कॅटलोनिया सार्वमत : कॅटलन लोकांचा स्पेनपासून 'वेगळे होण्याचा बाजुनं कौल'

रविवारी हिंसाचाराचं गालबोट लागलेल्या सार्वमतात ९० टक्के लोकांनी स्पेनपासून वेगळं होण्याच्या बाजूनं कौल दिल्याचं कॅटलोनिया प्रशासनानं जाहीर केलं.

कॅटलोनियाला स्वतंत्र राष्ट्र होण्याचा अधिकार मिळाला आहे, असा दावा कॅटलोनियाचे नेते कॅलस पुजडिमाँ यांनी केला आहे. "सार्वमताचा हा निकाल आता आम्ही संसदेकडे पाठवू," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"काही दिवसात हा निर्णय सरकारकडून संसदेला कळवण्यात येईल, त्यानंतर सार्वमताच्या कायद्यानुसार पुढील प्रक्रिया केली जाईल," असंही पुजडिमाँ यांनी सांगितले.

स्पेननं ठरवलं घटनाविरोधी

स्पेननं हे सार्वमत घटनाविरोधी असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. स्पेनचे पंतप्रधान मारियानो रहोय यांनी मात्र हे सार्वमत काही नाही, अशी भूमिका घेतली आहे. "कॅटलोनियातील बऱ्याच लोकांना स्पेनपासून वेगळं व्हायचं नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.

"कॅटलोनियामध्ये सार्वमत झालेलं नाही. स्पेनचे तुकडे करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याचा सामना करण्यास कायदा सक्षम आहे."

"आज सार्वमताच्या नावाखाली जे झालं ते लोकशाहीविरोधी होतं. या कृत्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत," असंही रहोय म्हणाले.

८०० जण जखमी

कॅटलोनियामध्ये रविवारी झालेल्या सार्वमताच्या विरोधात स्पेनच्या केंद्र सरकारनं कंबर कसली होती. त्यामुळेच मतदार आणि पोलीस यांच्यात ठिकठिकाणी चकमक झाली. त्यात ८०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

बऱ्याच ठिकाणी मतदान थांबवण्यात आलं होतं, तसंच मतदारांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले.

अर्थातच त्यामुळे कॅटलोनिया समर्थकांचा उत्साह कमी झाला नाही. त्यांनी बार्सिलोना येथे काढण्यात आलेल्या मोर्चात कॅटलोनियाचं राष्ट्रगीत गाण्यात आलं.

निदर्शकांनी केलेल्या दगडफेकीत १२ पोलीस जखमी झाले. बार्सिलोनाच्या महापौरांनी पोलीस कारवाईचा निषेध केला.

आतंरराष्ट्रीय निरीक्षक नाराज

स्पेनसाठी हे सार्वमत घटनाविरोधी आहे, तर कॅटलोनिया प्रशासनानुसार लोकांनी स्पेनपासून वेगळं होण्याच्या बाजूनं कौल दिला आहे.

पण या सार्वमताच्या पाहणीसाठी आलेल्या आतंरराष्ट्रीय निरीक्षकांनी स्पेनवर टीका केली आहे.

"स्पेन हे युरोपीयन युनियनमधलं एक महत्त्वाचं लोकशाही राष्ट्र आहे. पण त्यांनी सार्वमताच्या प्रक्रियेत जे काही घडलं, ते पाहून दु:ख झालं," असं ब्रिटिश निरीक्षक डग्लस चॅपमन यांनी म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)