You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: तुमच्या प्रथमोपचार पेटीत 'या' गोष्टी आहेत का?
मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात आढळला होता. गेल्या वर्षभरात या विषाणूमुळे आपलं आयुष्य बदलून गेलंय.
मधल्या काही काळात कोरोनाची राज्यातली रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली होती पण आता हा आकडा पुन्हा वाढतोय. म्हणूनच कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घेणे गरजेचे आहे, याबाबत सतत जनजागृतीही केली जात आहे.
यानुसार, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायजर वापरणे, मास्क वापरणे, गरज नसेल तर घराबाहेर न पडणे, गर्दीत न जाणे, गरम पाणी पिणे अशी अनेक पथ्य आहेत, जी संसर्गापासून बचावासाठी आरोग्य संघटना आणि डॉक्टरांकडून सूचवण्यात आली.
कोरोना काळात लोकांनी आपल्या आरोग्याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला सुरुवात केली. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, कोरोना व्हायरस लवकर जाणार नाहीय. तो आपल्यासोबत आणखी काही काळ असेल. त्यामुळे आपल्या सवयींमध्ये बदल करण्याबरोबरच आता आपल्या घरांमध्ये काही विशेष गोष्टी असणं गरजेचे आहे.
आपल्या घरातील प्रथमोपचार पेटीत साधारण कापूस, डेटॉल, बँडेज, जखम बरी होण्यासाठी एखादं क्रीम, पेनकीलर अशी औषधं असतात. पण यात आणखी काही औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि घरगुती उपाय अशा गोष्टींची पूर्वतयारी करावी लागणार आहे.
कोरोना काळात वैद्यकीयदृष्ट्या तुमच्या घरी कोणत्या गोष्टी असणं गरजेचे आहे? घरच्याघरी मदत होणाऱ्या बाबी कोणत्या आहेत? डॉक्टर्स त्याविषयी काय सांगतात? अशी सगळी माहिती आपण पाहणार आहोत.
थोडक्यात प्रवासाला जाण्यापूर्वी काहीही विसरायला नको म्हणून आपण एक चेकलिस्ट तयार करतो. तशीच कोरोना आरोग्य संकट काळात वैद्यकीय मदत पुरवणारी ही चेकलिस्ट आहे.
कोरोना काळात प्रथमोपचार पेटीत (फर्स्ट एड बॉक्स) कोणत्या गोष्टी आवश्यक?
1. मास्क - केंद्र आणि राज्य सरकारकडून तोंडावर मास्क लावण्यासंदर्भात नियम जारी करण्यात आला आहे. तसेच तोंडावाटे विषाणू शरिरात प्रवेश करू नये यासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरावे, अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली आहे. रुमाल अथवा कापड हेही मास्क म्हणून वापरता येऊ शकते.
2. साधा थर्मामीटर - थर्मामीटर म्हणजे आपल्या शरीराचे रिअल टाईम तापमान मोजणारे यंत्र. थर्मामीटर बहुसंख्या लोकांकडे असतो. विशेषत: घरात लहान मुलं असतील तर हमखास थर्मामीटर खरेदी केला जातो.
कोरोनाच्या प्रमुख लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे ताप. थर्मामीटरमुळे तुम्हाला घरच्या घरी ताप मोजता येईल.
3.पल्स ऑक्सीमिटर - हे खिशात मावेल इतके छोटे यंत्र आहे. पल्स ऑक्सिमिटरमध्ये बोटाच्या सहाय्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कळते.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शरीरातील ऑक्सिजनची पातळी हा महत्त्वाचा घटक आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी कमी होते. त्यांनी हॉस्पिटल किंवा घरी ऑक्सिजन द्यावा लागो.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "शरीरात ऑक्सिजनची सामान्य पातळी ही 95-100 टक्के या दरम्यान असायला हवी. 92 ते 95 टक्क्यांदरम्यान असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 92 टक्क्यांपेक्षा ऑक्सिजन पातळी खाली आल्यास तातडीने हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज असते."
तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची सामान्य पातळी कमी झाली हे तुम्हाला घरच्या घरी कळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार सुरू करण्यात तुम्हाला मदत होऊ शकते.
अर्थात हे यंत्र सर्वांनी विकत घेण्याची गरज नाही असेही काही डॉक्टर्स सांगतात. त्यामुळे यासाठीही तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुमच्या घरात याची गरज लागेल अशा व्यक्ती असतील तरच त्याची खरेदी करावी. त्यासाठी डॉक्टर योग्य मार्गदर्शन करू शकतात.
4 . व्हिटॅमिन सी, ZINC (झिंक) आणि व्हिटॅमिन डीसाठी फळ भाज्या आणि गोळ्या - आपल्या शरीरात या जीवनसत्वांची पुरेशी मात्रा असणं किती आवश्यक आहे हे आपल्याला कोरोना काळात अधिक प्रकर्षाने दिसले. म्हणूनच आपल्या प्रथमोपचार पेटीत ही तिन्ही व्हिटॅमिन असणे आवश्यक आहे. अर्थात त्याची आपल्याला गरज आहे का हे डॉक्टरच सांगू शकतात. त्यांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नयेत
यामुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होते. तसेच शरीराला लोहाचा पुरवठा करणे आणि मजबूत हाडांसाठीसुद्धा ही जीवनसत्व महत्त्वाची असतात. तुमची प्रतिकारक्षमता जितकी जास्त तितके तुम्ही निरोगी राहता असं डॉक्टर सांगतात.
व्हिटॅमिन सी शरीरातील पाण्यात मिसळतो आणि म्हणून तो शरीरात फार काळ राहत नाही. म्हणून व्हिटॅमिन सीची शरीरातील पातळी कायम ठेवणे आवश्यक असते.
याविषयी बोलताना डॉ.अविनाश भोंडवे असं सांगतात, "व्हिटॅमिन सी, डी आणि झिंक याचे मिश्रण असलेली गोळी मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती घेता येईल. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णालाही ही गोळी देण्यात येत आहे. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते."
या व्हिटॅमिनचे शरीरातले प्रमाण वाढण्यासाठी फळे आणि भाज्या खाणे महत्त्वाचे आहे. यामध्ये आवळा, लिंबू, संत्रं, टोमॅटो, मोसंबी इत्यादी फळं-भाज्या.
याशिवाय, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या/सप्लिमेंट सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
5. सॅनिटायजर / हँड वॉश/ साबण - वेळोवेळी हात स्वच्छ धुतल्याने हातावर असलेले विषाणू नष्ट होतात. त्यासाठी घाईघाईने हात न धुता काही सेकंद वेळ देऊन हात धुतले पाहिजेत असा सल्ला डॉक्टर देतात.
बाहेर गेल्यावरही सार्वजनिक ठिकाणी आता सॅनिटायजर उपलब्ध आहेत. सॅनिटायजर उपलब्ध होऊ शकले नाही तर लिक्विड साबणही वापरु शकता.
6. व्हेपोरायझर किंवा गरम पाण्याची वाफ - कोरोना व्हायरस आणि गरम पाण्याची वाफ याचा थेट काही संबंध आहे का? याबाबत समज-गैरसमज आहेत.
घरामध्ये गरम पाण्याची वाफ घेण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे टोपात उकळते पाणी घेऊन चेहरा झाकून वाफ घेणे. पण ही पद्धत काहीशी धोकादायक देखील आहे. गरम पाण्याची वाफ घेण्याचे छोटे यंत्र सुद्ध उपलब्ध आहे. साधारण किचनमधील मिक्सरप्रमाणे दिसणारे आणि तेवढ्याच आकाराचे हे यंत्र आहे. यातून वाफ घेणे अधिक सोयीचे ठरू शकते.
खरं तर डॉक्टर सर्दी,खोकला असल्यास हमखास गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे नाक आणि गळ्यातील म्युकस पातळ होते आणि रुग्णाला आराम मिळतो. मग कोरोना व्हायरसची याचा काय संबंध आहे ? घशाला चिकटलेले विषाणू नष्ट होतात. मात्र गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचे विषाणू मरतात असे अद्याप कुणीही अधिकृतपणे सांगितलेले नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)