कोरोना माहिती : लॉकडाऊन, पाळीव प्राणी, मास्क वापर अशा तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं

बीबीसी मराठी तुमच्या सर्व प्रश्नांची थेट आणि अचूक उत्तर जगभरातल्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देण्याचा प्रयत्न करतच आहेत.

1. माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? ते कसं ठरलं?

कोरोना व्हायरसची देशभरातील जिल्हानिहाय स्थिती दर्शविणारी यादी केंद्र सरकारने 1 मे रोजी जाहीर केली आहे. ही यादी दर आठवड्याला अपडेट केली जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या रुग्णांची संख्या, ती संख्या किती दिवसांत दुप्पट होतेय (डबलिंग रेट), टेस्टिंगचं प्रमाण आणि व्याप्ती तसंच तज्ज्ञांचं निरीक्षण, या निकषांद्वारे सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

रेड झोन म्हणजे असा जिल्हा, तालुका किंवा महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले असतील. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 4 दिवसांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट होतेय.

ऑरेंज झोन म्हणजे असे जिल्हे, ज्यात गेल्या 14 दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

तर ग्रीन झोन म्हणजे असे जिल्हे, ज्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही किंवा गेल्या 21 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही.

याबद्दल तुम्ही सविस्तर इथे वाचू शकता माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये?

2. मोलकरणीला बोलवू का?

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार, याबाबत राज्य सरकारने दिलेल्या यादीत मोलकरणीचा समावेश नसल्याने त्या घरकामारसाठी जाऊ शकतात की नाही, याबाबत जरा संभ्रम आहे.

पण कंटेनमेंट (प्रतिबंधित) झोन वगळता इतर ठिकाणी घरकामासाठी जाण्याकरिता मोलकरणींना परवानगीची आवश्यकता नाही, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने बीबीसी मराठीला दिली आहे.

जर मोलकरीण घरमालकांच्या घरात राहणारी असेल तर परवानगीची आवश्यकता नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मात्र हाऊसिंग सोसायटीला जर एखाद्याला आतमध्ये येण्याची परवानगी द्यायची नसेल तर त्यासंबंधी ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात, पण परवानगी नाकारताना त्यांच्याकडे ठोस कारण हवं, असंही गगराणी यांनी स्पष्ट केलं.

याबाबतीत सविस्तर तुम्ही इथे वाचायला हवं.

3. लॉकडाऊन होऊनही संख्या का वाढली?

लॉकडाऊनला जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटूनही महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन खरंच काम करतोय की नाही, याबाबत अनेक प्रश्न साहजिकच विचारले जात आहेत.

रुग्णांची संख्या वाढण्यामागची अनेक कारणं असू शकतात - जसं की लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे का, हे पाहिलं पाहिजे.

महाराष्ट्रातल्या आकडेवारीबद्दल राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यानुसार, "कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग लॉकडाऊननंतर मंदावला आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत आहे, कारण आजही 20 टक्के लोकं घराबाहेर पडत आहे."

"तसंच मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये लोकं दाटीवाटीच्या वस्तीत राहतात. तिथे सोशल डिस्टंसिंग पाळणं शक्य होत नाही." ते का शक्य नाही, हे सांगणारा हा बीबीसीचा विशेष रिपोर्ट - भारतीयांना सोशल डिस्टन्सिंग पाळणं अशक्य का आहे?

तर कोरोनाच्या वाढत्या चाचण्यांमुळे साहजिकच रुग्णांची संख्याही वाढणार आहेच.

याचं आणखी एक कारण म्हणजे, कोरोनाचे सुमारे 80 टक्के रुग्ण हे asymptomatic असतात म्हणजे त्यांच्या कुठलीच लक्षणं दिसत नाहीत.

4. उन्हाळा आल्यावर कोरोना जाईल का?

अनेक जण असं म्हणाले होते. तुम्हालासुद्धा असे व्हॉट्सअॅप मेसेज आले असतील. पण तुम्ही पाहतच आहात की कसं उन्हाळा आला आहे, आणि तापमान वाढू लागलंय तसतसे कोरोनाचे रुग्णसुद्धा वाढू लागले आहेत. अर्थातच, उन्हाळा आणि कोरोना यांचा तसा थेट संबंध नाही.

कोणताही विषाणू हा 60-70 डिग्री सेल्सियसपर्यंत नष्ट होत नाही. तेवढं तापमान उन्हाळ्यात बाहेरही नसतं आणि आपल्या शरीराच्या आत तर अजिबात नसतं.

कोरोना व्हायरसवर तापमानाचा परिणाम होतो का, याविषयी ब्रिटिश डॉक्टर सारा जार्विस सांगतात, "2002 मध्ये सार्सची साथ आली होती. ही साथ नोव्हेंबर महिन्यात आली, पण ती जुलैमध्ये थांबली होती. पण हे नेमकं ऋतूतील बदलामुळेच झालं का, हे सांगणं कठीण आहे. उन्हाळ्यात आपण घराबाहेर पडणं थांबवतो हे देखील त्या मागे कारण असू शकेल."

तर विषाणूतज्ज्ञ डॉ. परेश देशपांडे सांगतात की, तापमान वाढल्यामुळे फार तर त्याच्या नष्ट होण्याचा काळ कमी होऊ शकतो. ते म्हणतात, "जर कडक उन्हात कुणी शिंकलं तर कोरोना असलेले ड्रॉपलेट लवकर वाळतील आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात मंदावू शकतो."

व्हायरस उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराबाहेर फारसा टिकू शकत नाही, हे साधारणतः माहीत आहे, पण उष्णतेचा यावर नेमका काय परिणाम होतो, हे अजून माहीत नाहीये.

हार्वर्ड TH चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधले संशोधक मार्क लिपसिच म्हणतात, "फक्त कडाक्याचा उन्हाळा येईल आणि त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबेल या भरवशावर बसून चालणार नाही. आपल्याला सार्वजनिक पातळीवर कठोर उपाययोजना राबवाव्या लागतील."

5. कोरोना व्हायरसचा गरोदर महिलांना जास्त धोका?

गर्भावस्थेत शरीरात भरपूर बदल घडत असतात. यादरम्यान रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळेच आपण संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेत असतो.

UK मधल्या अँगलिया विद्यापीठाचे प्रोफेसर पॉल हंटर सांगतात, "फक्त 9 गर्भवती महिलांच्या आकडेवारीवरून सगळं काही ठीक आहे, असं सांगणं योग्य नाही. जर माझ्या पत्नीबाबत बोलायचं झालं तर मी तिला खबरदारी घ्यायचा, हात धुवायचा आणि काळजी घ्यायचा सल्ला देईन."

आता हा कोरोना व्हायरस जरी नवीन असला तरी गर्भवती महिलांना त्यांच्याच वयाच्या इतर महिलांच्या तुलनेत फ्लूचा धोका जास्त असतो.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत आढळलेल्या केसेसपैकी सर्वांत कमी वयाचा रुग्ण फक्त एक दिवसाचं बाळ होतं.

6. पाळीव प्राण्यांमुळे कोरोना होतो का?

हा रोग वुहानमधल्या एका जंगली प्राण्याचं मांस खाल्ल्यामुळे माणसांमध्ये पसरल्याचं सांगितलं जातं. पण सुरुवातीला इतर कुठल्याही प्राण्यात या व्हायरसचे गुण आढळले नव्हते.

पण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीनुसार अमेरिकेतील एका प्राणिसंग्रहालयात 4 वर्षांच्या वाघिणीलाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती. मात्र एखाद्या प्राण्यापासून माणसाला कोरोनाची लागण झाल्याचा पुरावा अद्याप उपलब्ध नसल्याचंही या बातमीत सांगण्यात आलं होतं.

आतापर्यंत उपलब्ध पुराव्यांनुसार, काही ठिकाणी मांजरी आणि कुत्र्यांना कोरोना व्हायसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

पण कोणत्याही प्राण्याची स्थिती एकदम चिंताजनक झाली नाही. असं का, याचा तपास शास्त्रज्ञ करत आहेत. एक शक्यता हीसुद्धा असू शकते की जसा हा व्हायरस मानवी शरीरात गुणाकार करोत, तसा इतर प्राण्यांच्या शरीरात करत नाही.

पण या प्राण्यांपासून हा रोग तुम्हाला होऊ शकतो का?

याची शक्यता फारच कमी असल्याचं संशोधक आणि पशुवैद्यकांना वाटतं. 2003च्या सार्सच्या साथीवेळी काही कुत्र्यामांजरांना त्या व्हायरसची लागण झाली होती, त्यामुळे ही भीती कायम आहे. मात्र तेव्हाही कोणत्याच प्राण्यातून हा रोग माणसांमध्ये आल्याचे पुरावे नाहीत.

पण प्राण्यांच्या फरमधून कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते का? नॉटिंगहम विद्यापीठामध्ये प्राण्यामधल्या विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या सहकारी प्राध्यापक डॉ. रेखल टार्लिंटन सांगतात, "तसं पाहायला गेलं तर फर हा एकाद्या कापडाप्रमाणेच एक पृष्ठभाग आहे, त्यामुळे त्यावर जर कोरोना विषाणू असेल तर तोही शरीरात जाऊन लागण होऊ शकते. मात्र तसा कुठलाही पुरावा अजून आढळलेला नाही."

त्यामुळे सध्यातरी तुम्ही किंवा तुमचे पेट्स सेफ आहात, असंच म्हणता येईल.

7. मास्क घातल्याने मी सुरक्षित राहीन?

कोणता मास्क वापरत आहात, यावर बरंच अवलंबून आहे. N95 मास्क वापरणं सर्वांत सुरक्षित आहे.

पण मास्क घातल्याने आणखी एक गोष्ट होते - सतत चेहऱ्याला हात लावण कमी होतं. ते चांगलं आहे, कारण हाताला लागलेले विषाणू नाकातोंडाजवळ जाणं धोक्याचं आहे.

पण प्रत्येकाने मास्क घालून फिरलंच पाहिजे, असं नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार फक्त दोन प्रकारच्या लोकांनी मास्क वापरायला हवेत -

  • जे आजारी आहेत आणि ज्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत आहेत
  • जे कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत किंवा काळजी घेत आहेत.

मेडिकल मास्क हे फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवावेत, असंही WHOनं म्हटलं आहे.

इतर सामान्य जनतेने मास्क घालायलाच हवेत, असं नाही कारण -

  • मास्क घालताना किंवा काढताना ते इतर व्यक्तींच्या खोकल्याने किंवा शिंकण्याने दूषित होऊ शकतात
  • नियमितपणे हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं अधिक परिणामकारक आहे
  • मास्क आपण सुरक्षित असल्याचा आभास, एक खोटी भावना निर्माण करू शकतात

8. लसूण खालल्याने कोरोना दूर जातो का?

'लसूण आरोग्याला पोषक पदार्थ असतो. त्यामध्ये सूक्ष्म विषाणूंचा प्रतिकार करण्याचे गुण काही प्रमाणात असतात. त्यामुळे तो कोरोना व्हायरसचा हल्ला परतावून लावू शकतो,' अशा आशयाचे अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.

पण लसूण खाल्ल्याने कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळत असल्याचा कोणताही पुरावा नाही.

तसंच लवंग खाल्ल्यानं, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं किंवा नाकाखाली तीळ ठेवल्यानं कोरोनापासून बचाव होऊ शकतो याचा पुरावा मिळत नाही.

कुठल्याही घरगुती उपायांमुळे कोरोना व्हायरस बरा होतो, असं काहीही कुठेही वाचलं, ऐकलं तर कृपया विश्वास ठेवू नका. कारण तसं शक्य असतं तर दररोज शेकडो लोकांचे जीव वाचले असते.

हो, फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश आणि भरपूर पाणी पिण्याचा एकूण निरोगी आरोग्यासाठी फायदा होतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण एखादी विशिष्ट गोष्ट खाल्याने कोरोना व्हायरसशी लढा देतो याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.

अशाच काही शंकांचं समाधान इथे करून घ्या

9. विमा कंपन्या इलाजाचा खर्च देणार?

तुम्हाला या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, असा संशय तुमच्या डॉक्टरांना आला तर ते थेट तुम्हाला सरकारी दवाखान्यात पाठवतील. तिथे राहण्याचा आणि उपचाराचा खर्च सरकार करतं.

सध्या कोरोनावर रामबाण इलाज नसला तरी मृत्यूचं प्रमाण 1 ते 3 टक्क्यांपर्यंत आहे, म्हणजे शंभरातले 97-98 लोक बरे होऊन घरी परततात. त्यांचाही सर्व खर्च सरकार करतं.

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचे CEO मयांक बथवाल यांनी सांगितलं, की आमचे सध्या सर्व इन्शुरन्स प्रॉडक्ट्स आणि हेल्थ इन्डेम्निटी रिइंबर्समेंट प्रॉडक्ट्स कोरोना व्हायरस कव्हर करतात. त्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जरी भरती करावं लागलं तरी ते कव्हर होतं.

पण जर भरती केलं नाही तर मात्र तुम्ही केलेला खर्च कव्हर होणार नाही.

IRDAI ही विमा कंपन्यांची नियंत्रक संस्था आहे. त्यांनी सर्व विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत, की या आजाराला कव्हर करण्यात यावं.

10. नोटांना हात लावल्यामुळे संसर्ग?

आपल्याकडे नोटा किती मळक्या असतात आणि आपण त्या कशा हाताळतो, हे आपल्यालाही माहितीये. त्यांच्याद्वारे आजार सहज पसरू शकतात.

चीन सरकारने सध्या त्यांच्या बँकांना सर्व नोटा sterilise करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हीही शक्यतो कॅशलेस व्यवहार करा आणि कार्ड्स किंवा नोटा वापरल्यानंतर लगेच हात स्वच्छ करा.

11. काळजी कशी घ्यायची ?

सध्या तरी डॉक्टर सांगत असल्याप्रमाणे हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि खोकताना-शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरा. महत्त्वाचं म्हणजे गर्दी टाळा.

तुम्हाला सर्दी-खोकला-ताप असेल तर काळजी घ्या, त्वरीत डॉक्टरांना दाखवा आणि आवश्यक ती औषधं घ्या.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)