You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय? या किमतीच्या आधारे IPO मध्ये गुंतवणूक करण्यात किती जोखीम?
- Author, अजित गढवी
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
मार्केटमध्ये जवळपास प्रत्येक आठवड्याला लहान-मोठ्या कंपन्यांचे आयपीओ (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) येतात. याचवेळी ग्रे मार्केट प्रीमियमचीही चर्चा होते.
अनेकजण ग्रे मार्केट प्रीमियमच्या आधारावर एखाद्या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची की नाही हे ठरवतात. त्याचाच परिणाम म्हणून काहीजण शेअर्सचं लिस्टिंग होतं, तेव्हाच नफा कमावतात आणि काही जणांना तोटा होतो.
पण मुळात हे ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) म्हणजे काय आणि आयपीओबद्दल जीएमपीवरून काय लक्षात येतं? जाणून घेऊ.
ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय?
गुंतवणूकदार जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किमतीपेक्षा अधिकची रक्कम द्यायला तयार असतो, तेव्हा त्याला ग्रे मार्केट प्रीमियम म्हणतात.
उदाहरणार्थ, जर एखाद्या शेअरची इश्यू प्राइस ही 100 रुपये असेल आणि ग्रे मार्केटमध्ये त्याच शेअरचा व्यवहार हा 120 रुपयांना होत असेल तर त्याचा अर्थ शेअरसाठीचा प्रीमियम झाला 20 रुपये. त्यावरूनच गुंतवणूकदार अंदाज लावतात की, त्या शेअरचं लिस्टिंग हे जास्त किमतीला होणार.
अहमदाबादमधली गुंतवणुकीसंबंधातली सल्लागार संस्था इन्व्हेस्ट अलाइनच्या गुंजन चोक्सी यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हटलं, "समजा एखादी मोठी कंपनी आयपीओ बाजारात आणत असेल आणि त्या शेअरची मागणी जास्त, पुरवठा कमी असेल तर अतिशय जास्त संपत्ती असलेले गुंतवणूकदार ग्रे मार्केटमधल्या काही लोकांना सूचना देतात. त्यांच्या मार्फत शेअर्सची प्रीमियम किमतीला खरेदी करतात. अशारीतीने ग्रे मार्केट तयार होतं."
ग्रे मार्केट प्रीमियमचे प्रकार
जेव्हा कंपनीच्या शेअरची स्टॉक मार्केटमध्ये नोंदणी होते, तेव्हा त्याची किंमत इश्यू प्राइसपेक्षा जास्त असेल की कमी हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळेच ग्रे मार्केट प्रीमियम फायदेशीर ठरू शकतो किंवा त्यातून तोटाही होऊ शकतो.
जेव्हा एखाद्या कंपनीला ऑफर केलेल्या शेअर्सच्या संख्येपेक्षा जास्त पटीने बोली लागते, तेव्हा जीएमपी फायदेशीर असतो. याचाच अर्थ शेअर लिस्टिंगच्या वेळी नफा मिळण्याची शक्यता जास्त असते.
दुसरीकडे, जेव्हा ऑफर केलेल्या शेअर्सच्या तुलनेत कमी शेअर्स सबस्क्राइब होतात, तेव्हा तो नकारात्मक जीएमपी असतो. याचा अर्थ असा की, शेअर इश्यू प्राइसपेक्षा कमी दरात नोंदवला जाण्याची शक्यता असते.
ग्रे मार्केट प्रामुख्याने बाजारातील ट्रेंडचा अंदाज देते; मात्र ते अनियंत्रित असल्यामुळे त्यात फेरफार होण्याची आणि छोट्या गुंतवणूकदारांची दिशाभूल होण्याची मोठी शक्यता असते.
ग्रे मार्केट किती विश्वसनीय?
ग्रे मार्केट हे अनधिकृत आणि ओव्हर-द-काउंटर मार्केट आहे. त्यामुळे त्यावर कोणत्याही नियामक संस्थेचे नियम लागू होत नाहीत.
इथे व्यवहार रोखीने होतात आणि सेबी, स्टॉक एक्सचेंज किंवा ब्रोकरेज कंपन्या यांसारख्या कोणत्याही एजन्सीचा सहभाग नसतो. त्यामुळेच हा बाजार अजिबात विश्वसनीय नसतो.
ग्रे मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी कोणतेही अधिकृत व्यासपीठ नाही, तसेच इथल्या व्यवहारांसाठी कोणतेही ठराविक नियमही नाहीत.
गुंजन चोक्सी सांगतात, "जीएमपीमुळे बाजारात एखाद्या शेअरची मागणी किती आहे याचा अंदाज येऊ शकतो, पण केवळ जीएमपीच्या आधारावर आयपीओ मध्ये गुंतवणूक करू नये."
"कधी कधी एखाद्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम मिळतो आणि त्याची चांगल्या दरात नोंदणी होते. मात्र, नंतर शेअरची किंमत घसरू लागते आणि आधीचा दर पुन्हा मिळत नाही."
गुंजन चोक्सी यांच्या मते, कंपनीचा आर्थिक ताळेबंद मजबूत असणे, हीच आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची पहिली आणि सर्वांत महत्त्वाती अट आहे. ते सांगतात की, गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम त्या कंपनीची स्थिती किती मजबूत आहे आणि भविष्यातील संधी काय आहेत हे पाहावे. त्यानंतर कंपनीच्या प्रमोटर्सचा हेतू तपासावा. उदाहरणार्थ- जर प्रमोटर्स केवळ कंपनीतून बाहेर पडण्याच्या उद्देशाने IPO आणत असतील, तर तो पैसा कंपनीच्या वाढीसाठी वापरला जाणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं."
गुंतवणूकदारांसमोर कोणते धोके?
अनेकदा असंही दिसलं आहे की, नोंदणीपूर्वी एखाद्या शेअरचा जीएमपी खूप जास्त होता, पण प्रत्यक्षात तो शेअर कमी किमतीत लिस्ट झाला. अशा परिस्थितीत छोट्या गुंतवणूकदारांची फसवणूक होते.
NSDL आणि टाटा कॅपिटलसारख्या कंपन्यांच्या शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियमपेक्षा कमी दरात नोंदणी झाली होती. टाटा कॅपिटलच्या जीएमपी जवळपास 7 टक्के होता, पण शेअरची अवघ्या एक टक्का प्रीमियमवर नोंदणी झाली.
लेन्सकार्ट सोल्युशन्स, स्टड्स अॅक्सेसरीजसारख्या कंपन्यांच्या शेअर्सना सकारात्मक जीएमपी होता. पण प्रत्यक्षात नोंदणी कमी किमतीत झाली. याचा अर्थ असा की, जीएमपी पाहून शेअर खरेदी करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांना तोटाच सहन करावा लागला.
शेअर बाजारात अनेक गोष्टी ठोस आकड्यांपेक्षा भावनिकतेवर जास्त चालतात आणि जीएमपीही त्याला अपवाद नाही. मोजकेच डीलर्स जीएमपीत व्यवहार करत असल्यामुळे त्यात फेरफार होण्याची शक्यता कायम असते.
गुंजन चोक्सी सांगतात की सुमारे 90 टक्के छोटे गुंतवणूकदार जीएमपीच्या आधारे आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे ते अनेकदा अडकतात आणि नुकसान सहन करतात.
गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावे?
आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताना गुंतवणूकदारांनी फक्त जीएमपीचा विचार करू नये. त्याऐवजी कंपनीचा ताळेबंद, म्युच्युअल फंडांची गुंतवणूक, कंपनीचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स, कंपनीवरील आर्थिक जबाबदाऱ्या आणि समकक्ष कंपन्यांच्या तुलनेत शेअरचे मूल्यांकन या गोष्टी पाहायला हव्यात.
गुंजन चोक्सी यांनी सांगितलं की, एखादा उद्योग वाढीच्या टप्प्यातून जात असतो, कंपनीच्या व्यवस्थापनाची प्रतिमा चांगली असते, आणि आयपीओमधून उभारलेला निधी कंपनीच्या वाढीसाठी वापरला जाणार असतो, तेव्हाच गुंतवणूकदारांनी जीएमपीला एक 'बॅरोमीटर' म्हणून पाहत गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.
(हा लेख केवळ गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञाशी किंवा गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत करावी.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)