You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार यांचा सल्ला, 'जास्त अपेक्षा बाळगू नका' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) अजित पवार यांचा सल्ला, 'जास्त अपेक्षा बाळगू नका'
"कोरोना साथीमुळे राज्याच्या तिजोरीवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात अपेक्षित उत्पन्नात एक लाख कोटींची तूट आली आहे," अशी माहिती अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत दिली. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
ही माहिती देत असताना, अजित पवार यांनी जास्त अपेक्षा न बाळगण्याचा सल्लाही दिला.
ते म्हणाले, "आर्थिक आघाडीवर राज्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे जास्त काही अपेक्षा बाळगू नका."
"चालू आर्थिक वर्षांत आलेल्या तुटीमुळे पुढील आर्थिक वर्षांतही त्याचे परिणाम जाणवतील. येत्या सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात राज्य सरकार कोणते उपाय योजणार याची सविस्तर माहिती दिली जाईल," असं अजित पवार यांनी सांगितलं.
महाराष्ट्र सरकारच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षांत राज्य सरकारनं 3 लाख 47 हजार कोटींचं महसुली उत्पन्न अपेक्षित धरलं होतं. मात्र, करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनं हे नियोजन कोलमडलं. जानेवारीअखेर 1 लाख 88 हजार कोटींचंच उत्पन्न जमा झालं होतं.
2) शिवसेना, राजद, सपानं तृणमूलच्या दहशतीला तोंड दिलं नाहीय - अधीर रंजन चौधरी
"शिवसेना, सपा किंवा राजद यांसारख्या पक्षांनी तृणमूल काँग्रेसच्या दहशतीला तोंड दिलं नाहीय. त्यांच्या राज्यात भाजपच्या अत्याचाराला त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे त्यांचं पूर्वग्रह वेगळे आहेत," असं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यानंतर शिवसेनेनंही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत सत्तेत आहे, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूलविरोधात लढत आहे. या पार्श्वभूमीवर चौधरींचं हे मत महत्त्वाचं मानलं जातंय.
"मी त्यांना दोष देत नाही, कारण त्यांच्यासाठी भाजपचा धोका आहे. मात्र, आमच्यासाठी भाजप आणि तृणमूल या दोघांचाही धोका आहे. तृणमूलची हुकूमशाही आणि भाजपची धर्मांधता यांचा आम्हाला धोका आहे," असंही चौधरी म्हणाले.
मात्र, या सर्व पाठिंब्यांचा राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या एकजुटीवर काहीही परिणाम होणार नाही, असंही चौधरी यांनी नमूद केलं.
3) एक एप्रिलपासून वीजदरात 2 टक्क्यांनी कपात होणार
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देणारे निर्देश वीज नियामक आयोगानं दिले आहेत. येत्या एक एप्रिलपासून वीज दर दोन टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.
एकीकडे इंधन दरवाढ, तर दुसरीकडे सक्तीने वीज देयक वसुली यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. अशात वीजदरात कपात होणार असल्यानं काहीसा दिलासा मानला जातोय.
टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण या वीज कंपन्यांना हे आदेश देण्यात आले आहेत.
4) केरळमध्ये सत्ता आल्यास पेट्रोल 60 रुपये करू - भाजप नेता
केरळमध्ये सत्ता आल्यास पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणू आणि किंमती लीटरमागे 60 रुपये करू, असं आश्वासन केरळमधील भाजपचे नेते कुम्मनम राजशेखरन यांनी दिलं आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यानंतर प्रचारसभांना जोर चढला आहे. या सभांमधून विविध आश्वासनं दिली जात आहेत.
काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरीपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारवर निशाणा साधला जातोय. त्यात देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्यानं येथील प्रचारसभांमध्ये इंधन दरवाढीचा मुद्दा गाजताना दिसतोय.
5) कोरोना लॉकडाऊनमुळे देशातील 15 लाख शाळा बंद
करोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये भारतातील 15 लाख शाळा बंद राहिल्या. परिणामी प्राथमिक आणि माध्यमिकच्या 24 कोटी 70 लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. फर्स्ट पोस्टनं ही बातमी दिली आहे.
युनिसेफने केलेल्या पाहणीत हे निष्कर्ष समोर आले आहेत.
भारतातील चार विद्यार्थ्यांपैकी केवळ एका विद्यार्थ्यांला ऑनलाइन शिक्षणासाठीची आवश्यक साधने उपलब्ध होत असल्याचेही पाहणीतून दिसून आले आहे.
"शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि जीवनमानावर धक्कादायक परिणाम झाले आहेत. ऑनलाइन शिक्षणाची सुविधा नसलेले विद्यार्थी पुन्हा वर्गात न येण्याचा धोका निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे," असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)