You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: मुंबईची लोकल सेवा थांबवण्याचा निर्णय नाही- मुख्यमंत्री
मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा सकाळपासून होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. जीवनावश्क वस्तुंची दुकानं सोडून इतरांनी स्वतःहून आपली दुकानं बंद केली तर बरं होईल असं त्यांनी सांगितलं.
लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. लोकल बंद असल्यास मुंबई ठप्प होते, असं आजवर दिसून आलंय.
मुंबईमध्ये पश्चिम, मध्य आणि हार्बर असे उपनगरी गाड्यांचे तीन विभाग आहेत. या तिन्ही मार्गांवर दिवसाला सुमारे 2 हजार 342 लोकल धावतात. अंदाजे 75 लाखांहून अधिक लोक एका दिवसाला प्रवास करतात.
त्याचप्रमाणे मुंबईत आजच्या घडीला मेट्रोचा वर्सोवा ते घाटकोपर हा एकच एकच मार्ग सुरू आहे. 11.4 किलोमीटरच्या या मार्गावर एकूण 12 स्थानकं आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी आणि मध्य रेल्वेमार्गावरील घाटकोपर या स्थानकांना मुंबई मेट्रो जोडते. मुंबई मेट्रोतून दिवसाला साधारण 4 लाख 5 हजार लोक प्रवास करतात.
मुंबईत आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये महानगरपालिकांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या, ठाण्यामध्ये टीएमटी, नवी मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये एनएमएमटी, कल्याण डोंबिवलीमध्ये केडीएमटी, वसई विरार महानगरपालिकेची व्हीव्हीएमटी या सेवा चालवल्या जातात. त्याचप्रमाणे अलिबाग, मांडवा, उरण, रेवस, मोरा इथं फेरीबोटीची सेवा चालवली जाते.
मुंबईत बेस्ट बससेवेचे एकूण 12 डेपो आहेत. मुंबईतल्या बहुतांश लहान-मोठ्या रस्त्यांवरून बेस्टच्या बसेस धावतात.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बेस्टनं अद्याप बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला नाहीय. मात्र, संजय गांधी नॅशनल पार्क एका आठवड्यासाठी बंद ठेवण्यात आल्यानं, त्य मार्गावरील बस म्हणजे बोरीवली ते कान्हेरी गुंफा दरम्यान चालणारा बस मार्ग क्र 188 (मर्यादित) बंद करण्यात आलाय. 22 मार्च 2020 पर्यंत या मार्गावरील बेस्ट बसेस बंद असतील.
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
मुंबईतली लोकलसेवा सध्या नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं ट्विटरवरून दिली आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरामध्ये वाढ
लोकांनी प्लॅटफॉर्मवर गर्दी करु नये, यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्मच्या तिकीट दरात वाढ केलीय. मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या विभागांमधील रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीचे तिकीट दर 10 रुपयांवरुन 50 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत वाढीव दर आकारण्यास मध्य रेल्वेनं या विभागांना सांगितलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (17 मार्च) राज्यातील स्थितीबाबत बोलातना म्हटलं होतं की, "एसटी, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना साफसफाईच्या सूचना दिल्या असल्याचं सांगून स्वच्छता कशी करावी, याचं एकच डिझाईन असावी, ती राज्य सरकारकडून एसटी आणि रेल्वेला दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. बस आणि लोकल बंद करण्याचा सध्या तरी विचार नाही"
मात्र, आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील लोकलसेवेबाबत निर्णयाची शक्यता आहे.
क्वारंटाईनमध्ये राहणं काही आनंददायी गोष्ट नाहीय. पण आपण खबरदारी म्हणून तसं करतोय. ज्यांना क्वारंटाईनमध्ये जायचं नसेल, ज्यांना घरातच राहायचं असेल, तर भान राखावं लागेल, असा सतर्कतेचा इशारही त्यांनी दिला.
MPSC पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसार
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या गोष्टी रद्द होत असल्या तरी 5 एप्रिल रोजी होणारी MPSCची पूर्व परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे.
MPSC एक पत्रक प्रसिद्ध करून याची माहिती दिली आहे.
तसंच 31 मार्च नंतर गरज पडल्यास त्याचा फेरआढावा घेऊन परिक्षेच्या वेळपत्रकाबाबत निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्थगित
कोरोनाची लागण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे जाहीर केले.
यू.पी. एस मदान यांनी सांगितले की, राज्यात कोरोना विषाणूचा (कोव्हिड- 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगास केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा 10 ऑगस्ट 2005 रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आज आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.
राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदारयाद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा/ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 15 पंचायत समित्या; तसेच सुमारे 12 हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही मदान यांनी स्पष्ट केले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)