You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पहिल्याच भाषणात ट्रंप यांनी यूएनला सुनावलं
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप संयुक्त राष्ट्रांमध्ये काय भाषण करणार याकडे सर्वांचच लक्ष लागून राहीलं होतं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी संयुक्त राष्ट्रांना त्यांच्याच व्यासपीठावरून सुनावलं आहे.
ढिसाळ व्यवस्थापन आणि लाल फितीच्याकामकाजामुळे संयुक्त राष्ट्रांचा कारभार लौकिकाला साजेसा होत नसल्याची टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यासपीठावर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भाषण केलं. तांत्रिक प्रक्रियांपेक्षा लोकांवर भर द्यायला हवा असा ट्रम्प यांनी सांगितलं.
सर्व देशांनी एकत्र येत काम केलं तर संयुक्त राष्ट्रांची ताकद वाढू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ट्रंप हे कायमच त्यांच्या टीका करणाऱ्या भाषणासाठी ओळखले जातात. संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषण करतांना सुद्धा त्याची प्रचिती आली. पण, आधी प्रचाराची भाषणं असोत किंवा इतर व्यासपीठं, ट्रंप कायमच टीका करत राहीले किंवा वादग्रस्त वक्तव्य.
ट्रंप यांची काही गाजलेली आणि वादग्रस्त ठरलेली विधानं
आपल्या बहुतांश भाषणात ते किमान एकदा तरी कोणत्या ना कोणत्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत असतात.
फ्लोरिडामध्ये ते भाषण देत होते, त्यावेळी त्यांनी ब्रसेल्स, नाइस आणि पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यावरच ते थांबले नाहीत तर ते म्हणाले, 'जर्मनीमध्ये काय होत आहे बघा. काल रात्री स्वीडनमध्ये काय झालं बघा? दहशतवादी हल्ले होत आहेत.'
खरं तर स्वीडनमध्ये काहीच घडलं नव्हतं. पण स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या वाक्यानंतर अनेक जण संभ्रमात पडले. त्यांची ही चूक सावरताना त्यांच्या कार्यालयाला मोठी कसरत करावी लागली होती.
आयोजकांवरच आली माफी मागण्याची वेळ
डोनाल्ड ट्रंप यांनी बॉइज स्काऊटच्या वार्षिक संमेलनाला भाषण दिलं होतं. हे भाषण अनेक कारणांमुळं गाजलं. शालेय विद्यार्थ्यांसमोर त्यांनी असं भाषण दिलं जणू ते निवडणुकीच्या प्रचारासाठी आले आहेत.
बॉइज स्काऊट संमेलनाला राष्ट्राध्यक्षांना निमंत्रित करण्याची परंपरा आहे. आतापर्यंत कुणीही वार्षिक संमेलनाला राजकीय विषय काढला नव्हता. पण ट्रंप यांनी तो काढला. यामुळं आयोजकांवरच नामुष्की ओढवली होती.
ट्रंप यांच्या चुकीसाठी आयोजकांनी पालक आणि विद्यार्थ्यांची माफी मागितली.
मेक्सिकन स्थलांतरितांना म्हणाले गुन्हेगार
आपल्या सुरुवातीच्या भाषणांपासूनच त्यांनी मेक्सिकन स्थलांतरितांवर हल्लाबोल केला होता. मेक्सिकोतून केवळ गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येतात असं ते म्हणाले होते. त्यामुळे नसता वाद ओढवला.
'काही जण चांगले देखील असतील पण बहुतांश लोक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत', असं ते म्हणाले होते.
माजी सैनिक आणि सिनेटरवर अकारण टीका
आयोवा इथे दिलेल्या भाषणात त्यांनी सिनेटर जॉन मॅककेन यांच्याबद्दल वाईट वक्तव्य केलं. मॅककेन यांनी व्हिएतनाम युद्धात पराक्रम गाजवला होता.
त्यांना साडेपाच वर्षं युद्धकैदी बनवण्यात आलं होतं. असं असून देखील ट्रंप म्हणाले की, मॅककेन हे काही शूर नाहीत. जे लोक पकडले जातात ते काही शूर नसतात असं ते म्हणाले. त्यांच्या या वाक्याचा अनेकांनी निषेध केला होता.
मेक्सिको आणि अमेरिकेत भिंत बांधण्याचं आश्वासन
आपल्या निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी एक भलतंच आश्वासन दिलं होतं. मी राष्ट्राध्यक्ष झालो तर स्थलांतरितांना रोखण्यासाठी मेक्सिको आणि अमेरिकेच्या सीमेवर एक मोठी भिंत बांधेन आणि त्या भिंतीचा खर्च मेक्सिको सरकारकडून वसूल करुन घेईल असं ते म्हणाले होते.
चुकीच्या ठिकाणी म्हणीचा उल्लेख
आयर्लंडचे तत्कालीन पंतप्रधान एंडा केन्नी यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान आयर्लंडची एक म्हण मला फार आवडते असं ते म्हणाले. 'ज्या मित्रांनी तुमच्याकडं पाठ फिरवली त्यांना विसरा, पण जे तुमच्या पाठीशी उभे राहिली त्यांना कायम लक्षात ठेवा' अशा अर्थाची ती म्हण आहे.
या म्हणीचा उल्लेख ट्रंप यांनी केन्नी यांच्यासमोर केला. ही म्हण खरं तर नायजेरियाची आहे. पण ट्रंप यांनी ही म्हण आयर्लंडची आहे असं म्हटलं. त्यांच्या या चुकीच्या उल्लेखामुळं त्यांना सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)