कोरोनाची पुन्हा लागण झालेल्या जगातल्या पहिल्या माणसानं शास्त्रज्ञांना टाकलं कोड्यात

कोरोना विषाणूनं गेल्या सहा-सात महिन्यात अवघ्या जगात थैमान घातलंय. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन कोटी तीस लाखांपेक्षा अधिक झालीय.

यादरम्यान कोरोनाची लक्षणं, खबरदारी इत्यादी गोष्टींवर बरीच माहितीही समोर आलीय. मात्र, हाँगकाँगमधील नव्या रुग्णानं पुन्हा एकदा सगळ्यांना काळजीत टाकलंय.

हाँगकाँगमधील तिशीतल्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं तेथील शास्त्रज्ञांना आढळलं आहे. पहिल्यांदा लागण झाली, त्यातून बरा होऊन बाहेर पडल्याला साडेचार महने उलटले होते, तोच त्याला दुसऱ्यांदा लागण झालीय.

जनुकीय अनुक्रमणानुसार दोन्ही विषाणूंचे प्रकार स्पष्टपणे वेगळे दिसत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. या रुग्णामुळे जगात दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचं पहिलं प्रकरण समोर आल्याचंही ते म्हणतात.

जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र सावध प्रतिक्रिया दिलीय. WHO च्या म्हणण्यानुसार, एखाद्या रुग्णावरून थेट निष्कर्षापर्यत पोहोचायला नको.

काही तज्ज्ञांचंही म्हणणं आहे की, दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होणं हे दुर्मीळ असू शकतं आणि तितकसं गंभीर नसू शकतं.

ज्यांना आधी कोरोनाची लागण झालीय, त्यांच्यात विषाणूशी लढण्यासाठीची रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि दुसऱ्यांदा लागण होऊ न देण्यासाठी ही रोगप्रतिकारक शक्ती मदत करते. अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये सर्वात चांगली रोगप्रतिकार शक्ती दिसून आलीये. मात्र, ही रोगप्रतिकारक शक्ती नेमकी किती सुरक्षा देऊ शकते आणि किती काळ टिकून राहते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

गेल्या सहा महिन्यात ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांचा अभ्यास करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबतीत व्यक्त केलीय.

हाँगकाँग विद्यापीठाच्या अहवालानुसार, ज्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात येतोय, ती व्यक्ती पहिल्यांदा लागण झाली तेव्हा 14 दिवस हॉस्पिटलमध्येच होती. त्यानंतर त्या व्यक्तीला सोडण्यात आलं.

मात्र, त्यानंतर विमानतळावरील स्क्रीनिंगदरम्यान याच व्यक्तीची चाचणी करण्यात आली, तेव्हा पुन्हा पॉझिटिव्ह आली. यावेळी कुठलीच लक्षणं आढळली नाहीत.

दुसऱ्यांदा विषाणूची लागण होण्याचं हे अत्यंत दुर्लभ प्रकरण आहे, असं लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसनमधील प्राध्यापक ब्रेंडन व्रेन म्हणतात.

"कोरोनावरील लस तयार करताना हे प्रकरणं दुर्लक्षून चालणार नाही. शिवाय, वेळेनुसार विषाणू आपोआप बदल जाईल, हे अपेक्षितच आहे," असंही प्रा. व्रेन म्हणतात.

डॉ. जेफ्रीन बॅरेट हे वेलकम सँगर इन्स्टिट्युटमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. कोव्हिडसंदर्भातच ते सध्या काम करत आहेत. ते म्हणतात, "जगातील कोरोना रुग्णांची आजच्या घडीची संख्या पाहिल्यास एखादं असं प्रकरण फारसं आश्चर्यकारक नाहीय, जरी ते अत्यंत दुर्लभ असलं तरीही."

"दुसऱ्यांदा लागण झाल्यावर तितकसं गंभीर नसू शकतं, पण आपल्याला हेही माहित नाहीय की, दुसऱ्यांदा त्या व्यक्तीच्या शरीराला लागण झाली होती का नाही," असंही डॉ. बॅरेट म्हणतात.

हाँगकाँग किंवा इतर ठिकाणच्या अशा प्रकरणांचं परिणाम समजून घेण्यासाठी याबद्दलची अधिक माहितीची गरज आहे, असं प्रा. पॉल हंटर म्हणतात. प्रा. हंटर हे ईस्ट अँग्लिया विद्यापीठात कार्यरत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)