कोरोना व्हायरस: कोव्हिड-19 मधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या लोकांची गोष्ट

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ने सध्या जगभर थैमान घातलंय, 11 मार्चला मृतांचा आकडा 4,200पेक्षा जास्त झाला होता. काल संध्याकाळी कर्नाटकात कलबुर्गी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे

पण याचा अर्थ कोरोना व्हायरसची लागण झाली म्हणजे आता मृत्यू अटळ आहे, असं अजिबात नाहीये. संशोधकांना वाटतं की दर हजारपैकी मृतांचं प्रमाण हे पाच ते 40 असू शकतं. पण सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार हे प्रमाण हजारात नऊ, म्हणजेच साधारण 1 टक्के नक्कीच आहे. म्हणजेच हजारातले 991 लोक बरे होऊन घरी परतत आहेत.

अशाच जगभरातल्या काही लोकांशी बीबीसीने संपर्क साधला आणि कोरोनाच्या जबड्यातून बाहेर ते कसे बाहेर पडले याची गोष्ट जाणून घेतली.

11 जणांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार करणारा बरा झाला

ब्रिटनमध्ये राहणारे उद्योगपती स्टीव्ह वॉल्श जानेवारीत सिंगापूरला गेले होते, तेव्हा त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला. मात्र ते कळण्याच्या आतच ते सिंगापूरहून फ्रान्सला गेले आणि तिथे एका रिसॉर्टवर थांबले.

तिथे त्यांच्यापासून आणखी 11 जणांना लागण झाली. यांच्यापैकी पाच जण इंग्लंडमध्ये आले, पाच फ्रान्समध्येच होते आणि एका व्यक्ती स्पेनच्या मायोरका बेटावर आहे.

मग मायदेशी परतल्यावर दोन डॉक्टरांना त्यांच्यापासून लागण झाल्यामुळे दोन स्थानिक दवाखानेही बंद करावे लागले होते. अखेर दोन आठवड्यांच्या उपचारानंतर ते आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत.

बीबीसीला त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं मी ऐकलं. "मला आधी एका खोलीमध्ये वेगळं ठेवण्यात आलं होतं. मग मला घरीही इतरांपासून दूर राहण्यास सांगण्यात आलं.

"लक्षणं कोरोनाचीच असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मला विलगीकरण वॉर्डात ठेवण्यात आलं. आत्ता मी तिथेच आहे आणि बचावात्मक उपाय म्हणून माझ्या घरच्यांनाही वेगळं राहायला सांगण्यात आलंय."

विलगीकरण वॉर्डातला अनुभव कसा होता?

सिंगापूरमध्ये राहणाऱ्या जुली कोरोना व्हायरसची लागण झालेल्या देशातल्या पहिल्या काही पेशंट्सपैकी होत्या. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोव्हिड-19 झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना नऊ दिवस विलगीकरण वॉर्डात ठेवण्यात आलं होतं.

आता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. कोरोनामुळे काय काय त्रास झाला आणि एका बंद खोलीत इतक्या वेळ राहण्याचा अनुभव त्यांनी बीबीसीच्या करिष्मा वासवानी आणि ख्रिस्टीन हा यांना सांगितला.

"आयसोलेशन रुम म्हणजे चार भिंती आणि एक दार. शिवाय एक सुरक्षित पेटी असते जी दोन्हीकडून उघडते. त्यातूनच मला माझं अन्न, कपडे, औषधं वगैरे दिलं जायचं.

"एक बरंय की तुमच्याकडे तुमचा फोन असतो, म्हणजे तुम्ही कुणाला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. पण एकाही व्यक्तीच्या थेट संपर्कात नसल्यामुळे चिडचिड व्हायची. शेजारच्या खोलीतील लोकांशी तरी बोलावं, कुणाशी तरी बोलावं, असं मला सतत वाटत होतं.

"जेव्हा माझी स्थिती खूप वाईट होती, तेव्हा मला जाणवत होतं की मला खूप जास्त दम लागतोय. इतर दिवशी आपण एवढं लक्ष नाही देत की आपण श्वास कसा घेतोय, आपली फुप्फुसं कशी काम करत आहेत.

मात्र माझ्या बेडवरून बाथरूमपर्यंत जायलाही खूप जोर लागत होता... ते साधारण 5 मिटरचं अंतर असेल, पण तेवढं चालून जायलाही खूप त्रास होत होता.

नऊ दिवस या वॉर्डात राहिल्यानंतर त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली. त्या आता पूर्णपणे बऱ्या झाल्या असल्या तरी त्यांना वाटतं की त्यांना सध्याच जास्त लांब चालता येणार नाही. "मला वाटतं मी जास्त चालू शकणार नाही, कारण मला दम लागून मला बसावं लागेल. आधी असं होत नव्हतं."

'मला आफ्रिकेत हा रोग न्यायचा नाहीये'

केम सेनू पॅव्हेल डॅरील हा 21 वर्षांचा विद्यार्थी मूळ अफ्रिकेतल्या कॅमरूनचा आहे. तो चीनमधल्या जिंगझू शहरात शिकतोय.

जानेवारीत त्याला अचानक सर्दी, खोकला, ताप आल्याने लहानपणी झालेल्या मलेरियाची आठवण आली. त्याची एक प्रकारे धडकीच भरल्याने त्याने कोरोना व्हायरससाठीची टेस्ट करण्याचं ठरवलं.

"मी पहिल्यांदा दावखान्यात जात होतो तेव्हा मला समोर मृत्यू दिसत होता," तो म्हणाला. त्याला ज्याची भीती होती, तेच झालं - त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली.

आधी त्याचं हॉस्टेल 14 दिवसांसाठी स्वच्छ करुन इतरांपासून बाजूला काढत वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलं, नंतर त्याला 13 दिवस चीनमधल्या एका हॉस्पिटलमध्ये अलिप्त ठेवण्यात आलं. तिथे त्याला अँटिबायोटिक्स आणि HIV च्या रुग्णांना जी औषधं देतात ती देण्यात आली. त्याच्या प्रकृतीमध्ये दोन आठवड्यानंतर सुधारणा होऊ लागली.

कोरोना व्हायरसची लागण झालेला केम हा आफ्रिकन वंशाचा पहिला रुग्ण ठरला. त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च चीन सरकारने केला.

त्याने ठरवलं होतं की जे काही बरंवाईट व्हायचंय ते इथेच होईल. "मला हा आजार माझ्या देशात आणि अफ्रिकेत न्यायचा नाहीये. आता ठणठणीत बरा झाल्यानंतर त्याला त्याच्या घरी जायचंय," असं तो बीबीसीच्या डॅन्नी विन्सेंट यांच्याशी बोलताना म्हणाला.

हे कोरोना व्हायरसपासून पूर्णपणे मुक्त झालेले काही निवडक लोक असले तरी आणखी बरेच लोक आहेत, जे संपूर्णतः ठणठणीत बरे झाले आहेत. मात्र कुठल्याही रुग्णांविषयी समाज पूर्णतः संवेदनशील नसल्याने अनेकांना भीती आहे की जर त्यांनी ही बाब उघड केली तर त्यांच्यासोबत भेदभाव होऊ शकतो.

कोरोनामुळे माझा मृत्यू होऊ शकतो का?

सध्या आपल्याकडे कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांची जी आकडेवारी उपलब्ध आहे, त्यापैकी चीनमधल्या पहिल्या 44 हजार केसेसचा अभ्यास करुन काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यातून असं कळतं की -

  • सर्वाधिक मृतांची संख्या 80 वर्षांवरील रुग्णांची आहे. म्हाताऱ्या लोकांना तरुणांपेक्षा जास्त धोका आहे.
  • मृतांमध्ये सर्वाधिक संख्या अशा रुग्णांची होती ज्यांना हृदयाचा त्रास, मधुमेह किंवा श्वसनाचा त्रास होता.
  • मृतांमध्ये पुरुषांचं प्रमाण महिलांपेक्षा जास्त होतं - 2.8% पुरुष आणि 1.7% महिला

मात्र शास्त्रज्ञ सांगतात की ही आकडेवारी काढणंच इतकं गोंधळवणारं होतं की सध्यातरी याची 100 टक्के खात्री बाळगता येत नाही. असं का?

एक नजर या पिरॅमिडवर टाकली तर ज्यांच्यामध्ये सौम्य लक्षणं दिसून येतात त्यांच्या आजाराबाबत अद्याप स्पष्टता नाही आणि अशा लोकांचं प्रमाण सर्वांत जास्त असू शकतं.

आणि सध्या ही आकडेवारी फक्त चीनमधली आहे. तुमचं वय, लिंग, कुठल्या प्रदेशात राहता आणि तुमच्या देशातली आरोग्य व्यवस्था किती सक्षम आहे, तुम्हाला कसे उपचार मिळतात, यावरून ही आकडेवारी बरीच बदलू शकते. त्यातच, आता हा रोग 110 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरल्याने हे काम आणखी अवघडच होत जाणार आहे.

त्यामुळे हा आकडा सध्या कोणत्याही दिशेने जाऊ शकतो.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)