य विषयक पत्रकार लता मिश्रा यांच्या मते, "परदेशातून परत आल्यावर तपासणी करण्याच्या यादीत सुरुवातीला दुबईचा समावेश नव्हता. म्हणूनच महाराष्ट्रात 37 जण कोणतीही तपासणी न करता येऊ शकले. या घटनेनंतरही प्रशासनाकडून तातडीने कोणतीही पावलं उचलण्यात आली नाहीत. परदेशाहून आलेल्या प्रत्येकाला 14 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णयही लवकर घेतला असता तर महाराष्ट्रात कोरोना पसरला नसता."
विमानतळाहून थेट रुग्णालयात
शुक्रवारपासून विमानतळावर परदेशाहून आलेल्या प्रत्येकाला मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात नेलं जातं. तिथं त्यांची चाचणी केली जाते. ज्या रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं आढळत आहेत, त्यांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवलं जातं. तर सौम्य लक्षणं आढळणाऱ्यांना घरच्या घरी वेगळं राहण्यास सांगितलं जातं. यांच्यावर देखरेखीसाठी प्रत्येक वॉर्डत 3 जणांची टीम तयार करण्यात आली. जी अशा नागरिकांचा अहवाल दररोज तयार करते.
आरोग्य विषयक पत्रकार संतोष आंधळे यांच्यानुसार, महाराष्ट्रात रुग्ण वाढत असल्याचं कारण म्हणजे मुंबईत जास्त होणारं फॉरेन लँडींग आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "महाराष्ट्रात असे रुग्ण अधिक आढळत आहेत, कारण दररोज हजारो लोक मुंबई, पुण्यासारख्या शहरात कामानिमित्त, पर्यटनासाठी दाखल होत असतात. WHOच्या सूचनांनुसार केंद्रीय आरोग्य विभागाने काम केलं. आता नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखूनच वागायला हवं. गर्दीत जाणं, कार्यक्रम टाळणं, स्वच्छता राखणं ही जबाबदारी सगळ्यांची आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)