You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना ऑक्सिजन : भारताची कोरोना साथीतली स्थिती पूर्वीपेक्षा बिकट बनत चालली आहे का?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मुंबईजवळ भिवंडीमध्ये एका 50 बेडच्या रुग्णालयात अंकित सेथिया शुक्रवारी रात्री ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत अस्वस्थ होऊन फिरत होते.
अंकित सेथिया यांच्या SS हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये चारपैकी दोनच ऑक्सिजन सिलिंडर भरलेले होते.
या रुग्णालयात 50 पैकी 44 बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी अनेकांना ऑक्सिजनची गरज पडते.
रुग्ण वाढत चालल्याने लहान ऑक्सिजन टँक सहा तासांतच संपत आहे. इतर वेळी हा सिलिंडर किमान 9 तास तरी चालतो.
अंकित नेहमी ज्यांच्याकडून ऑक्सिजन खरेदी करतात, त्यांच्याकडेच सध्या पुरवठा झालेला नाही.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
त्यांनी रात्रभर मुंबई आणि परिसरातील सुमारे 10 पुरवठादार आणि चार रुग्णालयांमध्ये चौकशी केली. पण त्यांना कुणाकडूनच मदत मिळू शकली नाही.
अखेर, रात्री दोन वाजता एका रुग्णालयात 20 मोठे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याची माहिती त्यांना मिळाली. पण हे रुग्णालय 30 किलोमीटर लांब होतं.
ऑक्सिजन आणण्यासाठी कोणतंच वाहन उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी अँब्युलन्सला त्या कामासाठी पाठवलं.
पाच फेऱ्या मारून सगळे सिलिंडर त्या ठिकाणाहून आणण्यात आले.
आता ऑक्सिजन सिलिंडरचा शोध घेऊन ते तत्काळ उपलब्ध करून घेण्याच्या कामासाठी चार कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. डिलर किंवा उत्पादक यांच्याकडून शक्य त्या पद्धतीने ऑक्सिजन मिळवण्याचं काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं आहे.
अंकित यांनी रविवारी सांगितलं, "आता माझ्याकडे पुढील 12 तासांसाठीचं ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन मिळवण्यासाठी आम्ही रोज लढत आहोत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या 15 टक्के रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासासाठी ऑक्सिजनची गरज भासते.
काही रुग्ण श्वासाशी संबंधित कोणत्याही तक्रारीशिवाय येतात. पण त्यांच्यातील ऑक्सिजनची पातळी खालावलेली असते. याला सायलेंट हायपोक्सिया म्हटलं जातं. अनेक गंभीर रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडते.
देशात 500 कारखान्यांमध्ये ऑक्सिजन बनवण्याचं काम केलं जातं. यामध्ये 15 टक्के ऑक्सिजनचा वापर रुग्णालयात होतो. उर्वरित ऑक्सिजन स्टील आणि ऑटोमोबाईल कारखान्यांमध्ये ब्लास्ट फरनेस चालवण्यासाठी केला जातो.
कारखाने द्रवरुपात ऑक्सिजन तयार करून एका टँकमध्ये भरतात. हे टँक हॉस्पिटल्सना पाठवण्यात येतात. त्यानंतर ऑक्सिजन पुन्हा वायूरुपात बदलून रुग्णाला पुरवठा करण्यात येतो.
काही रुग्णालयांमध्ये स्टील आणि अल्यूमिनिअमचेही सिलेंडर वापरले जातात. यामध्ये वायूरुपातील ऑक्सिजन असतं. पण हे सिलिंडर प्रत्येक बेडसाठी बदलावं लागतं.
देशातील लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर लोक आता कामावर परतू लागले आहेत. दरम्यान, लहान शहरं आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
आतापर्यंत भारतात 50 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गेल्य़ा एका आठवड्यातच भारतात सहा लाख रुग्ण वाढले. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे 90 हजारपेक्षाही जास्त रुग्ण वाढत आहेत.
अशा स्थितीत ऑक्सिजनची मागणी वाढणार, हे स्वाभाविक आहे.
या महिन्यात रुग्णालयं आणि केअर सेंटर्समध्ये 2700 टन ऑक्सिजनचा वापर होत आहे. एप्रिल महिन्यात हेच प्रमाण 750 टन इतकं होतं.
ही माहिती ऑल इंडिया इंडस्ट्रीयल गॅसेस मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनकडून मिळाली आहे.
देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तेलंगण आणि आंध्र प्रदेशमधून सापडत आहेत.
जगणं-मरणं विरुद्ध पोटा-पाण्याचा प्रश्न
सध्या भारतात जगणं-मरणं विरुद्ध पोटा-पाण्याचा प्रश्न अशी स्थिती आहे.
मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष साकेत टिक्कू यांच्या मते, "सध्या 45 टक्के ऑक्सिजन उद्योगासाठी वापरली जात आहे तर 55 टक्के रुग्णालयांना. सरकारचाही एक प्रकारे नाईलाज झाला आहे.
आपण कारखान्यातील पुरवठा कमी केला तर उद्योगांचं नुकसान होईल. दुसरीकडे, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कमी पडल्यास लोकांचं आयुष्य धोक्यात येईल. दोन्ही गोष्टी संतुलित राखण्यासाठी भारताने आपली ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वाढवली पाहिजे."
भारतातील बहुतांश ऑक्सिजन कारखाने शहरांजवळ तसंच मोठ्या गावांत आहेत. यामुळे इतर ठिकाणी सिलिंडर पाठवण्यासाठी ट्रकची आवश्यकता आहे. भारतात असे 1500 ट्रक आहेत. अनेक राज्यांमध्ये एकही ऑक्सिजन मॅन्यूफॅक्चरर नाही. इथला सगळा पुरवठा आजूबाजूच्या परिसरातून येतो.
ऑक्सिजनच्या किंमतीवर नियंत्रण आणूनसुद्धा काहीच साध्य झालं नाही. यामध्ये काळाबाजार होत असल्याचं समोर येत आहे.
सरकारच्या हस्तक्षेपानंतरही उपाय नाही
साकेत टिक्कू सांगतात, "सरकारने ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमतीवर मर्यादा घातली आहे. पण लिक्विड ऑक्सिजनच्या नाही. म्हणजेच उत्पादनाची किंमतीवर बंधन घातलं पण कच्च्या मालाची किंमत अनियंत्रितच आहे.
आतापर्यंत भारतात कोरोनामुळे 82 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात चार कोरोना रुग्णांना मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाल्याचं सांगण्यात आलं. पण अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला.
ऑगस्ट 2017 मध्येही उत्तर प्रदेशात झालेल्या 70 मुलांच्या मृत्यूची घटना अद्याप ताजी आहे. त्यावेळी बिल न भरल्यामुळे पुरवठादाराने सिलेंडर पाठवले नव्हते.
मध्य प्रदेशात ऑक्सिजन कमी पडत आहे. छिंदवाडामध्ये एका आठवड्यापासून पुरवठा झाला नसल्याचं एका पुरवठादाराने सांगितलं.
पाच वर्षांपासून रिफिलिंग कंपनी चालवत असलेले पीयूष भट्ट सांगतात, "जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून ऑक्सिजन सिलेंडरची मागणी चार पट जास्त वाढली आहे."
इटलीसारखी परिस्थिती उद्भवण्याची भीती
पीयूष सांगतात, "राज्याच्या सीमेवर ट्रक थांबवण्यात आल्यामुळे आम्हाला पुरवठा होऊ शकला नाही. अशी परिस्थिती आमच्यावर कधीच आली नव्हती.
सोमवारीही पीयूष पुरवठ्याची प्रतीक्षा करत होते, "सरकारने यावर उपाय शोधला नाही तर भारतातसुद्धा इटलीसारखी परिस्थिती उद्भवू शकते.
छिंदवाड्यातील ग्लोरी हॉस्पिटलचे डॉ. दानिश खान यांच्या मते सध्याची परिस्थिती गंभीर आहे. ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर रुग्णांना दाखल करून घेणं आम्हाला बंद करावं लागले.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये 960 बेडचं एम्स हॉस्पिटल हळुहळू भरत चाललं आहे. कोरोनाचे 400 तर इंटेन्सिव्ह केअरचे 110 पैकी 100 बेड भरले होते. इथं पुरवठा प्राप्त न झाल्यामुळे दोन लिक्विड ऑक्सिजन टँक रिकामे होते.
"आम्ही तारवरची कसरत करून विविध ठिकाणाहून ऑक्सिजनची सोय करत आहोत," असं रुग्णालयाचे ज्येष्ठ अधिकारी एन. आर. बिश्नोई यांनी सांगितलं.
तर, भिवंडी अंकित सेथिया यांनासुद्धा ऑक्सिजनसाठी इतरांचे फोन येत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी एक मोठं सिलिंडर दुसऱ्या एका रुग्णालयाला दिलं होतं.
ते सांगतात, "अर्ध्या तासात सिलिंडर न मिळाल्यास पाच रुग्णांचा मृत्यू होईल, असं त्या रुग्णालयाच्या मालकांनी मला सांगितलं. त्यांना होणारा पुरवठा उशीराने होणार होता. इतकी इथली परिस्थिती वाईट बनली आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)