You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुशांत सिंह राजपूतचे शेवटचे काही तास कसे होते?
- Author, मधु पाल वोहरा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला 14 जून 2022 रोजी दोन वर्षं झाली आहेत. सुशांत वांद्र्याच्या ज्या भाड्याच्या घरामध्ये राहात होता, त्याच फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या केली होती.
टीव्ही मालिकेत अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर सिनेजगतामध्येही चांगलं नाव कमावणाऱ्या सुशांतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली.
सुशांतचा मुंबईत स्वतःचा एक फ्लॅट होता. पण त्याला मोठ्या घरात राहायचं होतं, म्हणून तो वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये निधनाच्या आधी आठ महिन्यांपासून राहात होता. या फ्लॅटमध्ये तो एकटाच राहात नसे.
त्याच्याबरोबर त्याचे क्रिएटिव्ह मॅनेजर, त्याचा एक मित्र आणि जेवण करणारा एक नोकरही राहात होता. रविवार (14 जून 2020) ची सकाळ सुशांतच्या आयुष्यातली शेवटची सकाळ असेल असा या घरात राहाणाऱ्या कोणीही विचार केला नव्हता. सुशांत सिंहच्या नोकराने पोलिसांना सांगितले, सकाळपर्यंत सर्व काही ठीक होतं.
सकाळी 6.30 वाजता सुशांत उठला होता. 9 वाजता त्याला डाळिंबाचा रस दिला आणि तो त्याने प्यायलाही होता. त्यानंतर 9 वाजता सुशांतने बहिणीशी गप्पा मारल्या. त्यानंतर अभिनयाची कारकीर्द ज्याच्या बरोबर सुरू केली त्या महेश शेट्टीशीही त्याने फोनवर संवाद साधला. हे दोघे एकता कपूरच्या किस देश मे होगा मेरा दिल मालिकेत होते. दोघेही चांगले मित्र होते. सुशांतने शेवटचा फोन त्यालाच केला.
त्यानंतर तो खोलीत गेला आणि आतून लॉक करुन घेतले. सकाळी 10 वाजता जेवणाबद्दल विचारायला गेल्यावर सुशांतने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दोन तीन तासांनी मॅनेजरने सुशांतच्या बहिणीला फोन केला. बहीण आल्यावर कुलूप उघडणाऱ्या माणसाला बोलावण्यात आलं आणि दरवाजा उघडला.
त्यानंतर त्यांना जे दृश्य समोर दिसलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांच्या मते सुशांतचा मृत्यू सकाळी 10 ते दुपारी 1 च्या मध्ये झाला असावा. त्याचा मृतदेह पाहून नोकराने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी माध्यमांशी बोलताना आपल्याला त्याच्या मृत्यूची बातमी दोन वाजता मिळाल्याचे सांगितले. पोलीस 2.30 वाजता त्याच्या घरी पोहोचले आणि तपास सुरू केला.
पोलिसांना सुशांतकडून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. त्याचा मृतदेह संध्याकाळी साडेपाच वाजता आरएन कूपर रुग्णालयात नेण्यात आला. तिथे त्याच्यावर पोस्टमार्टेम करण्यात आलं.
तोपर्यंत पोलिसांनी कोणतीच माहिती दिली नाही. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण सांगता येईल, असं मुंबई झोन 9 चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)