कोरोना लस: सीरमसोबत करार असलेली ऑक्सफर्डची लस अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर

सीरम इंस्टिट्यूटबरोबर करार असलेली ऑक्सफर्डची लस अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असून ख्रिसमसआधीच तिच्या चाचण्या पूर्ण होतील असं संशोधकांनी सांगितलं आहे.

ऑक्सफर्डच्या या कामगिरीचा फायदा भारतीय कंपनी सीरमला ही होईल.

भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या लशीचं उत्पादन करत आहे. 'कोव्हिशिल्ड' असं या लशीचं नाव आहे.

याआधी भारतात डिसेंबरपर्यंत ही लस तयार असेल, असं आदर पुनावाला यांनी म्हटलं होतं. 2021च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत या लशीचे 10 कोटी डोस बनून तयार होतील. अशी माहिती यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली होती. NDTVनं ही बातमी दिली होती.

"कोव्हिशिल्ड लशीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते," असं पुनावाला यांनी म्हटलं होतं.

"यूकेनं तेथील डेटा शेयर केल्यानंतर आणि ही लस सुरक्षित असल्याची खात्री असेल, तर आम्ही पुढच्या 2 ते 3 आठवडयात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करु शकतो. पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य आहे" असंही पुनावाला यांनी सांगितले.

लस पोहोचण्यासाठी वेळ लागेल

पण ही लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागेल असं पुनावाला यांनी म्हटलं होतं. कोरोनाच्या लशीचं सध्याचं उत्पादन पुरेसं नसून सगळ्यांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी पुढची 4 ते 5 वर्षं लागतील, असं सिरम इन्स्टिट्यूचे सीईओ अदर पूनावाला यांनी याआधी म्हटलं होतं.

2024 पर्यंत तरी कोरोना व्हायरसच्या लशीचा तुटवडा जाणवेल, असंही पूनावाला यांनी म्हटलं.

फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोना लशीच्या उत्पादनाबद्दल हे विधान केलं होतं.

त्यांनी म्हटलं, "औषध निर्माण कंपन्या जलदगतीनं उत्पादन क्षमता वाढवत नाहीयेत, त्यामुळे सगळ्यांपर्यंत लस पोहोचण्यासाठी 4 ते 5 वर्षं लागतील."

"गोवर लसीकरण मोहिमेप्रमाणे कोरोना लस दोन टप्प्यात द्यायची म्हटलं तरी जगाला सुरुवातीला जवळपास 15 अब्ज कोटी डोस लागतील," असंही त्यांनी म्हटलंय.

देशातील लस पुरवठ्याची जी साखळी आहे, तिची स्थिती पाहिल्यास देशातल्या 140 कोटी लोकांपर्यंत लस सुरक्षितपणे सगळ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल, याचाही विचार करावा लागणार असल्याचं पुनावाला यांनी म्हटलं.

सिरम इन्स्टिट्य़ूट जगातील 5 इतर कंपन्यांसोबत मिळून कोरोनाचे 1 अब्ज डोस तयार करणार आहे.

यापैकी अर्धे डोस भारतासाठी राखीव ठेवण्यात येईल, तर अर्धे डोस जगाला पुरवण्यात येतील, असं सिरम इन्स्टिट्य़ूटनं स्पष्ट केलं आहे.

पण, अमेरिका आणि युरोपातून मोठ्या प्रमाणावर लशीची मागणी करण्यात आली, तर इतर देश मागे पडतील, असंही पूनावाला म्हटल्याचं बातमीत नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची किंमत 225 रुपये असणार आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुण्यातल्या संस्थेने 10 कोटी कोरोनावरील लशीच्या डोसेसची निर्मिती करण्यासाठी गावी (Gavi), बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यासोबत करार केला आहे.

गेट्स फाऊंडेशनच्या स्ट्रॅटेजिक फंडमार्फत 15 कोटी अमेरिकन डॉलर्स या लशीच्या निर्मितीच्या कामात वापरले जाणार आहेत.

या लशीच्या प्रत्येक डोसची किंमत 3 अमेरिकन डॉलर म्हणजे 225 रुपये असणार आहे. 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करून देणार असल्याचंही सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)