You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुर्कस्तान : सांता क्लॉजचं थडगं सापडल्याचा दावा
जगभरातील लहान मुलांचं भावविश्व मोहरून टाकणाऱ्या सांता क्लॉजचं थडगं चक्क तुर्कस्तानात सापडल्याचा दावा काही पुरातत्त्व तज्ज्ञांनी केला आहे. जो संपूर्ण जगाला अवाक करणारा आहे.
दक्षिण-पश्चिम तुर्कस्तानातील अंताल्या प्रदेशात डेमरे हा भाग आहे. डेमरेमध्ये असलेल्या सेंट निकोलस चर्चच्या तळघरात सुस्थितीत असलेलं एक थडगं सापडलं आहे. सेंट निकोलस यांचे हे थडगं आहे. हेच सेंट निकोलस सांता क्लॉज म्हणून ओळखले जातात.
मायरा या प्राचीन शहराच्या भूमीत डेमरे वसलेलं आहे. या मायरामध्ये चौथ्या शतकात सेंट निकोलस वास्तव्याला होते. सेंट निकोलस यांची काही हाडं इटलीतील बारी इथं आहेत असं इतके दिवस मानलं जात होतं.
1087 मध्ये मायरावर सेलीजक तुर्कांनी हल्ला केल्यावर ही हाडं इटलीतील व्यापाऱ्यांनी सोबत नेली होती. लहान मुलांबद्दल असलेली आत्मियता आणि प्रेमाच्या भावनेमुळे सेंट निकोलस तत्कालिन ख्रिश्चन समुदायात लोकप्रिय होते.
डेमरे इथं सेंट निकोलस यांच वास्तव्य होतं म्हणून अनेक भाविक या चर्चमध्ये प्रार्थनेला येत असतात. तसंच, इथे गेल्या 20 वर्षांपासून पुरातत्त्वीय संशोधन सुरू होतं.
'चर्चच्या तळघरात थडगं'
अंताल्यातील पुरातत्त्वीय वास्तूंच्या संरक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक जेमील कारबायरम म्हणाले की,
"विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही सेंट निकोलस चर्चचा अभ्यास केला आहे. त्यातच आम्हांला हे थडगं चर्चच्या खाली आढळलं."
चर्चच्या खालच्या भागातील वास्तू उत्तम स्थितीत असल्याचं त्यांनी तुर्कस्तानातील हुर्रियत वृत्तपत्राला सांगितलं.
"या वास्तूचं बऱ्यापैकी नुकसान झालं असल्यानं आत प्रवेश करणं सध्या अवघड आहे. इथं पडलेले दगड आणि अन्य अवशेष नीट अभ्यासल्यावर हटवण्यात येतील." असं त्यांनी सांगितलं आहे.
तसंच काही प्राचीन कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर इटलीतील बारी इथं नेण्यात आलेली हाडं ही दुसऱ्याच ख्रिस्ती धर्मगुरुची आहेत. हे देखील कारबायरम यांनी स्पष्ट केलं.
सीटी स्कॅन यंत्र, जिओ रडार आणि आठ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चर्च परिसरातलं अंतिम टप्प्यातील उत्खनन पूर्ण करण्यात आलं.
"सध्या जगाचे डोळे इथे लागून राहिले आहेत. सेटं निकोलस यांना मृत्यूनंतर इथेच ठेवण्यात आलं होतं. आम्ही आता संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आहोत."
"जर याचे सकारात्मक निकाल समोर आले तर अंताल्याच्या पर्यटनाला खूप वेगळं वळण लागले." असं कारबायरम हुर्रियत वृत्तपत्राला सांगतात.
सेंट निकोलस यांचा प्रेमळ स्वभाव हा गेल्या अनेक शतकांपासून कौतुकाचा विषय ठरला आहे. त्यामुळेच नाताळ सणाला लहान मुलांना भेटवस्तू देणारा 'बाबा' ही त्यांची ओळख जगाला सुपरिचित झाली.
काही डच नागरिक अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांचं नाव आपल्या भाषेत 'सिंटर क्लास' असं घेऊ लागले. त्याचा अपभ्रंश होत 'सांता क्लॉज' हे नाव जगात ओळखलं जाऊ लागलं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)