कोरोना विषाणू: WHOकडून जागतिक आरोग्य संकट म्हणून जाहीर, याचा नेमका अर्थ काय?

    • Author, बीबीसी प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

कोरोना व्हायरसला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने Pandemic अर्थात जागतिक आरोग्य संकट घोषित केलं आहे.

अशा प्रकारची, नियंत्रणात न येणारी कोव्हिड-19ची साथ आम्ही याआधी पाहिलेली नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. आतापर्यंत जगातल्या 114 देशांमध्ये या आजाराचा प्रसार झाला असून पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे चीन, दक्षिण कोरिया आणि इटलीमधून आहेत.

जगभरात आतापर्यंत 1,18,000 जणांना याची लागण झाली आहे. तर 4,291 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस हे आता काही फक्त चीनचं संकट राहिलेलं नाहीये.

इराण, अमेरिका, जपान, फिलिपीन्स, साऊथ कोरिया आणि इटलीनंतर या देशात अनेक रुग्ण आढळले आहेत.

भारतातही कोरोनाचे किमान 60 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. असा एखादा रोग जेव्हा जगभर किंवा संपूर्ण खंडात पसरतो तेव्हा त्याला पँडेमिक म्हटलं जातं.

कोरोना व्हायरसचा धोका किती मोठा?

चीनमधल्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसचा प्रसार जानेवारीच्या मध्यात, म्हणजे दीड महिन्यापूर्वी सुरू झाला. कुण्या एका माणसाने तिथल्या बाजारातून एका जंगली प्राण्याचं मांस विकत घेतलं आणि खाललं. त्या प्राण्यातून हा रोग माणसांमध्ये आला, असं सांगितलं जातं.

कोरोना व्हायरस हा एका विषाणुमुळे होतोय. या रोगाला CoVID 19 असं नावही देण्यात आलंय. याची लक्षणं सुरुवातीला न्युमोनियासारखीच असल्याने या रोगाचा धोका सुरुवातीला लक्षात येत नाही. म्हणजे ताप, खोकला वगैरे. मात्र नंतर पेशंटची परिस्थिती वेगाने खालावते. त्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम होत नाही आणि जीवही जाऊ शकतो.

या विषाणूचा प्रसार हवेतून होतो. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी चीनमधून बाहेर प्रवास केलाय, त्यांच्यासोबत हा रोग आगदी सहज जगभरात पसरतोय. त्यामुळे याला आता पँडेमिक म्हटलं गेलंय.

पँडेमिक म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या रोगाचा एका विशिष्ट भागात प्रादुर्भाव असतो, तेव्हा आपण म्हणतो की त्याची साथ आलीय. याला इंग्लिशमधला शब्द म्हणजे Epidemic. मात्र जेव्हा एखादी साथ ही एका देशाबाहेर किंवा खंडाबाहेर पसरते, आणि एकाच वेळी जगभरात ठिकठिकाणी या रोगाची स्वतंत्रपणे लक्षणं दिसू लागतात तेव्हा त्याला पँडेमिक म्हणतात.

पँडेमिकला मराठी शब्दकोशात प्रतिशब्द आम्हाला आढळला नाही, मात्र त्याला जागतिक साथीचा आजार किंवा महाविनाशकारी असे शब्द वापरले जाऊ शकतात.

यापूर्वी 2009 मध्ये आलेली सार्स रोगाची साथ पँडेमिक जाहीर झाली होती. हासुद्धा एक श्वसन रोग होता, ज्यामुळे जगभरात कमीत कमी 25 देशांमध्ये 773 लोकांचा बळी गेला होता. आताच्या कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ने हा आकडा 9 फेब्रुवारीला ओलांडला. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला तेव्हाच या रोगात पँडेमिकची लक्षणं दिसू लागली होती.

पँडेमिकचा इतिहास

पूर्ण मानव जातीवर संकट येईल असे रोग आतापर्यंत माहीत असलेल्या इतिहासात काही वेळा आले आहेत.

मानवाच्या ज्ञात इतिहासात अशा रोगांच्या साथी येऊन गेल्या आहेत ज्यामुळे संपूर्ण मानव जातीवरच संकट ओढावलं होतं. अगदी ख्रिस्तपूर्व काळात साथीच्या रोगांमुळे अख्खे देश नेस्तनाबूत झाल्याचे पुरावे आढळतात.

तिसऱ्या आणि सहाव्या शतकात वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेगमुळे लाखो बळी गेले होते. 11व्या शतकात कुष्ठरोगाची युरोपभर साथ होती. आजही जगभरात कुष्ठरोगाचे रुग्ण आढळतात.

1350 साली आलेल्या प्लेगमुळे तर पृथ्वीवरची एक तृतीयांश लोक मरण पावले होते. मग 1665 साली आलेल्या प्लेगमुळे लंडनमधील 20 टक्के लोकांचा जीव गेला होता.

18व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुमारे दीडशे वर्षांमध्ये जगभरात कॉलराची साथ 7 वेळा आली होती. रशिया, स्पेन, आफ्रिका, चीन, जपान आणि इंडोनेशियासह अनेक ठिकाणी लाखो लोक मरण पावले.

याच दरम्यान ब्रिटिश सैनिक भारतात आले तेव्हा हा रोग सोबत घेऊन आले. सुमारे 1896-97च्या आसपास भारतात कॉलराची भयंकर साथ आली होती.

गेल्या 200 वर्षांत कांजण्या, रशियन फ्लू, स्पॅनिश फ्लू, एशियन फ्लू अशा अनेक रोगांनी एकाच वेळी जगभरात लाखो लोकांचे जीव घेतले. पण आधी जागतिक आरोग्य संघटनेसारखी संस्था नव्हती, त्यामुळे अशा रोगांची अचूक नोंद त्यावेळी ठेवण्यात आली नव्हती.

HIV-AIDSची सुद्धा एकप्रकारे साथच आली होती. 1981 साली जेव्हा या रोगाबद्दल पहिल्यांदा कळलं होतं, तेव्हा जगभरात अनेक ठिकाणी लोक यामुळे अशक्त आणि आजारी पडत होते, त्यांचा जीव जात होता. आजवर 35 लाखांहून अधिक लोकांचा यामुळे बळी गेलाय.

आता आपण काय करावं?

एक महत्त्वाचं काम नक्की करा - हात स्वच्छ धुवा. जर तुम्हालाही सर्दी खोकला ताप वाटत असेल, तर आजच डॉक्टरांना दाखवा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)