You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुर्कस्तानला कुठे सापडला सर्वात मोठा नैसर्गिक वायूसाठा?
तुर्कस्तानने काळ्या समुद्रात जगातला सर्वात मोठा वायूसाठा शोधला आहे, अशा माहिती तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेचैप तैय्यप अर्दोआन यांनी दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष रेचैप यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केली. 2023 पर्यंत याचा वापर सुरू करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचंही रेचैप यांनी म्हटलं.
वायूसाठ्याबाबत घोषणा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी इस्तांबूलमध्ये एक ऑनलाईन पत्रकार परिषद आयोजित केली होती.
अर्दोआन यांनी म्हटलं, "तुर्कस्तानच्या 'फतेह' या जहाजाला काळ्या समुद्रातील टूना-1 या विहिरीत 320 अब्ज क्यूबिक मीटर नैसर्गिक वायूसाठा आढळून आला. हा तुर्कीच्या इतिहासातील सर्वात मोठा वायूसाठा आहे."
याशिवाय पूर्व भूमध्य समुद्रातही तुर्कस्तान नैसर्गिक वायूचा शोध घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
भूमध्य तसंच काळ्या समुद्रात फतेह आणि यावूज जहाजांनी नऊ वेळा खोलवर खोदकाम केलं. आपल्या देशाला उर्जेच्या क्षेत्रात परिपूर्ण बनवण्याचा आमचा संकल्प आहे, असं अर्दोआन यांनी म्हटलं.
'इतर देशांवर अवलंबून राहणार नाही'
या शोधामुळे तुर्कस्तान नैसर्गिक वायूसाठी रशिया, इराण आणि अझरबैझान या देशांवर अवलंबून राहणार नाही.
नैसर्गिक वायूचा साठा समुद्राच्या पोटात 2100 मीटर खोल ठिकाणी सापडला आहे. आमचा शोध इथंच थांबलेला नसून आपण खोदकाम सुरूच ठेवणार आहोत. आणखी 1400 मीटर खाली गेल्यास त्याठिकाणीही वायूसाठा मिळू शकतो, असं तुर्कस्तानचे उर्जामंत्री फतेह दोनमेज यांनी सांगितलं.
फतेह जहाज कसं आहे?
AFP वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फतेह जहाजाचं नाव उस्मानिया साम्राज्याचे सुलतान राहिलेल्या फतेह सुलतान मेहमत यांच्यावरून ठेवण्यात आलं आहे. त्यांनी 1453 मध्ये कॉन्स्टँटीनोपलवर कब्जा केला होता.
पू्र्वेकडील राज्य जाँगुलदकमधील इरिगिल शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ टूना-1 विहिरीतील खोदकाम 20 जुलैला जोमाने सुरू करण्यात आलं होतं. इथं काहीतरी सापडेल असा अंदाज पूर्वीच व्यक्त करण्यात आला होता.
याच महिन्यात पूर्व भूमध्य समुद्रातील खोदकामाच्या मुद्द्यावर युरोपीय महासंघ आणि तुर्कस्तान आमनेसामने आले होते. युरोपीय महासंघाने तुर्कस्तानला समुद्रातील खोदकाम थांबवण्यास सांगितलं होतं. पण अर्दोआन याला जुमानले नाहीत. या वर्षाच्या अखेरपर्यंत भूमध्य समुद्रातील काम वाढवण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)