कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी व्हिटॅमिन-डीचा नेमका काय उपयोग होतो?

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं असताना यावर उपाय शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. आता कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी व्हिटॅमिन डीचा कितपत उपयोग होऊ शकतो, याच्या शक्यता तपासण्यात येत आहेत.

कोव्हिड-19 विरुद्ध लढण्यासाठी आपली प्रतिकारक्षमता वाढविण्याच्या दृष्टिनं व्हिटॅमिन डी उपयुक्त ठरू शकतं का, याची चाचणी घेण्यासाठी शास्त्रज्ञ स्वयंसेवकांच्या शोधात आहेत.

आधी या चाचणीत सहभागी होणाऱ्यांच्या रक्ताची चाचणी घेतली जाईल. त्यांच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्यांना सहा महिने दररोज व्हिटॅमिन डीची गोळी दिली जाईल.

लंडनमधील क्वीन मेरी विद्यापीठातील संशोधकांकडून ही चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीत नेहमीच्या सप्लिमेंटपेक्षा अधिक तीव्रतेचा व्हिटॅमिन डीचा डोस वापरला जाईल. प्रमुख संशोधक डेव्हिड जोलिफ यांनी म्हटलं आहे की, या चाचणीतून काही प्रश्नांची ठोस उत्तरं मिळू शकतील. व्हिटॅमिन डी कोव्हिडविरोधात लढण्यासाठी किती प्रभावी ठरू शकतं, हे स्पष्ट होईल.

व्हिटॅमिन डी सप्लिमेंटची किंमत कमी असते, त्या वापरण्यामध्ये धोका नसतो आणि त्या सहज उपलब्धही होतात. जर व्हिटॅमिन डी परिणामकारक असेल तर कोरोना व्हायरसविरुद्धच्या या लढाईत त्याचा वापर करून घेता येईल, असं डेव्हिड जोलिफ यांनी म्हटलं.

व्हिटॅमिन डी सप्लिमेंट सुरक्षित असल्या तरी रोज शरीराला जेवढा पुरवठा आवश्यक आहे, त्यापेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमिन डीचं सेवन हे हानीकारक ठरू शकतं.

ब्रिटिश सरकारमध्ये आरोग्य आणि आहाराशी निगडीत काम करणाऱ्या सायंटिफिक अॅडव्हायझरी कमिशन ऑन न्यूट्रिशन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड केअर एक्सलेंस या संस्थेनेही कोरोनासंदर्भात व्हिटॅमिन डीच्या भूमिकेबाबत एक अहवाल तयार केला आहे.

व्हिटॅमिन डीबद्दल कोणता सल्ला?

कोरोना व्हायरस साथीच्या काळात बहुतांश लोक घरांमध्ये बसून आहेत. यामुळे शरिरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होणं स्वाभाविक आहे. सामान्यपणे इतर वेळी लोक घराबाहेर जास्त वेळ घालवतात.

यादरम्यान त्वचेवर पडणाऱ्या उन्हामुळे व्हिटॅमिन डी आपल्याला नैसर्गिकपणे मिळतं. हे व्हिटॅमिन आपल्या शरीरासाठी उपयोगी मानलं जातं.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस संस्थेनुसार, सध्याच्या काळात लोकांनी प्रतिदिन 10 मायक्रॉन व्हिटॅमिन डी घेतलं पाहिजे. विशेषतः घरातच बहुतांश वेळ घालवणाऱ्या लोकांनी हे व्हिटॅमिन घेतलं पाहिजे.

ब्रिटनमध्ये ऑक्टोबर ते मार्च महिन्यापर्यंत व्हिटॅमिन-डी घेण्याचा सल्ला पूर्वीपासूनच दिला जातो. किंबहुना, पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHI) संस्थेने तर पूर्ण वर्षभर व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिलेला आहे.

PHI च्या मते घराबाहेर न पडणाऱ्या, केअर होममध्ये राहात असलेल्या लोकांनी वेगळं व्हिटॅमिन डी घेणं गरजेचं आहे.

व्हिटॅमिन-डी वेगळं घेण्याची गरज कुणाला?

- बहुतांश वेळ घराबाहेर पडणाऱ्या लोकांना- केअर होममध्ये राहणाऱ्या लोकांना- त्वचा नेहमी कोणत्याही कापडाने झाकलेली असते अशा लोकांनास्कॉटलँड आणि वेल्सच्या प्रशासनाशिवाय उत्तर आयर्लंडच्या सार्वजनिक आरोग्य संस्थांनी लॉकडाऊनमध्ये अशाच प्रकारचा सल्ला दिला आहे.

व्हिटॅमिन-डीची आवश्यकता कशासाठी?

सामान्यपणे मजबूत आणि निरोगी हाड, दात आणि स्नायूंसाठी व्हिटॅमिन-डी महत्त्वाचं मानलं जातं. याच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात. लहान मुलांना यामुळे मुडदूस हा आजार होतो. प्रौढ व्यक्तींना व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे अॅस्टीमलेशा हा आजार होतो.

संशोधकांच्या मते, व्हिटॅमिन-डीमुळे शरिरात रोगप्रतिकारक क्षमता प्रभावीपणे कार्यरत राहाते. विषाणूंच्या संसर्गाशी लढण्यात हे उपयोगी ठरतं.

शरीरात व्हिटॅमिन-डी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास सतत होणारी सर्दी आणि फ्लू यांच्यापासून बचाव होऊ शकतो.

पण सायंटिफिक अॅडव्हायझरी कमिटी ऑन न्यूट्रीशनने (NACN) फुफ्फुसातील संसर्ग रोखण्यासाठी व्हिटॅमिन-डीच्या उपयुक्ततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

यावरचा उपाय म्हणून व्हिटॅमिन-डी घेतलं पाहिजे याचे कोणतेही पुरावे नाहीत, असं NACN चं मत आहे.

व्हिटॅमिन डीमुळे कोरोना रोखला जाऊ शकतो?

व्हिटॅमिन डीमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखला जाऊ शकतो, याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असंच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्सने सुद्धा सांगितलं आहे.

पण सध्याच्या काळात व्हिटॅमिन डीचे अनेक फायदे आहेत, शरीरात हे व्हिटॅमिन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असायला हवं, याबाबत कोणत्याही तज्ज्ञांचं दुमत नाही.

बीएमजे न्यूट्रीशन, प्रिव्हेंशन अँड हेल्थ संस्थेच्या एका अहवालानुसार, व्हिटॅमिन कोव्हिड-19 वरचा उपचार म्हणून न देता एखाद्या विशिष्ट कारणासाठी दिलं जावं.

सध्याच्या काळात व्हिटॅमिन डीची कमतरता हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. निरोगी आयुष्यासाठी हे व्हिटॅमिन आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असलं पाहिजे.

दरम्यान, एखाद्या व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे आणि त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्यास त्याच्यावर उपचार करणं अवघड होत असल्याचंही काही संशोधकांचं मत आहे.

पण इतर रोगांनी ग्रस्त लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतरचा धोका जास्त असतो, हे सर्वमान्य आहे. त्यामुळे आताच कोणत्याही निष्कर्षापर्यंत जाणं घाईचं ठरेल.

लिव्हरपूल युनिव्हर्सिटीत मेडिसीनचे प्राध्यापक जॉन ऱ्होड्स सांगतात, व्हिटॅमिन डीमध्ये संसर्ग रोखण्याची क्षमता असते. काही संशोधकांच्या मते, व्हायरसमुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.

कोरोनामुळे फुफ्फुसांवर हल्ला चढवला जातो. अशा स्थितीत व्हिटॅमिन डीचा उपयोग कशा प्रकारे होतो, याबाबत आणखी संशोधनाची गरज आहे.

आपण व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात घ्यावं का?

या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे. व्हिटॅमिन डी सप्लिमेंट आपल्यासाठी उपयुक्त असलं तरी डॉक्टरांनी सल्ला दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व्हिटॅमिन डी घेत राहिल्यास भविष्यात अडचणी उद्भवू शकतात.

व्हिटॅमिन डी घेताना खालील बाबींचा विचार नक्की करावा.

- एक ते 10 वर्षांच्या मुलांना प्रतिदिन 50 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त देऊ नये.

- नवजात बालकांसाठी (एका वर्षांपर्यंत) ही मर्यादा प्रतिदिन 25 मायक्रोग्रॅम इतकीच आहे.

- प्रौढ व्यक्तींनी प्रतिदिन 100 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त घेऊ नये.

- यापेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेण्याचा सल्ला डॉक्टर फक्त विशिष्ट परिस्थितीतच देतात.

- किडनीची व्याधी असलेल्या लोकांसाठी व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेणं धोक्याचं आहे.

व्हिटॅमिन डी सप्लिमेंट कुठून खरेदी करू शकता?

व्हिटॅमिन डी ही दुर्मिळ गोष्ट नाही. कोणत्याही औषधांच्या दुकानात हे सहजपणे उपलब्ध असतं.

हे व्हिटॅमिन डीच्या गोळ्यांच्या स्वरूपात स्वतंत्रपणे किंवा मल्टिविटॅमिन गोळ्यांमधूनही मिळू शकतं.

तज्ज्ञांच्या मते, आवश्यकतेनुसारच याचं सेवन करावं. बहुतांश व्हिटामिन डी सप्लिमेंटमध्ये डी 3 असतं. व्हिटामिन डी 2 झाडांमध्ये बनवलं जातं, तर डी 3 आपल्या त्वचेमार्फत बनतं.

लहान मुलांसाठी हे ड्रॉप स्वरूपात उपलब्ध आहे.

आहार आणि व्हिटॅमिन डी

संतुलित आहार तुमची रोग प्रतिकारक शक्ती चांगली ठेवू शकतो. योग्य आहार घेणाऱ्या व्यक्तीला बाहेरून कोणतंही व्हिटॅमिन घेण्याची गरज नाही. पण फक्त पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी आहारातून मिळणं कठीण आहे.

व्हिटॅमिन डी मासे आणि अंड्यांमध्ये असतं. याशिवाय, तांदूळ, लोणी आणि दह्यातसुद्धा हे आढळून येतं.

आपण उन्हात सतत उभं राहावं का?

व्हिटॅमिन डीची कमतरता सतत उन्हात उभं राहून पूर्ण करता येईल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तेसुद्धा शक्य नाही.

कडक उन्हात जाताना त्वचा झाकणं किंवा सनस्क्रिन लावणं हे महत्त्वाचं आहे. यामुळे उन्हामुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.

नवजात बालकं, लहान मुले आणि गर्भवती महिलांनी काय करावं?

आईच्या दुधावर असलेल्या लहान मुलांना जन्मापासून एका वर्षापर्यंत रोज व्हिटॅमिनचं 8.5 ते 10 मायक्रोग्रॅम सप्लिमेंट दिलं पाहिजे, तसंच 4 वर्षांपर्यंतच्या मुलांनाही इतक्याच प्रमाणात व्हिटॅमिन डी देता येऊ शकतं.

मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना आईचं दूध बंद करून इतर आहार सुरू केला जातो. अशा मुलांना व्हिटॅमिन डी सप्लिमेंट देऊ नये. त्यांच्या आहारातून त्यांना हे व्हिटॅमिन गरजेनुसार मिळत असतं.

त्यांच्या शरिरात यांचं प्रमाण 500 मिलीपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत त्यांना बाहेरून व्हिटॅमिन डी देऊ नये. गर्भवती आणि स्तनदा मातासुद्धा प्रतिदिन 10 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डी बाहेरून घेऊ शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)