You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस कधी येईल? त्याची किंमत किती असेल?
- Author, मानसी दाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण गेल्या वर्षी पहिल्यांदा डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरात आढळून आला.
यानंतर जगभरात इतर ठिकाणी याचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती.
आतापर्यंत नऊ महिन्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने दोन कोटी 66 लाखांचा टप्पा पार केला आहे.
या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आठ लाख 75 हजारांहून पुढे गेली आहे. पण अजूनही कोरोना व्हायरसशी निपटण्यासाठी प्रभावी ठरणारी लस सापडलेली नाही.
ऑगस्ट महिन्यात रशियाने कोव्हिड-19 वरची लस शोधल्याची घोषणा केली. त्यांनी 11 ऑगस्टला कोव्हिडवरच्या लशीची नोंदणी केली.
या लशीला 'स्पुटनिक व्ही' असं नाव त्यांनी दिलं आहे. पण ही लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातून गेली नसल्याची टीका करण्यात येत आहे. त्यामुळे ही लस कितपत प्रभावी ठरेल, याबाबत संशय आहे.
पण जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनावरची लस बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 34 कंपन्या कोरोनावर लस बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. यापैकी सात कंपन्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी सुरू आहे. तर तीन कंपन्यांची लस दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आणखी 142 कंपन्या लस बनवत आहेत. त्या आतापर्यंत प्री-क्लीनिकल टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांच्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या लशीचं उत्पादन अॅस्ट्राजेनिका कंपनीकडून केलं जात आहे. ही लस आतापर्यंतची सर्वात प्रभावी लस मानली जाते.
बीबीसीचे आरोग्य व विज्ञान प्रतिनिधी जेम्स गॅलाघर सांगतात, "कोरोना व्हायरसवरची लस 2021 च्य मध्यापर्यंत उपलब्ध होईल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. पण कोरोना व्हायरसच्या प्रजातीतील इतर चार विषाणूही जगात अस्तित्वात आहेत. त्यांच्यावरची लस अजूनही बनू शकलेली नाही."
कोरोनावरची लस तयार झाल्याच्या बातम्यांमध्ये शास्त्रज्ञांसह सामान्य नागरिकांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. आता काही महिन्यांत ही लस उपलब्ध होईल, असा अंदाज लावण्यात येत आहे. पण दुसरा मुद्दा म्हणजे या लशीची किंमत किती असेल?
या प्रश्नामुळे कित्येक लोकांना चिंताग्रस्त केलं आहे. शिवाय कोरोनाला दूर ठेवण्यासाठी या लशीचे किती डोस घ्यावे लागतील, हा प्रश्न शास्त्रज्ञांना भेडसावत आहे.
अॅस्ट्राजेनिकाची लस
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या लशीचं उत्पादन घेणाऱ्या अॅस्ट्राजेनिका कंपनीशी बीबीसीने बातचीत केली.
आम्ही कमी किंमतीत लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. या लसीतून कोणत्याही प्रकारचा नफा आम्ही मिळवणार नाही, असं ते म्हणाले.
गेल्या महिन्यात मेक्सिकोत कंपनीच्या प्रमुखांनी म्हटलं, "लॅटीन अमेरिकेत लशीच्या एका डोसची किंमत चार डॉलरपेक्षाही कमी असू शकते.
भारतात लशीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटने म्हटलं की भारत तसंच इतर विकसनशील देशांसाठी लशीची किंमत तीन डॉलर म्हणजेच 220 रुपयांच्या आसपास असू शकते.
त्याचप्रमाणे युरोपमध्ये याची किंमत अडीच युरोपर्यंत असू शकते, असं इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं होतं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियानेसुद्धा कोरोना लशीसाठी अॅस्ट्राजेनिकाशी करार केला आहे.
ऑस्ट्रेलियातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत देण्यात येईल, पण याची किंमत किती असेल, हे स्पष्ट नसल्याचं पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलं होतं.
सनोफी पाश्चर यांची लस
फ्रान्समध्ये या लशीची किंमत 10 युरो प्रति डोस (जवळपास 900 रुपये) इतकी असू शकते, असं सनोफी कंपनीचे प्रमुख ओलिव्हियर बोगिलोट शनिवारी म्हणाले होते.
जगभरातील औषध निर्माते आणि सरकारी संस्था कोरोना साथीशी लढण्यासाठी लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.
अॅस्ट्राजेनिका कंपनी सनोफी कंपनीची मोठी प्रतिस्पर्धी मानली जाते.
अॅस्ट्राजेनिकाच्या लशीची किंमत कमी असण्याबाबत बोलताना बोगिलोट म्हणतात, "तुम्ही कोणत्या संसाधनांचा वापर करता हे यासाठी महत्त्वाचं असतं. आम्ही स्वतःचं उत्पादन स्वतः घेतो, तर अॅस्ट्राजेनिका त्यांच्या उत्पादनाचं काम आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करतात."
सायनोफॉर्म या चीनी कंपनीची लस
सायनोफॉर्म ही चीनी कंपनीही लस बनवत असल्याची माहिती त्यांचे प्रमुख लिऊ जिंगजेन यांनी गेल्या महिन्यात दिली होती. या लशीच्या वैद्यकीय चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे.
बाजारात लस उपलब्ध होताना याच्या दोन डोसची किंमत एक हजार चीनी युआन (दहा हजार रुपये) पेक्षा कमी असू शकते, असं त्यांनी म्हटलं होतं.
पण आरोग्य कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लस मोफत द्यावी, असं तज्ज्ञांना वाटतं.
चीनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या लशीला राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत समाविष्ट करून घेण्यात आलं, तर ही लस सरकारी खर्चाने मिळू शकेल.
सध्या कंपनीचे प्रमुख लिऊ यांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्या मते या लशीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
मॉडर्नाची लस
केंब्रिजमधील मॉडर्ना कंपनीसुद्धा लसनिर्मितीच्या प्रयत्नात आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर काही लोकांना ही लस 33 ते 37 डॉलर किंमतीत देण्यात येऊ शकते, असं मॉडर्नाने म्हटलं होतं.
या लशीची किंमत शक्य तितकी कमी करता येईल, असं मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बान्सेल म्हणाले होते.
सध्याचा काळ कठीण असून सर्वांना ही लस मिळाली पाहिजे. लसीकरणात याची किंमत आड येऊ नये, असंही ते म्हणाले.
फायजरची लस
यावर्षी जुलै महिन्यात कोरोना लशीसाठी अमेरिकेच्या सरकारने फायजर आणि बायोएनटेक कंपन्यांसोबत 1.97 अब्ज डॉलरचा करार केला होता.
फायर्सफार्मामध्ये प्रकाशित एका बातमीनुसार, फायजर आणि बायएनटेक कंपनी MRNA आधारित कोरोना लशीची निर्मिती करत आहे. याची किंमत अमेरिका सरकारसाठी 19.50 डॉलर प्रति डोस असेल. यातून कंपनीला 60 ते 80 टक्के लाभ होऊ शकतो, अशी माहिती SVB लीरिंकच्या विश्लेषकांनी दिली होती.
कोणत्याही व्यक्तीला लशीचे दोन सुरुवातीचे डोस आणि एका बूस्टर डोसची आवश्यकता असेल. यासाठी सर्वसामान्य नागरिकाला 40 डॉलरपर्यंतचा खर्च येऊ शकतो. तर लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत याची किंमत 20 डॉलर प्रतिडोस इतकी असू शकते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)