You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनसुख हिरेन कोण होते, कसा झाला त्यांचा मृत्यू?
"माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईचे पोलीस कमिशनर संजय पांडे यांनी घडवून आणला", असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. माझा मनसुख हिरेन करण्याचा डाव आहे, असंही ते म्हणाले.
आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पण, मनसुख हिरेन कोण होते? जाणून घेऊया..
मनसुख हिरेन यांचा मृतहेद मुंब्रा खाडीतून पोलिसांनी 5 मार्च 2021 रोजी मिळाला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी संध्याकाळी 8 वाजल्याच्या आसपास मनसुख हिरेन दुकानातून घरी जाण्यासाठी बाहेर पडले. पण ते घरी परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलिसांमध्ये मनसुख हिरेन यांच्या गायब होण्याबाबत तक्रार केली.
पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर मुंब्रा खाडीत एक मृतदेह मिळाल्याचं समोर आलं. मृतदेहाचा फोटो मनसुख हिरेन यांच्याशी मिळताजूळता असल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली.
मनसुख हिरेन कोण होते?
26 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर हिरव्या रंगाची स्कॉर्पियो संशयास्पद अवस्थेत आढळून आली. गाडीत 20 जिलेटीन कांड्या आढळून आल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, स्कॉर्पियोची नंबर प्लेट अंबानींच्या सुरक्षा घेऱ्यातील गाडीसारखी होती.
ही स्कॉर्पियो ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मनसुख हिरेन यांची कसून चौकशी केली.
पण, या गाडीचा खरा मालक कोण? यावर प्रश्नचिन्ह होते.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख गाडीचे मालक असल्याचा दावा केला. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गाडी सॅम पीटर न्यूटनची असल्याचं सांगितलं. न्यूटन यांनी गाडी इंटिरिअर करण्यासाठी मनसुख हिरेन यांना दिली होती. पैसे देऊ न शकल्याने हिरेन यांनी गाडी आपल्याकडे ठेवली असा दावा गृहमंत्र्यांनी केला.
आत्महत्या का हत्या?
मनसुख यांचा मृतदेह खाडीत आढळून आला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पण, मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी 'मनसुख आत्महत्या करू शकत नाहीत,' असं वक्तव्य केलं.
विमला यांच्या तक्रारीवरून एटीएसने हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
मनसुख यांच्या चेहऱ्यावरील रुमालांचं रहस्य काय?
5 मार्च 2021 ला सकाळी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात खाडीत आढळून आला. पोलिसांनी स्थानिक लोक आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये मनसुख यांच्या चेहऱ्यावर काही रूमाल बांधले असल्याचं दिसून येतं. पोलिसांनी हे रुमाल जप्त केले.
मनसुख यांच्या चेहऱ्यावर रुमाल का बांधण्यात आले होते. चेहऱ्यावरील रुमालांचं रहस्य काय? याबद्दल पोलीस काहीच बोलण्यास तयार नव्हते.
हिरेन यांच्यावर कोणाचा दवाब होता?
2 मार्च 2021 ला मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिलं होतं.
या पत्रात त्यांनी 'माझा मानसिक छळ होतोय' असा आरोप केला होता.
मुंबई पोलिसांनी हिरेन यांनी पत्र लिहिल्याचं मान्य केलं होतं. या पत्रात क्राइम इंटेलिजन्स युनिटचे सचिन वाझे, पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांकडून छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)