कोरोना व्हायरस : क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण, अलगीकरण म्हणजे नेमकं काय?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

विचार करा... पुढचे 14 दिवस तुम्हाला बंद खोलीत रहावं लागलं तर? तब्बल 14 दिवस तुमचा बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क तुटला तर? मित्र परिवार तर सोडाच पण तुमचे कुटुंबीयही तुम्हाला भेटू शकले नाहीत तर? घाबरू नका. वैद्यकीय भाषेत याला क्वारंटाईन होणं असं म्हणतात.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात आतापर्यंत हजारो रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललीय. चीन, इटली, इराण, युके, अमेरिकेनंतर आता कोरोना व्हायरसचे भारतातही रुग्ण सातत्याने वाढत आहेत.

'क्वारंटाईन'चा अनुभव

सिंगापूरमध्ये राहणाऱ्या जूली कोरोना यांनी आपला क्वारंटाईनचा अनुभव सगळ्यांसमोर मांडला आहे. व्हायरसची लागण झालेल्या त्या देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी एक होत्या. त्या आता पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. कोरोनामुळे काय काय त्रास झाला? आणि एका खोलीत बंद करून ठेवल्यानंतर कसं वाटतं, याचा अनुभव त्यांनी सांगितला.

"आयसोलेशन रूम म्हणजे चार भिंती आणि एक दार. शिवाय एक सुरक्षित पेटी असते जी दोन्हीकडून उघडते. त्यातूनच मला माझं अन्न, कपडे, औषधं दिली जायची. एक बरं की तुमच्याकडे तुमचा फोन असतो, म्हणजे तुम्ही कुणाला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. पण एकाही व्यक्तीच्या थेट संपर्कात नसल्यामुळे चिडचिड होत होती. शेजारच्या खोलीतील लोकांशी तरी बोलावं, कुणाशी तरी बोलावं, असं मला सतत वाटत होतं.

जेव्हा माझी स्थिती खूप वाईट होती, तेव्हा मला जाणवत होतं की मला खूप जास्त दम लागतोय. इतर दिवशी आपण एवढं लक्ष नाही देत की आपण श्वास कसा घेतोय, आपली फुप्फुसं कशी काम करत आहेत. मात्र माझ्या बेडवरून बाथरूमपर्यंत जायलाही खूप जोर लागत होता. ते साधारण 5 मिटरचं अंतर असेल, पण खूप त्रास होत होता. पुढे आणखी काय त्रास होईल मला सांगता येणार नाही, पण मला वाटतं मी जास्त पायी चालू शकणार नाही, कारण मला दम लागेल आणि बसावं लागेल. असं यापूर्वी कधी झालेलं नाही."

'क्वारंटाईन' होणं म्हणजे काय?

क्वारंटाईन होणं म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. स्वत:चा संपर्क इतर सर्वांपासून काही कालावधीसाठी बंद करणं. वैद्यकीय आपत्कालिन परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला क्वारंटाईन होण्यास सांगितलं जाते. संबंधित रुग्णापासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ला एका खोलीत बंद करणे म्हणजेच क्वारंटाईन होणं. क्वारंटाईला 'मेडिकल आयसोलेशन' असंही म्हटलं जातं.

क्वारंटाईन हा मूळ लॅटीन शब्द आहे. ज्याचा अर्थ चाळीस आहे. पूर्वी बाहेरच्या देशाहून आलेल्या जहाजांना चाळीस दिवस बंदरापासून लांब ठेवलं जात होतं. जहाजावरील सर्व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होत असे. जहाज रोगमुक्त आहे, असं जाहीर केल्यावर त्या जहाजाला बंदरावर येण्याची परवानगी दिली जात होती. पुढे प्लेग, कावीळ, ताप, त्वचेचे रोग, अशा संसर्गजन्य आजारासाठी रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था सुरू झाली.

क्वारंटाईन का केलं जातं?

कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये यासाठी क्वारंटाईन केलं जातं. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका आहे.

मुंबईतले व्हायरॉलॉजीस्ट डॉ.अभय चौधरी सांगतात, "खोकल्यापासून बाहेर आलेले पार्टिकल्स 6 फूटापर्यंत असलेल्या व्यक्तीला संसर्ग करु शकतात. सहा फूटाअंतर्गत व्यक्ती असेल तर त्याला संसर्ग होऊ शकतो हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यास त्यांचा संपर्क इतर कुणाशी झाल्यास संसर्ग वाढू शकतो. म्हणून त्रास होत असलेल्या व्यक्तीने वेगळं राहणं गरजेचं आहे."

"प्रत्येकालाच क्वारंटाईन व्हा असं डॉक्टर्स सांगत नाहीत. पण एखाद्याला त्रास होत असल्यास तो व्यक्ती घरच्याघरीही काळजी घेवू शकतो. कुटुंबीयांपासून सहा फूट अंतर ठेवावं. घरी वावरतानाही तोंडावर रुमाल बांधावा. आपलं साहित्य वेगळं ठेवावं."

तुम्हाला जर 'क्वारंटाईन' होण्यास सांगितलं तर?

बीबीसीचे वैद्यकीय प्रतिनिधी फरग्यूस वॉल्श यांनी क्वारंटाईन व्हायचं म्हणजे काय करायचं हे सांगितलं आहे.

  • जर तुम्हाला ताप, खोकला,सर्दी अशी काही लक्षणं दिसून येत असतील तर सगळ्यात आधी डॉक्टरांना फोनवर संपर्क साधा.
  • क्वारंटाईन होण्यासाठी तुम्हाला एका बंद खोलीत रहावं लागेल. ज्याचा दरवाजा बंद असेल, पण खिडक्या तुम्ही उघड्या ठेवू शकता.
  • त्या खोलीच्या बाहेर शाळा, महाविद्यालय, कार्यालय कुठेही तुम्हाला जाता येणार नाही.
  • तुम्हाला भेटायला येण्याची परवानगी कुणालाही नसेल. अगदी तुमच्या कुटुंबालाही नाही.
  • तुम्हाला स्वतंञ शौचालय वापरावं लागेल. तुम्ही इतर कुणाचाही टॉवेल वापरणार नाही याचीही काळजी घ्या.
  • तुम्ही जर कोरोनाग्रस्त असाल तर तुमचा कचरा दोन पीशव्यांमध्ये बांधला जाईल याची काळजी घ्या.
  • तुमची मदत करणा-यांना कोणतही पार्सल दरवाजाबाहेर ठेवायला सांगा.

क्वारंटाईन व्हायची वेळ आली तर मनाची तयारी कशी कराल?

क्वारंटाईन होण्यासाठी सांगितल्यावर सर्वप्रथम मनाची तयारी असणं महत्वाचं आहे. कोणत्याही संसर्गजन्य आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून क्वारंटाईन होण्यास सांगितले जात असले, तरी संबंधित व्यक्तीच्या मनावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. पण अशावेळी आपण मानसिकरित्या खचून जावू नये. मानसोपचार तज्ञ याबाबत सकारात्मक राहण्यास सांगतात.

कोरोनामुळे मनावर दडपण येत असल्याने आता नागरिकांनी मानसोपचार तज्ञ्जांचा सल्ला घ्यायलाही सुरुवात केलीय. कोरोनाची दहशत निर्माण झाल्य़ाने अनेकांना त्याची भीती वाटू लागल्याचंही डॉ. मुंदडा सांगतात. "अशा काही रुग्णांना आम्ही औषधं द्यायला सुरुवात केलीय. दिवसभर कोरोना व्हायरसचेच विचार मनात येत राहतात. घराबाहेर पडायला खूप भीती वाटते. अशा तक्रारी आता येवू लागल्या आहेत."

मुंबईतील मानसोपचार तज्ञ्ज डॉ.सागर मुंदडा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,"क्वारंटाईन म्हणजे आपल्याला काही झालंच आहे असं नाही, हे लक्षात घ्यायला हवं. क्वारंटाईनमुळे तुमच्या मनावर दडपण येवू शकतं त्यासाठी मनोरंजनाची साधनं घेवून जा. तुमचा विरंगुळा होईल अशा गोष्टी सोबत ठेवा. पुस्तकं वाचा. शिवाय, रुग्णालयातही संबंधिताचे समुदेशन होणं गरजेचं आहे. मनावर सारखं दडपण येत राहीलं की कुणाशी तरी बोलत रहा."

भारत सरकारच्या क्वारंटाईनबाबत सूचना

क्वारंटाईनबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानेही परिपञक जारी केले आहे. क्वारंटाईन कसं व्हावं ? त्यासाठीचे मार्गदर्शक पञक सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार,

  • क्वारंटाईन राहण्यासाठी सांगितल्यावर संबंधित व्यक्तीने हवेशीर बंद खोलीत रहावं. शक्यतो एकटं रहावं, कुटुंब सदस्य असल्यास त्याने 1 मीटरपर्यंत अंतर ठेवणे गरजेचे आहे. शक्यतो स्वतंत्र शौचालय वापरावं.
  • घरात फिरण्यावर बंधनं घाला, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना जाऊ नका.
  • सर्जिकल मास्क वापरावं, दर 6-8 तासाने सर्जिकल मास्क बदलावे.
  • मास्कचे विघटन करण्यासाठी बीच सोल्यूशन (5%) अथवा सोडियम हयपोक्लोराईट (5%) वापरून मास्क डिसइनफेक्ट करावं. नंतर ते जाळावं अथवा पुरावं, वापरलेलं मास्क हे संक्रमित असू शकतं.
  • केवळ डॉक्टरांनी परवानगी दिलेली व्यक्तीच क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीशी संपर्क करु शकते.
  • क्वारंटाईन व्यक्तीचे कपडे वेगळे ठेवा. त्यांची खोली, शौचालय ब्लीच सोल्यूशन अथवा फेनॅलीक सोल्यूशनने साफ करा.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)