You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आरोग्य : तरुणांमध्ये का वाढतोय लठ्ठपणा?
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, बीबीसी न्यूज ऑनलाईन
गेल्या चार दशकांमध्ये लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण तब्बल दहापटीने वाढलं आहे. याचाच अर्थ जगभरात 12.40 कोटी मुलं-मुली ही खूप जाड आहेत, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.
पूर्व आशियामध्ये लठ्ठ मुलं आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये चीन आणि भारतातील आकड्यांमध्ये फुगवटा बघायला मिळाला आहे.
जगातील 200 देशांमध्ये लठ्ठपणाविषयीचं निरक्षणाची नोंद 'द लॅन्सेट' करते. हे या क्षेत्रातलं सर्वांत मोठं विश्लेषण असतं.
यूकेमध्ये पाच ते 19 वयोगटातील प्रत्येक दहा जणांपैकी एकजण लठ्ठ असतो.
लठ्ठ मुलं पुढे चालून प्रौढावस्थेतही लठ्ठच राहण्याची शक्यता असते. अशांना आरोग्याच्या गंभीर समस्याही भेडसावू शकतात, असं तज्ज्ञ म्हणतात.
2025 नंतर प्रत्येक वर्षी लठ्ठपणामुळे आलेल्या आजारावर उपचारानिमित्त करण्यात येणारा जागतिक खर्च हा 920 अब्ज पौंडवर पोहचलेला असेल, असा इशारा 'वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन'ने दिला आहे. जागतिक स्थूलता दिवशी प्रकाशीत झालेल्या 'द लॅन्सेट'च्या विश्लेषणात म्हटले आहे.
जंकफूड हेच निमित्त
युनायटेड किंगडमसह युरोपातील काही उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मुलांमधलं लठ्ठपणाचं प्रमाण सध्या स्थिर आहे.
असं असलं तरी जगातील इतर भागांमध्ये हे प्रमाण झपाट्यानं आणि भयावह पद्धतीनं वाढत असल्याचं माजिद इझाती यांनी सांगितलं. इझाती हे लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये प्रमुख संशोधक प्राध्यापक आहेत.
संशोधकांच्या मते सहज उपलब्ध होणारे आणि मोठ्या प्रमाणावर प्रचार केले जाणारे स्वस्त मैदायुक्त खाद्यपदार्थ यामागचं एक प्रमुख कारण आहे.
पॉलिनेशिया आणि मायक्रोनेशियामध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. या देशांतील जवळजवळ निम्मी तरुण लोकसंख्या लठ्ठ आहे.
सध्याचा लठ्ठपणाचा जागतिक ट्रेंड असाच राहिला तर लवकरच सर्वसाधारण कमी वजनाच्या लोकांपेक्षा लठ्ठ लोकं जास्त दिसायला लागतील.
जागतिक पातळीवर 2000 सालानंतर सर्वसाधारण कमी वजनाच्या मुलामुलींचं प्रमाण घसरत चाललं आहे.
2016 मध्ये 19 कोटी 20 लाख तरुण सर्वसाधारण कमी वजनाचे होते. लठ्ठ तरुणांपेक्षा ही संख्या सध्यातरी जास्त वाटत असली तरी त्यात लवकरच बदल होईल असं दिसतं.
गेल्या काही दशकांमध्ये पूर्व आशिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये लठ्ठ लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
जागतिक स्तरावर 2016 मध्ये अतिरिक्त वजन असणाऱ्या तरुणांची संख्या 2.13 कोटी होती. तरी हे प्रमाण लठ्ठपणाच्या सीमारेषेखालीच आहे.
"ही एक मोठी समस्या आहे ज्यात आणखी वाढ होत जाईल," असं लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे सहसंशोधक डॉ. हॅरी रट्टर म्हणाले.
"प्रत्येक हाडकुळी व्यक्ती दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता अधिक वजनाची आहे."
"आपण अधिक अशक्त, आळशी किंवा लोभी झालो नसून वास्तविकतेत आपल्या आजूबाजूचे जग बदलत आहे," असं ते म्हणतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या डॉ फियोना बुल यांची अपेक्षा आहे की कॅलरीयुक्त आणि कमी पोषणमूल्य असलेल्या अन्नपदार्थांचा वापर कमी करायला हवा. तसंच अधिक शारीरिक हालचालींना उत्तेजन देण्यासाठी कठोर पावले उचलली जायला हवीत.
आतापर्यंत जगभरातील फक्त 20 देशांनीच शर्करायुक्त पेयांवर कर लावला आहे.
इंग्लंडमधील सार्वजनिक आरोग्य खात्याचे मुख्य पोषणतज्ञ डॉ. अॅलिसन टेडस्टोन यांनी सांगितले, "आमचा शुगर रिडक्शन प्रोग्राम आणि सरकारने लावलेला कर हे जागतिक स्तरावर अग्रगण्य आहे. असं असलं तरी सध्याच्या पिढीसोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सुरू झालेला हा एक लांबचा प्रवास आहे."
"आता हे अगदी स्पष्ट आहे की लोकांनी काय करायला हवं, फक्त हेच सांगून चालणार नाही. किंबहुना आता योग्य शिक्षण आणि माहिती यांचं महत्त्व जास्त आहे. कॅलरीयुक्त पदार्थांचा कमी वापर आणि आरोग्यपूरक आहार घेण्यास मदत करण्यासाठी सखोल कृतीची गरज आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)