You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पेनी स्टॉक्स : चिल्लरच्या दरात मिळणारे हे शेअर्स काय असतात? त्यात गुंतवणूक करून फायदा मिळतो?
भारतीय बाजारपेठेत काही शेअर्सची किंमत लाखांपर्यंत असते, पण जोखीम घेणारे गुंतवणूकदार काही वेळा महागड्या शेअर्सऐवजी स्वस्त शेअर्सचा पर्याय निवडतात. म्हणजे अक्षरशः चिल्लरच्या दरात मिळणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात.
शेअर बाजारात अशा स्वस्त आणि कमी किमतीच्या शेअर्सना 'पेनी स्टॉक' म्हणतात.
आजकाल व्हॉट्स अॅप आणि टेलिग्राम ग्रुप्स लोकांना शेअर मार्केटमध्ये तत्काळ पैसे कमवून देण्याच्या आमिषाने पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे गुंतवणूकदारांना कमी काळात मोठा तोटा होऊ शकतो.
पेनी शेअर्स म्हणजे काय, त्यांची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि त्यामध्ये गुंतवणूक करताना कोणते धोके असतात, हे आपण जाणून घेऊयात.
पेनी स्टॉक म्हणजे काय?
पेनी स्टॉक किंवा शेअर्सची ठराविक व्याख्या नाही, परंतु भारतात 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचे शेअर्स या श्रेणीत ठेवले जातात.
भारतात पेनी शेअर्स असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य किंवा भांडवल साधारणपणे 500 कोटी रुपयांपेक्षा कमी असतं. कधी कधी ते 100 कोटींपेक्षाही कमी असते. अशा कंपन्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवतही असू शकतात.
म्हणून हे शेअर स्वस्त मिळतात, पण त्यात नुकसान होण्याचा धोका खूप जास्त असतो.
शेअर बाजारातील तज्ज्ञ पेनी स्टॉकला जास्त नफा, जास्त धोका असलेले शेअर्स मानतात. भाव वाढला तर अल्पावधीत मोठा फायदा होऊ शकतो, पण घसरला तर मोठा तोटाही होऊ शकतो.
'पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं आहे का?'
हे शेअर खूपच चढ-उताराचे म्हणजेच अस्थिर असतात. त्यामुळे अचानक मोठा नफा होऊ शकतो, तितकाच मोठा तोटाही होऊ शकतो.
अहमदाबाद इथल्या एका स्टॉक ब्रोकिंग कंपनीचे प्रमुख गुंजन चोक्सी सांगतात की, पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करताना मोठा धोका म्हणजे त्यांची रोखता कमी असते. म्हणजेच खरेदी करणारे लोक कमी असतात. त्यामुळे शेअर विकायचा ठरवला, तरी लगेच खरेदीदार मिळेलच असे नाही आणि शेअर लगेच विकणं अवघड होतं.
"याशिवाय या कंपन्या खूप लहान असल्यामुळे त्यांच्याबद्दल बाजारात योग्य किंवा अचूक माहिती कमी असते किंवा अनेकदा चुकीची माहिती आणि अफवा जास्त पसरलेल्या असतात."
पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर मोठी घसरण झाली, तर ते शेअर्स पुन्हा कधी सावरतील याची कोणतीही खात्री नसते. अनेक पेनी शेअर्स कधीच जुन्या किमतीपर्यंत परत जात नाहीत. तसेच भाव सतत घसरत असताना लोअर सर्किट लागल्यास शेअर विकणेही अवघड होते, कारण खरेदीदारच मिळत नाहीत.
बाजारातील अस्थिरतेच्या काळात पेनी शेअर्सचे भाव एका आठवड्यात किंवा महिन्यातच 50 ते 80 टक्के, कधी त्याहूनही जास्त घसरू शकतात. त्याचप्रमाणे काही वेळा हेच पेनी शेअर्स एका महिन्यात दुप्पट किंवा त्याहून जास्त वाढल्याचेही पाहायला मिळते.
पेनी स्टॉकचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गुंतवणूकदारांची संख्या कमी असते. बिड-आस्क स्प्रेड (खरेदीदाराने दिलेली सर्वोच्च किंमत आणि विक्रेत्याने स्वीकारलेली सर्वात कमी किंमत यातील तफावत) खूप मोठी असते आणि या शेअर्सबद्दल बाजारात फारशी माहिती नसते.
इन्व्हेस्ट अलाइनचे संस्थापक आणि सीईओ गुंजन चोक्सी सांगतात की, "पेनी शेअर्समध्ये खरेदी-विक्री कमी असल्याने काही लोक मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी करून भाव कृत्रिमरीत्या वाढवतात किंवा शेअरची कमतरता निर्माण करतात. यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित केलं जातं आणि नंतर एकदम मोठ्या प्रमाणात शेअर विकल्याने भाव कोसळतात. "
याशिवाय काही वेळा पेनी स्टॉक अचानक डिलिस्टही होऊ शकतात. शेअर बाजाराची नियामक संस्था सेबी या शेअर्सवर लक्ष ठेवते आणि गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकदा त्यांची तपासणी करते.
'कधी नफा, तर बहुतेक वेळा तोटाच'
सामान्य गुंतवणूकदारांना पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात नाही, फक्त थोडीशी रक्कम प्रयोगासाठीच गुंतवण्यास सुचवलं जातं.
मोतीलाल ओसवाल वेल्थ मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष आणि इक्विटी टेक्निकल रिसर्चचे प्रमुख ऋचित जैन यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितलं की, "स्मार्ट गुंतवणूकदारांनी पेनी स्टॉकपासून दूर राहावे. पोर्टफोलिओ 5 हजाराचा असो किंवा 5 लाखांचा, पेनी स्टॉक ठेवण्याला काहीच अर्थ नाही.
फक्त स्वस्तात घेतलेले शेअर जास्त नफा देतील ही चुकीची समज आहे. पेनी स्टॉकऐवजी दर्जेदार शेअर पोर्टफोलिओत असावेत."
पेनी स्टॉकला पसंती देण्याचे एकमेव कारण म्हणजे, तुम्हाला कमी किमतीत कमी मूल्य असलेल्या कंपन्यांच्या शेअर्स खरेदी करता येतात, जे भविष्यात अनेकपट नफा (मल्टी-बॅगर्स) देऊ शकतात. पण त्यात फक्त तुमच्या एकूण गुंतवणुकीचा छोटा भागच गुंतवावा.
पेनी स्टॉक्सच्या कामगिरीत सातत्य नसतं, म्हणजे ते दीर्घकाळ एकसारखी चांगली कामगिरी करत नाहीत.
पेनी स्टॉकची कमी तरलता म्हणजेच विक्री-सुलभता कमी असणे हा मोठा तोटा आहे. स्टॉक वाढत असतात तेव्हा विक्रेते नसतात आणि जेव्हा स्टॉक घसरत असतात तेव्हा खरेदीदारही नसतात. त्यामुळे तोटा सहन करावा लागतो आणि वेळेवर गुंतवणूक काढता येत नाहीत."
'अचानक मोठा तोटा होण्याचा धोका'
काही वेळा कंपन्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे दिवाळखोरी होण्याची शक्यता जास्त असते, आणि अशा परिस्थितीत त्या शेअर्सची काही किंमत राहत नाही.
भूतकाळात रिलायन्स कम्युनिकेशन, यूनिटेक, सिंटेक्स इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांचे उदाहरण पाहायला मिळाले आहेत.
या कंपन्या एकेकाळी आपल्या क्षेत्रात अव्वल होत्या, पण नंतर कर्ज फेडण्यात अपयशी झाल्याने दिवाळखोरी घोषित केली. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी शेअर्स आयुष्यभराचे ओझे ठरतात आणि तोटा कधीच भरून काढता येत नाही.
(हा लेख केवळ माहितीकरिता आहे, आर्थिक सल्ला नाही. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन