You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनसुख हिरेन प्रकरण: पोस्टमॉर्टेम, व्हिसेरा म्हणजे काय? हे कसं केलं जातं?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मृत्यूचं कारण शोधण्यासाठी मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. ज्यात ठोस कारण स्पष्ट झालं नाही. त्यामुळे त्यांचा व्हिसेरा केमिकल अॅनालेसिसला पाठवण्यात आलाय.
आपण सर्वांनी पोस्टमॉर्टेम, व्हिसेरा हे शब्द पेपरमध्ये वाचले असतील. अनेकवेळा टीव्हीवर ऐकले असतील. पण, पोस्टमॉर्टेम म्हणजे नक्की काय? व्हिसेरा तपासणी का केली जाते? हे सोप्या शब्दात समजावून घेऊया.
पोस्टमॉर्टेम म्हणजे काय?
हा लॅटीन शब्द आहे. पोस्टमॉर्टेम म्हणजे मृत्यूनंतर.
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. शैलेश मोहिते म्हणतात, "मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करणं' म्हणजे पोस्टमॉर्टेम, याला मराठीत शवचिकित्सा असं म्हटलं जातं."
का करतात मृतदेहाचं पोस्टमार्टम?
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिक आहे का यामागे अनैसर्गिक कारणं आहेत हे शोधण्यासाठी मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केलं जातं.
तज्ज्ञ सांगतात, "नातेवाईकांकडून मिळालेली माहिती. पोलिसांनी केलेला पंचनामा, रुग्णालयातील केस पेपरच्या मदतीने अंदाज मिळतो की तपास कोणत्या दिशेने करायचा आहे."
पोस्टमॉर्टेम कधी करतात?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, "प्रत्येक मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्याची गरज नसते, मेडिकल प्रकरणात ऑटॉप्सी आणि मेडिको-लीगल (न्यायवैद्यक) प्रकरणात 'पोस्टमॉर्टेम' केलं जातं."
उदाहरण देताना डॉ. मोहिते पुढे सांगतात, "एखादा व्यक्ती छातीत दुखण्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आला. तपासणी दरम्यान अचानक मृत्यू झाला. मृत्यूचं कारण स्पष्ट नसतं. पण, मृत्यू संशयास्पद नसतो. त्यावेळी मेडिकल ऑटॉप्सी केली जाते."
हत्या, आत्महत्या, गळफास, गोळीबार, विष प्रयोगाची शक्यता किंवा संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोस्टमॉर्टेम केलं जातं.
तज्ज्ञ म्हणतात, संशयास्पद मृत्यूप्रकरणी मृत्यूचा अंदाजे वेळ, हत्येची पद्धत तपासासाठी महत्त्वाची असते. मृत्यू किती वेळापूर्वी झाला, कशामुळे झाला याची पोस्टमॉर्टेमनंतर माहिती मिळते.
'पोस्टमॉर्टेम' कोण करतं?
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात किंवा टर्शरी रुग्णालयांमध्ये मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम फॉरेन्सिक तज्ज्ञ करतात.
भारतात फॉरेन्सिक तज्ज्ञांची संख्या तुलनेने फार कमी आहे.
"भारतात कायद्यानुसार MBBS डॉक्टरलाच मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्याची परवानगी असते." असं डॉ. शैलेश पुढे सांगतात.
कसं केलं जातं पोस्टमॉर्टेम?
फॉरेंन्सिक तज्ज्ञ माहिती देतात, पोस्टमॉर्टेम चे दोन प्रकार आहेत.
- एक्स्टर्नल (External) : शरीराच्या बाह्य भागाची तपासणी
- इंटर्नल (Internal) : शरीरातील अवयवांची तपासणी
नायर रुग्णालयाचे फॉरेंन्सिक तज्ज्ञ डॉ. मोहिते सांगतात, "पोस्टमॉर्टेम करण्याआधी डॉक्टर त्यांचं उद्दिष्ट (Aim) आणि उद्देश (Objective) ठरवतात. ऑटॉप्सी का करतोय? यातून कोणती माहिती गोळा करायची आहे? या प्रकरणात डॉक्टर म्हणून अधिक माहिती देऊ शकतो का?" याची दिशा ठरवून तपास सुरू केला जातो."
शरीराच्या बाह्य भागाची तपासणी
यात मृत व्यक्तीचा मृतदेह केसांपासून ते पायापर्यंत तपासला जातो.
शरीरावर जखमा आहेत का? शस्त्रक्रियेचा व्रण आहे? टॅटू, व्यक्तीची उंची-बांधा, त्वचेचा रंग, ओळख पटण्यासाठी मिळणारी खूण अशा प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास केला जातो.
शरीरातील अवयवांची तपासणी
याला वैद्यकीय भाषेत इंटर्नल एक्झॅमिनेशन म्हणतात. यात शरीरातील अंतर्गत अवयवांची तपासणी केली जाते.
फॉरेंन्सिक तज्ज्ञांच्या मते, En-Block (इन-ब्लॉक) अंतर्गत तपासणीचा एक प्रकार आहे. यात शरीरातील सर्व अवयव एकाच वेळेस बाहेर काढून त्यांची तपासणी केली जाते.
"अवयवांना मार लागलाय का? कोणत्या कारणांनी जखम झाली का? रोगनिदान?" हे पोस्टमार्टममुळे कळू शकतं.
"एखाद्या व्यक्तीने मद्यसेवन केलं असेल. विषप्रयोग किंवा गोळ्यांचं अति-प्रमाणात सेवन झालं असेल. तर, शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा वास येतो," अशी माहिती फॉरेंन्सिक तज्ज्ञ देतात.
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो?
हत्या, खून, बलात्कार करून हत्या, आत्महत्या किंवा विषप्रयोग यांसारख्या अनैसर्गिक मृत्यूप्रकरणी पोस्टमॉर्टेम अहवाल अत्यंत महत्त्वाचा असतो.
कोर्टामध्ये खटला सुरू असताना पोलीस पोस्टमॉर्टेम अहवाल कोर्टात सादर करतात.
फॉरेंन्सिकतज्ज्ञ डॉ. मोहिते पुढे सांगतात, "कोर्टात पोस्टमॉर्टेम अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. कोर्टात पोस्टमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरांची खटल्यादरम्यान साक्ष आणि उलटतपासणी केली जाते."
व्हिसेरा म्हणजे काय?
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही संशयास्पद मृत्यू प्रकरणात शरीराची बाह्य आणि अंतर्गत तपासणी केल्यानंतरही मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला. हे डॉक्टरांना ठोसपणे सांगता येत नाही.
यावेळी मृतदेहाचा व्हिसेरा काढून पुढील तपासणीसाठी जपून ठेवला जातो.
डॉ. शैलेश मोहिते म्हणतात, "शरीरातील काही अवयव, रक्त पुढील तपासणीसाठी काढून ठेवलं जातं. याला व्हिसेरा असं म्हणतात."
"मृत व्यक्तीवर विषप्रयोग करण्यात आलाय का नाही. मृत्यूचं ठोस कारण काय याच्या निदानासाठी अंतर्गत अवयव काढून तपास केला जातो," असं डॉ. मोहिते सांगतात.
व्हिसेरा साठी कोणते अवयव जपून ठेवले जातात?
फॉरेन्सिक तज्ज्ञ सांगतात, पोट, आतडं किंवा यकृत, किडनी आणि स्प्लिनचा काही भाग, 20 CC रक्त व्हिसेरा म्हणून जपून ठेवलं जातं.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू इंजेक्शनमुळे झाला असेल तर, इंजेक्शन दिलेल्या जागेच्या चामडीचा काही भाग, मांस तपासणीसाठी जपून ठेवलं जातं. मृताच्या शरीराचा व्हिसेरा केमिकल अॅनालेसिससाठी फॉरेंन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो.
"मृत्यू विष प्रयोगामुळे झालाय का? याच्या माहितीसाठी व्हिसेरा तपासणी महत्त्वाची आहे," असं डॉ. मोहिते सांगतात.
जळलेल्या, कुजलेल्या शरीराचं मृत्यूचं कारण शोधता येतं?
तज्ज्ञ सांगतात, मृतदेह पूर्ण जळलेला असेल तर पोस्टमॉर्टेम करता येत नाही. अशा वेळी मृतदेहाचा डीएनए (DNA) ओळख पटवण्यासाठी घेतला जातो.
मृतदेहाची हाडं केमिकल अॅनालेसिससाठी पाठवण्यात येतात.
मृत्यू जाळल्यामुळे झाला? का हत्या करून मृतदेह जाळण्यात आला? मृतदेह किती टक्के जळला आहे? यावरून फॉरेंन्सिक तज्ज्ञांना महत्त्वाची माहिती मिळते.
फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. शैलेश मोहिते सांगतात, "मृतदेह कुजलेल्या परिस्थितीत आढळून आला असेल. तर, मृतदेह कुजण्याच्या टप्प्यांवरून मृत्यू किती वेळापूर्वी झाला असेल. शेवटचं या व्यक्तीने काय खाल्लं होतं. याची माहिती मिळू शकते."
तज्ज्ञ म्हणतात, "कुजलेल्या मृतदेहात अंतर्गत अवयव काहीवेळा एकत्र झाले असतात. अशावेळी ओटीपोटातील अवयव तपासणीसाठी ठेवले जातात."
शरीरात काही अडकलं आहे का? गोळी अडकली आहे का? हे शोधण्यासाठी पोस्टमॉर्टेममध्ये काहीवेळा शरीराचा एक्स-रे काढला जातो.
हिस्टोपॅथोलॉजी तपासणी?
तज्ज्ञ सांगतात, "हिस्टोपॅथोलॉजी तपासणीत आजाराचं ठोस निदान करण्यासाठी अवयवांचे टिश्यू (ऊतक) काढले जातात. त्यांची मायक्रोस्कोपच्या मदतीने सूक्ष्म तपासणी केली जाते."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)