You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युरोपीय संस्कृतीची वाटचाल अंताच्या दिशेनं?
- Author, रेचल नूवे
- Role, बीबीसी फ्युचर
पाश्चिमात्य संस्कृतीचा महान किल्ला ढासळतोय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे युरोपवर सतत होणारे जहालवाद्यांचे हल्ले.
आखाती देश असो, अफ्रिका असो किंवा आशियातली मोठी राष्ट्र, वेगवेगळ्या स्तरावर अनेक देशांकडून युरोपीय देशांना सातत्यानं आव्हानं मिळत आहेत.
अमेरिकेपाठोपाठ अनेक युरोपीय देशांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यात जहालवाद्यांच्या हल्ल्यांनी युरोपासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. म्हणूनच प्रश्न पडतो...
पाश्चिमात्य संस्कृतीचा किल्ला ढासळतो आहे का?
एकेकाळी समृद्धीच्या उत्तुंग शिखरावर असलेल्या देशांचं एकाएकी पतन सुरू होतं. इतिहासात अशी अनेक उदाहरणं सापडतील.
रोमन साम्राज्य, इजिप्तची संस्कृती किंवा भारतातील सिंधू संस्कृती. सर्व मानवजातीच्या प्रगतीची उत्तम उदाहरणं आहेत. पण, या संस्कृतींचा ऱ्हास झाला.
महान मुघल साम्राज्याचा देखील अस्त झाला. जिथं कधी सूर्य मावळत नव्हता, अशा ब्रिटीश साम्राज्याचाही अंत झाला.
अमेरिकेचंही अगदी तसंच झालंय. त्यांच्या पाठीशी उभे राहणारे देश सुद्धा कुठल्या न कुठल्या आव्हनांना तोंड देतच आहेत.
पाश्चात्य संस्कृतीचा डोलारा कमकुवत झाला आहे. त्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली आहे असं चित्र सध्या दिसत आहे.
अमेरिकी अर्थतज्ज्ञ बेंजामिन फ्रिडमन यांनी आधुनिक पाश्चात्य समाजाची तुलना सायकलशी केली होती.
युरोपात आर्थिक संपन्नता कायम राहील असं ते म्हणाले होते. पण, नव्या संशोधनातून ही गोष्ट नाकारली जात आहे. युरोपीय राष्ट्रांची आर्थिक स्थिती तशी नाजूकच आहे.
पण, त्याचबरोबर लोकशाही, नागरिकांचं स्वातंत्र्य आणि सहिष्णुता या मूल्यांवरही हे देश समाधानकारक प्रगती करत नसल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.
सध्या अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये राष्ट्रवादी पक्षांची सत्ता आहे. या देशांचे प्रमुख जगासाठी त्यांच्या देशाचे दरवाजे बंद करत आहेत.
मुक्त आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आता देशांच्या समुहांपेक्षा दोन देशामधील परस्पर आर्थिक संबंधांना जास्त महत्त्व प्राप्त होत आहे.
कोणताही समाज कितीही प्रगत का असेना, पण एक वेळ अशी येते की त्या समाजाचा ऱ्हास सुरू होतो. त्या ऱ्हासापासून ते स्वतःला वाचवण्यास असमर्थ ठरतात.
भविष्यात या देशांचं काय होईल, हे सांगणं कठीण आहे. पण, आपल्या गाठीशी असलेला इतिहासाचा अनुभव आणि विज्ञानाधारित मॉडेल्सच्या साहाय्यानं आपण काही अंदाज घेऊ शकतो.
नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण
मेरीलॅंड विद्यापीठाचे प्राध्यापक सफा मोतेशारी आणि त्यांच्या टीमनं एखाद्या समाजाचा ऱ्हास कसा होतो या विषयावर 2014 मध्ये अभ्यास केला.
कोणत्याही समाजाचा ऱ्हास होण्याची दोन प्रमुख कारणं ते या अभ्यासातून सांगतात - "पहिलं म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीवरचा ताण. हवामान बदल त्यासाठी मुख्य कारण ठरत आहे."
"दुसरं कारण म्हणजे सदर मानवी संस्कृती चालवण्यासाठी अर्थव्यवस्थेवर पडणारा भार."
जेव्हा धनाढ्य लोक या मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवतील तेव्हा समाजातील दरी आणखी वाढेल.
"विलासी आयुष्य कायम तसंच ठेवण्यासाठी जेव्हा ते पैशांच्या जोरावर नैसर्गिक साधन संपत्तीवर आपला हक्क सांगतील तेव्हा सामान्य जनतेच्या वाट्याला ती कमी येईल आणि मग संघर्ष होईल," असं मोतेशारी म्हणतात.
वाढती आर्थिक दरी
साधनसंपत्तीसाठी सामान्य लोकांमध्ये होणाऱ्या संघर्षामुळे श्रीमंतांना कामगार मिळणार नाहीत.
त्यामुळे पैसे असूनही श्रीमंतांच्या अडचणी वाढतील. जगभरात गरीब-श्रीमंतांमध्ये वाढत असलेली दरी मोतेशारी यांचं म्हणणं खरं ठरवत आहे.
उदाहरणार्थ, जगात आजच्या घडीला 90 टक्के हरितगृह वायुंच्या निर्मितीला 10 टक्के श्रीमंत जबाबदार आहेत.
तसंच जगातली जवळजवळ 50 टक्के लोकसंख्या दररोज तीन डॉलरमध्ये गुजराण करते.
जेव्हा समाजात विषमता निर्माण होते, तेव्हा त्या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही.
सिरिया एक उदाहरण
गोष्ट जास्त जुनी नाही. काही वर्षांपूर्वी सीरिया हा एक सुखी देश होता. 2000 मध्ये तिथं भयंकर दुष्काळ पडला. पाणीटंचाईनं पीकं करपली. लोकं बेरोजगार झाले.
बेरोजगारीमुळं ते शहरांकडे स्थलांतरीत होऊ लागले. शहरांच्या व्यवस्थेवर त्यामुळं ताण पडू लागला.
शहरी लोकसंख्या कित्येक पटीनं वाढली. समाज अनेक भागात विभागला गेला आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांची परिस्थिती बिघडली.
त्यानंतर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं परिस्थिती आणखी चिघळली. आता सीरिया गृहयुद्धात जळताना दिसत आहे. खूप कमी काळात एक देश कसा उध्वस्त होतो, त्याचं हे भयावह उदाहरण आहे.
वैश्विक स्तरावर झपाट्यानं होणारे बदलसुद्धा एखाद्या संस्कृतीला विनाशाकडे ढकलतात, असं कॅनडाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्सचे प्राध्यापक थॉमस होमर-डिक्सन यांचं म्हणणं आहे.
"2008 ची आर्थिक मंदी, कथित इस्लामिक स्टेटसारख्या संघटनांची निर्मिती, ब्रेक्सिट किंवा अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांचं राष्ट्रपतीपदी येणं या घटनांमुळंही परिस्थिती बदलत आहे," असं होमर-डिक्सन म्हणतात.
रोमन साम्राज्याचा ऱ्हास
जर भविष्य बदलायचं असेल तर इतिहासाकडून शिकता येऊ शकतं. पाश्चिमात्य देश रोमन साम्राज्याकडून शिकू शकतात. येशू ख्रिस्तांच्या जन्माअगोदरच्या एक शतकापूर्वी रोमन साम्राज्य अतिशय शक्तिशाली होतं.
रोमची सत्ता पूर्ण भूमध्य समुद्राच्या क्षेत्रावर होती. या भागात येणं-जाणं करण्यासाठी समुद्राचाच मार्ग होता.
पण, साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच साम्राज्याचा खर्चही वाढत गेला. आपली शक्ती वाढावी म्हणून ते सतत पुढेच जात राहिले. अनेक शतकं अशीच गेली. साम्राज्यावरील खर्चाचा भार वाढत गेला.
जेव्हा तिसऱ्या शतकात गृह युद्धाला सुरुवात झाली तेव्हा आजूबाजूच्या राज्यांनी हल्ले सुरू केले. युद्धामुळं खर्चाचं प्रमाण आणखी वाढलं. राज्याचं संरक्षण आणि प्रशासनाचा खर्च खूप वाढला.
प्रशासकांनी चलनाचं अवमूल्यन केलं. त्यामुळं देखील रोमन साम्राज्य ऱ्हासापासून स्वतःला वाचवू शकलं नाही. ऱ्हास रोखण्यासाठी त्यांना वेळेवर योग्य पावलं उचलता आली नाहीत.
"जसं-जसं एखाद्या साम्राज्याचा विस्तार होत जातो, तसं-तसं तिथले प्रश्न अधिकाधिक किचकट होत जातात. जेव्हा एखादी व्यवस्था अवाढव्य होते, तेव्हा त्या व्यवस्थेला चालवणं हे महाग आणि कठीण होतं."
असं अमेरिकेतील यूटा स्टेट विद्यापीठाचे प्राध्यापक जोसेफ टेंटर सांगतात.
टेंटर रोमचंच उदाहरण देतात. ते म्हणतात, "तिसऱ्या शतकापर्यंत रोममध्ये अनेक राज्याची स्थापना झाली होती. प्रत्येक राज्याचं आपलं लष्कर होतं, नोकरशाही होती, न्यायव्यवस्था होती. या सर्वांसाठी लागणाऱ्या खर्चामुळं त्या-त्या राज्यावरील भार वाढत गेला.
"श्रीमंत देश जर गरीब देशांच्या साधन-संपत्तीवर डोळा ठेवतील किंवा काबीज करण्याचा प्रयत्न करतील, तर गरीब देशांतील लोक त्यांच्या आसपास असलेल्या देशात शरणार्थी म्हणून जातील. आणि हीच संघर्षाची सुरुवात आहे," असं होमर-डिक्सन म्हणतात.
तोडगा काय?
पाश्चिमात्य देश याला आळा घालण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. ज्या ठिकाणी लोक शरणार्थी म्हणून जात आहेत ते देश आपल्या सुरक्षेसाठी मोठी रक्कम खर्च करत आहेत. लोकशाहीवर चालणारे देशही हुकूमशाही मार्ग अवलंबत आहेत.
सध्या तर पाश्चिमात्य देश हे टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशांना तेल आणि नैसर्गिक वायुची आवश्यकता आहे. ही गरज भागावी म्हणून पाश्चिमात्य देश नवीन मार्ग शोधत आहेत.
खडकांमधून तेल काढण्याच्या पद्धतीला फ्रॅकिंग म्हणतात. त्या पद्धतीने तेल काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आर्क्टिक महासागरातून तेल काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे युरोपला सातत्यानं तेल पुरवठा कसा होईल यावर विचार केला जात आहे.
"असं म्हटलं जातं की 2050 पर्यंत अमेरिका आणि ब्रिटनमध्ये केवळ श्रीमंत आणि गरीब हे दोनच वर्ग उरतील. हे पाश्चिमात्य देशासमोरील मोठं आव्हान आहे" असं होमर-डिक्सन म्हणतात.
सध्या आखाती देश आणि आफ्रिकेत गृहयुद्ध आणि संघर्षाची परिस्थिती आहे. याचा थेट परिणाम युरोपवर पडत आहे. लंडन, पॅरीस सारख्या शहरांवर होणारे हल्ले यामुळेच वाढत आहेत.
"अमेरिका या देशांपासून समुद्रामुळं दूर आहे. त्यामुळं तिथं या गोष्टींचा परिणाम होण्यास थोडा वेळ लागेल," असं होमर-डिक्सन सांगतात.
वेगवेगळ्या धर्म, समुदायांचे लोक एकमेकांसमोर आले की संघर्ष होणारच. पाश्चात्य देशांमध्ये शरणार्थ्यांचा वाढता लोंढा अशाच संघर्षांकडे या देशांना ढकलतोय. यापुढे संस्कृती जरी नष्ट झाली नाही तरी तिचा चेहरा पार बदलेल.
काही जाणकारांच्या मते युरोपीय संस्कृती लयाला जाणार नाही तर तिच्यात काही बदल होतील. लोकशाही, उदारमतवादी आणि सर्वसमावेशकता हे तिचे गुणधर्म संपतील आणि त्याचवेळी चीन सारखं राष्ट्र परिस्थितीचा योग्य फायदा करून घेईल.
तसं होणं देखील एक प्रकारे संस्कृतीचा ऱ्हासचं समजला जाईल. कोणत्याही संस्कृतीची ओळख ही तेथील जीवनमूल्य आणि तत्वं असतात. जर ती मू्ल्यंच राहणार नाहीत तर ती संस्कृती टिकली असं कसं म्हणता येईल?
जेव्हाही संकट येतं तेव्हा आपण आपले दरवाजे बंद करतो.
"अशा वेळी त्या आव्हानांना समोर जाणं कठीण होतं. पण नेहमीच मानवानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मात केली आहे. त्यामुळं पाश्चिमात्य संस्कृतीदेखील स्वतःला वाचवण्याच्या उपायाचा नक्की शोध लावेल" असा विश्वास होमर-डिक्सन यांना वाटतो.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)